वाल्मिकी, ओमप्रकाश (Valmiki, Omprakash) : (३० जून १९५० – १७ नोव्हेंबर २०१३). एक प्रसिद्ध भारतीय हिंदी दलित साहित्यिक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बरला गावात वाल्मिकी समुदायात झाला. वाल्मिकी यांना लहान वयातच जातीय भेदभावाची झळ सोसावी लागली. शाळेत प्रवेश नाकारणे, इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसविणे, शाळेची साफसफाई करून घेणे अशा प्रकारची हीन वागणूक त्यांना मिळत. घरची आर्थिक परिस्थितीत अत्यंत प्रतिकूल असल्याने शिक्षण घेणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते; तरीसुद्धा त्यांच्या वडिलांनी वाल्मिकी यांची शाळेत नोंद केली. त्यामुळे त्यांना सतत समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
वाल्मिकी यांनी देहरादूनमध्ये हिंदी साहित्यात एम. ए. केले. उच्च शिक्षण घेत असतानासुद्धा त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. याच काळात त्यांना ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लागली. नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अंबरनाथ आणि चंद्रपूर येथे बराच काळ त्यांचे वास्तव्य होते. त्यांनी १९८० च्या दशकात साहित्य प्रवासाची सुरुवात केली. त्या काळात दलित साहित्य हा एक नव्याने आकार घेत असलेला प्रवाह होता. ज्यामध्ये दलितांचे वास्तववादी अनुभव, त्यांच्या वेदना, शोषण आणि सामाजिक लढ्यांचे प्रामाणिक चित्रण केले जात होते. वाल्मिकी त्या चळवळीतील अग्रगण्य लेखकांपैकी एक बनले आणि त्यांनी आपल्या लेखनातून हा साहित्यप्रवाह अधिक सशक्त केला.
वाल्मिकी यांचे जूठन हे आत्मकथन १९९७ मध्ये प्रकाशित झाले. दलित साहित्यातील तो एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. जूठनमध्ये त्यांनी जीवनातील संघर्षांचा आणि सामाजिक अन्यायाचा अनुभव विषद केला आहे. त्यांच्या आत्मकथनामुळे दलित साहित्यात नवे दालन उघडले गेले. झूठन हे मराठी, गुजराती, इंग्रजी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तसेच त्यांच्या कविता आणि गद्य लेखनांचेही विविध भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
वाल्मिकी यांचे योगदान केवळ आत्मकथनापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा विचार मांडून ‘दलित साहित्य केवळ भावना किंवा सहानुभूतीवर आधारलेले नाही; तर ते संघर्ष, विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाचा दस्तऐवज आहे’ असा ठाम निष्कर्ष मांडला. त्यांच्या मते, ‘दलित साहित्य हे सौंदर्यशास्त्राच्या पारंपरिक निकषांपेक्षा वेगळे आहे; कारण ते वास्तविक अनुभवांवर आधारित आहे. दलित साहित्याने समाजाच्या दुर्लक्षित, पीडित आणि शोषित घटकांचे वास्तव मांडले. हे साहित्य सौंदर्य, रस, कल्पनारंजन यांपेक्षा वेदना, विद्रोह, तिरस्कार आणि अस्तित्वाच्या संघर्षावर केंद्रित आहे.’
वाल्मिकी यांनी दलित साहित्याची मूलभूत बैठक मांडण्यासाठी अनेक ग्रंथ लिहिले. याशिवाय ते प्रभावी कवी आणि कथालेखकही होते. त्यांच्या कवितांचा रोख केवळ वेदनेच्या मांडणीवर नाही, तर त्या वेदनेला बंडखोरीची धार देण्यावर आहे. त्यांनी आपल्या अनेक कवितांमध्ये आक्रमक आणि परखड मांडणी केली आहे. सौंदर्यशास्त्राच्या पारंपरिक चौकटींपेक्षा वास्तवाचे निखळ दर्शन त्यांच्या कवितांमधून दिसून येते, हेच यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची भाषा साहित्यिक चमत्कृतीपेक्षा जीवनाच्या वास्तवाच्या जवळ जाणारी आणि संघर्षाची जाणीव करून देणारी आहे.
