पटेल, चंद्रकांत टी. : (११ जुलै १९१७ — २५ डिसेंबर १९९०). भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांनी १९७० मध्ये पहिला व्यावसायिक कापूस संकरित वाण हायब्रिड-४ (संकर-४) विकसित केला. ते संकरित कापसाचे जनक म्हणून ओळखले जातात.
पटेल यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील सारसा येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वनस्पती प्रजनन आणि अनुवंशशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली (१९५४). दोन दशकांच्या निरंतर प्रयत्नांनंतर सूरत कृषी विद्यापीठात संशोधक पदावर कार्यरत असताना त्यांनी गुजरात-६७ व अमेरिकन नेक्टरलेस या कापसाच्या दोन वाणांच्या संकराने यशस्वीरित्या संकरित वाण हायब्रिड-४ (एच-४) विकसित केला. या वाणाची व्यावसायिक लागवड प्रथम गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात केली गेली. या वाणामुळे शेतकऱ्यांना जवळपास ८० ते १००क्विंटल प्रति हेक्टर कापसाचे उत्पादन घेणे शक्य झाले. गुजरात-६७ या कापसाच्या मूळ वाणाच्या तुलनेत हे उत्पादन दुप्पट होते. पुढे एच-४ हे वाण मध्य भारतात अत्यंत यशस्वी ठरले. या वाणाच्या कापसाचा धागाही उत्कृष्ट प्रतीचा आहे. व्यावसायिकदृष्ट्या लागवड केल्या जाणाऱ्या संकरीत कापसाचे हे पहिले यशस्वी वाण होते. भारतीय कापूस विकास कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. संकरित वाणाच्या यशाने, संकरित कापूस वाणाच्या संशोधनात झपाट्याने प्रगती झाली. विविध राज्यांमध्ये कापसाचे ४५हून अधिक चांगले, आशादायक संकरित वाण व्यावसायिक लागवडीसाठी विकसित करण्यात आले. त्यांनी वनस्पती प्रजननात अनेक नवीन पद्धतींचा अवलंब केला. रोपवाटिका-कम-मटका सिंचन ही सर्वात लोकप्रिय पद्धती आणि यशस्वी कापूस लागवडीसाठी पंप सिंचन व टेलिफोन प्रणालीचा विशेष उल्लेख केला जातो. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित१५०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
पटेल यांनी अनेक जोखमीच्या पदावर विविध सरकारी, निमसरकारी संस्थांमध्ये पुढीलप्रमाणे संशोधन कार्य केले : गुजरात कृषी विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यागत प्राध्यापक आणि कापूस विशेषज्ञ, इंडो अमेरिकन हायब्रिड कंपनीत शास्त्रज्ञ, भारतीय कृषी संशोधन परिषदच्या (ICAR) AICCI प्रकल्पासाठी गुजरात विभागाचे विभागीय समन्वयक, नाथ ॲग्रो रिसर्च फाउंडेशनसाठी संशोधन कार्यकारी, एम/एस हॉक्स्ट बीज प्रकल्प केंद्राचे कापूस विशेषज्ञ, CIMF-CDRAचे संशोधन सह-समन्वयक इत्यादी.
पटेल यांना गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाने मानद डी. एस्सी. (D.Sc.) पदवी प्रदान केली (१९७६). तसेच गुजरात कृषी विद्यापीठातर्फे त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली (१९७८).
पटेल यांना त्यांच्या संशोधन कार्याच्या योगदानासाठी पुढीलप्रमाणे मानसन्मान देण्यात आले : हरी ओम आश्रम पुरस्कार, फिक्की पुरस्कार, टाटा एन्डॉवमेंट पुरस्कार, इंडियन मर्चंट्स चेंबर पुरस्कार, फेडरेशन ऑफ गुजरात मिल्स अँड इंडस्ट्री पुरस्कार, राष्ट्रीय टोनेज क्लब पुरस्कार, द इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रूव्हमेंट (इंटरनॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडोनेशिया), बॉम्बे द्वारा स्थापित हेक्सामर पुरस्कार इत्यादी.
पटेल यांचे २५ डिसेंबर १९९० ला कार अपघातात निधन झाले.
कळीचे शब्द : #कापूस #हायब्रिड ४
संदर्भ :
- https://archive.org/details/Venk6Copy/page/n13/mode/1up?view=theater
- https://web.archive.org/web/20080916191248/http://www.vasvik.org/agri.htm#
समीक्षक : अ. पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.