कच्चायन-व्याकरण (Kaccāyana vyākaraa)  आचार्य कच्चायन  यांनी रचलेला पाली भाषेतील एक प्राचीन व्याकरणग्रंथ. त्याचा कालखंड अज्ञात आहे. काही विद्वानांच्या मते, तो साधारण इ.स. ५ व्या ते ७व्या शतकाच्या दरम्यान तयार झाला असावा. पाली भाषाशास्त्र आणि व्याकरण यांचा अभ्यास करण्यासाठी हा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

या ग्रंथाचे  सूत्रग्रंथ, वृत्ति, अट्ठकथा हे तीन प्रमुख भाग आहेत.

१.सूत्रग्रंथ (Sūtra) : सूत्रग्रंथात सुमारे ६७५ सूत्रे आहेत. नाम, सर्वनाम, धातु, अव्यय, समास आणि तद्धित यांसारख्या व्याकरणिक घटकांचा समावेश आहे. सूत्रे संक्षिप्त असून नियमप्रधान आहेत, ज्यामुळे पाली भाषेतील शब्दरचना आणि क्रियापदांचे रूप सहज समजते.

२.वृत्ति (Vutti): सूत्रग्रंथातील नियमांचा अर्थ स्पष्ट करणारा भाग म्हणजे वृत्ति. येथे सूत्रांचे विविधार्थ, त्यांचा उपयोग, अपवाद आणि उदाहरणे दिली आहेत. यामुळे अभ्यासकांना नियम समजण्यास मदत होते.

  ३.अट्ठकथा (Aṭṭhakathā): अट्ठकथा भाग सूत्रार्थांचे सविस्तर विवेचन देतो. यातले स्पष्टीकरण अभ्यासकाला व्याकरणाचा व्यवहार समजून घेण्यास व बौद्ध ग्रंथांचे अचूक वाचन आणि भाषांतर करण्यास उपयुक्त ठरते.

कच्चायन-व्याकरण हा ग्रंथ सुलभता आणि प्रायोगिकतेसाठी ओळखला जातो. ग्रंथव्यवहारातील पाली भाषेच्या रूपांवर यामध्ये विशेष लक्ष दिले आहे. सूत्रे आणि उदाहरणांमध्ये संस्कृत-पाणिनीय प्रभाव दिसत असूनही पालीची स्वतंत्र शैली आणि स्पष्टता जपलेली आहे.यामुळे बौद्ध ग्रंथांचे वाचन, भाषांतर आणि अभ्यास दोन्हीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा ग्रंथ आहे.

कच्चायन-व्याकरण परंपरा पुढे मोग्गल्लान-व्याकरणसद्धनिती (Saddanīti) आणि रूपसिद्धी सारख्या ग्रंथांत परिपक्व झाली. या ग्रंथांमध्ये मूळ ग्रंथाचा आधार घेऊन नियमांचे विस्तारीकरण केले गेले. तसेच पाली कोशलेखन, विशेषतः  अभिधानप्पदिपिका (Abhidhānappadīpikā) मध्ये या ग्रंथाचा प्रभाव स्पष्ट दिसतो,  श्रीलंका आणि म्यानमार (बर्मा) येथे व्यापक प्रमाणात अभ्यासले गेले. या देशांतील बौद्ध शिक्षण प्रणालीत हा ग्रंथ अनिवार्य मानला जात असे. कच्चायन-व्याकरण  फक्त नियमांचा संच नसून , पाली भाषेची शुद्धता, व्याकरणशास्त्रातील पद्धत आणि बौद्ध ग्रंथांचे अचूक वाचन सुनिश्चित करणारे साधन आहे. आधुनिक काळातही पाली अभ्यासक सदर व्याकरण ग्रंथ वापरून शब्दरचना, रूपप्रकार, समासविधान आणि तद्धित व्यवहार समजून घेतात.

आधुनिक पाली व्याकरणाच्या अध्यापन आणि संशोधनात सदर ग्रंथ आधारभूत मानला जातो. डॅनिश पाली अभ्यासक व्हिलेल्म ट्रेकनर (१८२४-१८९१ ) यांनी संपादित केलेले Kaccāyana’s Grammar (Pali Text Society, 1863) हा  कच्चायन-व्याकरणाचा प्रमुख स्रोत मानला जातो. तसेच लक्ष्मीनारायण तिवारी आणि बिरबल शर्मा यांनी संपादित केलेला ‘ कच्चायन व्याकरण’(१९६२) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.पाली भाषा आणि व्याकरणासाठी हे ग्रंथ विशेष महत्त्वाचे आहेत.

 संदर्भ:

१. Geiger, Wilhelm. “Pāli Literature and Language. London: 1943.

२. Malalasekera, “G. P. Pāli Literature of Ceylon. Colombo: 2010.

३. Trenckner, V. Ed., “Kaccāyana’s Pāli Grammar.  Pali Text Society,. London”: 1863

समीक्षक : करुणा जाधव


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.