मानवाने पूर्वीपासून उपयुक्त वनस्पतींना नावे दिली. वनस्पती तीच असली तरी स्थळ आणि भाषा यांच्या अनुषंगाने त्यांची नावे वेगवेगळी असत. उदा., आंबा, आम, कैरी, मँगो इत्यादी. विज्ञान आणि दळणवळण यांच्या विकासाबरोबर स्थानिक नावांच्या उपयुक्ततेच्या मर्यादा जाणवू लागल्या आणि जगन्मान्य नामकरणाची आवश्यकता भासू लागली.
शास्त्रीय पद्धतीने सजीवांना नावे देण्याची सुरुवात युरोपीय देशांत झाली. तेथील विद्वानांची भाषा लॅटिन असल्याने ही नावेही लॅटिनमध्ये दिली गेली. थीओफ्रॅस्टस (इ.स.पू.सु. ३७२ – २८७), प्लिनी (इ.स.पहिले शतक) वगैरे रोमन विद्वानांनी रोज (लॅटीन – Rosa), पेअर (लॅटिन – Pyrus), पान्झी (लॅटिन – व्हायोला), फिग (लॅटिन – फायकस) अशी एकपदी नावे दिली.परंतु एकपदी (monominial) नावांच्या उपयुक्ततेलाही मर्यादा होत्या. उदा., आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या वड, पिंपळ, उंबर, अंजीर या सर्व वृक्षांना फायकस (Ficus) हे एकच नाव लागू असल्याने, वनस्पतींच्या जातींचा बोध होऊ शकत नसे. सतराव्या शतकाच्या मध्यावर कार्ल लिनीअस या स्वीडिश निसर्गअभ्यासकाने द्विनामपद्धती सादर केली. त्या पद्धतीत प्रत्येक सजीवाचे नाव दोन भागात मांडले जाते – प्रजाती (Genus) आणि जाती (species). याप्रमाणे, आंब्याच्या झाडाचे नाव मँजिफेरा इंडिका (Mangifera indica). यात मँजिफेरा ही प्रजाती आणि इंडिका हे जातीचे नाव. प्रजातीच्या नावाची सुरुवात मोठ्या (Capital) अक्षरात असून जातीचे नाव लहान अक्षरात (lower case) लिहिले जाते.
पहिली आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र सभा (International Botanical Congress) सन १८६७ मध्ये पॅरिस येथे दे कांदॉल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्या सभेत वनस्पती नामकरण संहिता (International Code for Botanical Nomenclature; ICBN) संमत झाली. त्याचबरोबर एका वनस्पतीला फक्त एकच द्विपद नाव असून ते नाव प्रथम देणाऱ्याचे नाव वनस्पतीच्या नावापुढे थोडक्यात देण्याचे ठरविण्यात आले. म्हणजे, आंबा या झाडाचे नाव जगात कोठेही मँजिफेरा इंडिका (Mangifera indica) नेहमी तिरक्या अक्षरात (italics मध्ये) असणार आणि हे नाव कार्ल लिनीअस याने प्रथम दिल्यामुळे त्या शास्त्रज्ञाचे नाव L. किंवा Linn. हे त्याच्यापुढे लिहिले जाणार. उदा., Mangifera indica L. अशा प्रकारे दिलेल्या नावांची वैधता ICBN च्या दर ५-६ वर्षांनी होणाऱ्या महासभेत संमत केली जाते.