वाल्मिकी यांचे कथालेखनही त्यांच्या आत्मकथनाइतकेच प्रभावी आहे. त्यांनी आपल्या कथासंग्रहांत दलित जीवनाच्या वेदना, सामाजिक अन्याय आणि एका दलित मुलाच्या माध्यमातून जातीय अपमानाची हृदयस्पर्शी अभिव्यक्तीची मांडणी केल्याचे दिसून येते. तसेच शिक्षणव्यवस्थेतील जातीय भेदभाव, दलित स्त्रियांचे संघर्ष, दलित समुदायाचे आर्थिक आणि सामाजिक शोषण व अत्याचार प्रामुख्याने त्यांनी आपल्या कथांमधून मांडणी केली आहे. त्यांच्या कथा दलित जीवनाच्या विविध पैलूंना म्हणजे दारिद्र्य, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता या प्रश्नांना स्वानुभूतीने मांडतात. त्यांच्या कथांमध्ये दलित चेतना, प्रतिकाराची भावना आणि सामाजिक न्यायाची मागणी स्पष्टपणे दिसून येते; ज्यामुळे त्यांच्या लेखनाला एक विशिष्ट ओळख मिळाली. त्यांच्या कथांची भाषा साधी पण प्रभावी आहे, जी वाचकांना हादरवून सोडते. त्यांच्या लेखनात दलित समाजाची प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि संघर्ष प्रखरपणे व्यक्त झाले असून हिंदी साहित्यातील दलित विमर्शाला नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांचे साहित्य केवळ साहित्यिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरले नाही, तर सामाजिक जाणिवांच्या विकासात मौलिक भर घालणारे ठरले.
वाल्मिकी यांनी नाट्यलेखन, अभिनय आणि भाषांतरदेखील केले आहे. त्यांचे ‘दो चेहरे’ हे नाटक प्रसिद्ध आहे. याशिवाय ते स्वतः एक कुशल अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी ६० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केले आणि अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. तसेच इतर भाषांमधील महत्त्वाच्या साहित्यकृतींचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले. अरुण काळे यांचा मराठी कविता संग्रह सायरनचे शहर आणि कांचा इलैया यांच्या Why I Am Not a Hindu या इंग्रजी ग्रंथाचे त्यांनी हिंदीत भाषांतर करून मोठे योगदान दिले आहे. याशिवाय लोकनाथ यशवंत यांच्या मराठी कवितांचे त्यांनी हिंदीत अनुवाद केले आहेत.
वाल्मिकी यांनी पुढील महत्त्वाच्या साहित्यांची निर्मिती केली आहे : सदियों का संताप, १९८९; जूठन, १९९७; बस्स! बहुत हो चुका, १९९७; दलित साहित्य का सौंदर्यशास्त्र, २००१; सलाम, २०००; घुसपैठिये, २००४; अम्मा एंड अदर स्टोरीज, २००८; अब और नहीं, २००९; मुख्यधारा और दलित साहित्य, २००९; शब्द झूठ नहीं बोलते, २०१२; छतरी,२०१३; दलित साहित्य : अनुभव, संघर्ष और यथार्थ, २०१३ इत्यादी.
वाल्मिकी यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना शासकीय व खाजगी संस्थांकडून पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, १९९३; परिवेश सन्मान, १९९५ ‘कथाक्रम’ सन्मान, २००१; ‘न्यू इंडिया बुक’ पुरस्कार, २००४; उत्तर प्रदेश हिन्दी संस्थानचा ‘साहित्य भूषण सन्मान’, २००६; न्यूयॉर्क येथील आठव्या विश्व हिन्दी संमेलनात २००७ मध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दलित साहित्याला हिंदी साहित्याच्या जागतिक व्यासपीठावर स्थान मिळावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी वाल्मिकी यांचे मोठे योगदान आहे. ते दीर्घकाळ कर्करोगाने पीडित होते. त्यांचे उत्तराखंडमधील डेहराडून येथे निधन झाले.
संदर्भ :
- कर्दम, जयप्रकाश, ओमप्रकाश वाल्मिकी – व्यक्ति, विचारक और सृजक, वाणी प्रकाशन, २०१६.
- वाल्मिकी, ओमप्रकाश, दलित साहित्य का सौन्दर्यशास्त्र, राधाकृष्ण प्रकाशन, २००१.
- वाल्मिकी, ओमप्रकाश, ओमप्रकाश वाल्मिकी की यादगारी कहानियाँ, पेंगविन स्वदेश, २०२४.
- वाल्मिकी, ओमप्रकाश, झूठन, राधाकृष्ण प्रकाशन, २०१५.
- वाल्मिकी, ओमप्रकाश, मुख्यधारा और दलित साहित्य, स्पेस पब्लिशिंग हाऊस, २०१९.
समीक्षक : संतोष ग्या. गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.