छायाचित्र संदर्भ : https://www.hablemosescritoras.com/writers/1256

आयेंदे, इसाबेल : (२ ऑगस्ट १९४२). स्पॅनिश भाषेतील सुप्रसिद्ध लेखिका. जगातील ४२ भाषांमध्ये यांच्या कथा-कादंबऱ्यांचे अनुवाद झाले आहेत. पूर्ण नाव इसाबेल आंखेलिका आयेंदे शोना. पेरू या देशातील ‘लिमा’ शहरात जन्म. अमेरिकेचे नागरिकत्व घेऊन सध्या तेथेच वास्तव्य. आयेंदे यांचे आई-वडील मूलतः चिली देशातील हिस्पॅनिक-पोर्तुगीज वंशाचे. आई फ्रान्सिस्का शोना बार्रोस आणि वडील तोमास आयेंदे हे चिलीचे राष्ट्रपती साल्वादोर आयेंदे यांचे चुलतबंधू. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मिगुएल फ्रियास यांच्याशी १९६२ मध्ये विवाह झाला. त्यांच्यापासून कन्या व एक पुत्र अशी दोन अपत्यें झाली. यानंतरही त्यांचे आणखी दोन विवाह झाले.

इसाबेल ही तीन वर्षांची असताना, त्यांचे वडील कुटुंबास सोडून निघून गेले. त्यानंतर आईने चिली देशातीलच सँटिआगो या शहरात मुक्काम हलविला. इसाबेल यांचा १९४५ ते १९५३ हा काळ आईच्या आईकडे गेला. आजी त्यांना वेळोवेळी कथा-गोष्टी सांगत असे, त्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला दिसतो. आई व सावत्र वडिलांबरोबर त्यांचा बोलिव्हिया या देशासह मध्यपूर्वेच्या भागांमध्ये सतत प्रवास झाला. अमेरिकेमध्ये, इंग्रजी साहित्य व राज्यशास्त्र या विषयांत पदवीसाठीचे शिक्षण तसेच, अमेरिकेतील ॲरिझोना शहराच्या विद्यापीठामध्ये नाट्यलेखनाचे शिक्षण घेतले. इंग्रजी भाषेतील शृंगारिक कादंबऱ्यांचे अनुवाद स्पॅनिश भाषेत करण्याचे काम त्यांच्याकडे आले. १९६७ मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला. ‘पाऊला’ या मासिकाच्या मुख्य संपादिका म्हणून त्यांनी काम केले. १९७० ते १९७४ या काळात त्यांनी चिलीमध्ये दूरदर्शन केंद्रात निर्मितीप्रमुख म्हणूनही काम केले. लहान मुलांसाठी त्यांनी अनेक कथा प्रसिद्ध केल्या. त्यांपैकी काही विशेष गाजल्या. त्यांचे अनेक लेखसंग्रह देखील प्रसिद्ध झाले.

इसाबेल यांच्या साहित्याचे विषय हे प्रेम-प्रीती, मृत्यू, न्याय, स्वातंत्र्य यासारख्या वैश्विक संकल्पना याबरोबरच राजनीती, हिंसा, स्त्रीवाद, असे आहेत. याशिवाय देशाला मुकलेल्या लोकांचे दुःख-वेदना, मानवी जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या शक्तींच्या वास्तव्याचे जग, मानवी अस्मिता, मानवाच्या पूर्वस्मृती आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न या साऱ्यांचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या लेखनात आढळते. इतिहास आणि अद्भुतातून केलेले कथा व कादंबऱ्यांचे लेखन हा महत्त्वाचा विशेष. व्यक्तिरेखा, विशेषतः मनोनिग्रही, चिवट वृत्तीच्या झुंजार स्त्रिया त्यांच्या लेखनात वारंवार आढळतात. दक्षिण अमेरिकेत जे साहित्य निर्माण झाले, त्यामधून स्पॅनिश साहित्यात ‘मॅजिक रीअलिझम’ म्हणजे जादुई वास्तवाचा वापर हे इसाबेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होय.