वनस्पतींना शास्त्रीय नावे देताना लॅटिन व्यतिरिक्त इतर भाषा वापरली, तर त्या नावाचे लॅटिन रूपांतर करणे जरुरीचे आहे. उदा., इंडियाचे रूपांतर इंडिका किंवा इंडिकस, जपानचे जापोनिका, अमेरिकेचे अमेरिकाना, बॉम्बेचे बोम्बायेन्सीस, इ. कित्येक वैज्ञानिक त्याना आदरार्थी वाटणाऱ्या व्यक्तीचे, बहुधा शिक्षकाचे, नाव त्याने शोधलेल्या नव्या वनस्पतीच्या जातीला देण्याचे ठरवितात आणि त्या व्यक्तीच्या नावाचे लॅटिनमध्ये रूपांतर करतात. उदा., अन्सारी या संशोधकाला महाराष्ट्रात सापडलेल्या गवताच्या एका जातीचे नाव त्याने आपल्या मार्गदर्शक – शिक्षकाच्या नावावरून ठेवले – इस्चेमम भरुचेई अन्सारी (Ischaemum bharuchei Ansari). तसेच, भारतात सापडलेल्या द्राक्षाच्या अश्मीभूत बीचे नाव आहे – इंडोव्हायटिस चितालिई (Indovitis chitalii).
वनस्पतींच्या नामकरणाची काही रंजक उदाहरणे :
ॲझाडिरॅक्टा इंडिका (Azadirachta indica) : पर्शियन भाषेत Aazad (मुक्त), आणि diract (वृक्ष) – indica –भारतात मुक्तपणे वाढणारा वृक्ष. (निंब, कडूनिंब).
टॅमरिंडस इंडिका (Tamarindus indica) : चिंच. चिंचेच्या झाडाला आफ्रिकेतील अरब व्यापारी खजुरीची जात समजत असत. या व्यापाऱ्यानी चिंचेची पूड भारतातून नेली म्हणून इंडिका हे जातीचे नाव दिले.
कॅमेलिया सायनेन्सिस (Camellia sinensis) : चहा. रेव्हरंड जॉर्ज कामेल यांच्या वनस्पतिशास्त्रातील कामाच्या सन्मानार्थ प्रजातीचे नाव आणि चायनामधून आलेली वनस्पती म्हणून जातीचे हे नाव.
अल्स्टोनिया स्कोलारिस (Alstonia scholaris) : (सप्तपर्णी, Scholar’s tree) अल्स्तन हे एडीन्बर्ग विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या सन्मानार्थ प्रजातीचे नाव – अल्स्टोनिया. या वृक्षापासून मिळविलेल्या लाकडाच्या फळ्याचा उपयोग लिहिण्यासाठी करत असत, म्हणून जातीचे नाव स्कोलारिस .
ॲम्हर्ट्सिया नोबिलिस (Amhertsia nobilis) : भारतातील गव्हर्नर जनरल अर्ल अम्हर्ट्स आणि त्यांची पत्नी यांच्या सन्मानार्थ प्रजातीचे नाव अम्हर्टसिया आणि ते अमीर-उमराव वर्गाचे म्हणून जातीचे नाव नोबिलीस.
कॉफीया अरेबिका (Coffea arabica) : कॉफी. इथिओपियातील काफा प्रदेशातील म्हणून प्रजाती कॉफिया. सुरुवातीला कॉफीचा सर्वात जास्त उपयोग अरबस्तानात केला जात असे म्हणून जाती अरेबिका.
थीओब्रामा काकाओ (Theobroma cacao) : (koko) थिओस – God आणि ब्रोमा – अन्न. इश्वरीय खाद्य, किंवा इश्वारीय देणगी हे प्रजातीचे नाव. हा वृक्ष मूळचा दक्षिण अमेरिकेतला. स्पॅनिश भाषेत कोकोचे रूपांतर झाले – काकाओ, जे जातीला दिले गेले.
निकोटिआना टाबॅकम (Nicotiana tabacum) : तंबाखू. जॉन निकोट या फ्रेंच व्यापाऱ्याने तंबाखू फ्रान्समध्ये नेली, म्हणून त्याच्या सन्मानार्थ प्रजाती निकोटिआना. सन १४९२ मध्ये जॉन निकोट टोबागो नावाच्या बेटावर उतरला असता त्याने स्थानिक लोक या झाडाची पाने धूम्रपानासाठी वापरताना पाहिली होती. या अनुषंगाने जातीचे टाबॅकम हे नाव.
समीक्षक – शरद चाफेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.