इसाबेल यांचे विशेष गाजलेले लेखन म्हणजे आपल्या आजीबरोबर व्यतीत केलेल्या लहानपणाच्या काळावर आधारित ‘ला अबूएला पांचिता’ (La Abuela Panchita) (१९७४, ‘इं.शी.’ ‘ग्रँडमदर पांचिता’) हे त्यांचे लहान मुलांसाठी विशेष उल्लेखनीय पुस्तक. ‘लाउचास इ लाउचोनेस’ (१९७४, ‘इं.शी.’ टेल्स ऑफ इव्हा लुना) हा कथासंग्रह आहे. यामध्ये स्वतःच्याच देशातून हद्दपार झालेल्या, आपल्या देशाला मुकलेल्या लोकांचे दुःख-वेदना हा विषय प्रभावीपणे मांडला आहे. ‘ला कासा दे लोस एस्पिरितूस’ (१९८२, ‘इं. शी.’ द हाउस ऑफ द स्पिरिट्स) ही आयेंदे यांची पहिली लेखनकृती, पदार्पणातच जागतिक स्वीकृती मिळाली. यामध्ये तीन पिढ्यांची कथा, दक्षिण अमेरिकेतील एका कुटुंबाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक उत्पात, समाजातील विविध स्तरांमधील संघर्ष, प्रेम, द्वेष, स्मृतीची ताकद, अतिमानवी शक्तींचा प्रभाव, तसेच शक्तिशाली स्त्रियांनी दिलेला लढा या साऱ्याचे चित्रण या कादंबरीत आहे. ‘एव्हा लुना’ (१९८७) मंत्रमुग्ध करून टाकणारे असे स्त्रीचे स्वकथन. १९७० ते १९८० या दशकातील चिली देशातील राजकीय अस्थैर्य आणि हुकूमशाही या पार्श्वभूमीवर लिहिलेली ‘दोस पालाब्रास’ (१९८९, ‘इं. शी.’ टू वर्ड्स) ही रूपकात्मक लघुकथा. चतुरपणे शब्दांचा व्यापार करत फिरणाऱ्या विक्रेत्या मुलीच्या माध्यमातून अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा विषय ही कथा मांडते. ती खूप गाजली. ‘पाऊला’ (Paula) (१९९४) मन हेलावून टाकणाऱ्या या कथेत आपल्या मुलीच्या आजारपणाबद्दल सांगणारी आई आहे, इखा दे ला फोर्तुना (१९९९, ‘इं.शी.’ डॉटर ऑफ फॉर्च्यून) या कथेमध्ये, सोन्याच्या शोधात कॅलिफोर्नियाला गेलेल्या आपल्या प्रियकरास शोधण्यासाठी १८४९ मध्ये तिकडे निघालेल्या एका तरुण मुलीच्या प्रवासाचा भव्य पट चितारला आहे. ‘ला सिउदा दे लास बेस्तियाज’ (२००२, ‘इं. शी.’ सिटी ऑफ द बीस्टज्) यात एका तरुणाच्या कल्पनारम्य, अद्भुत जगातील प्रवासाची कथा आहे. ‘लार्गो पेतालो दे मार’ (२०१९) स्पेन देशातील यादवी युद्धाच्या काळात, मायभूमी सोडून चिली देशात स्थलांतरित व्हावे लागलेल्या परंतु आपल्या मायदेशासाठी सतत झुरणाऱ्या एका जोडप्याची कथा आहे. आटोकाट प्रयत्न करून, कित्येक वर्षांनंतर त्यांचे पुन्हा त्यांच्या मायदेशात झालेले आगमन या साऱ्याविषयी कादंबरी या रूपबंधात उलगडत जाणारी ही कथा मन हेलावून टाकते. ‘एल व्हिएन्तो कोनोसे मी नोम्ब्रे’ (२०२३, ‘इं. शी.’ द विंड नोज माय नेम) हिंसा, बंधुत्व, प्रेम, ऐक्य आदी भावनांनी ओतप्रोत ही कथा आहे. कुटुंबाशी ताटातूट झालेला आणि अर्थातच कुटुंबाशी मिलन होण्यासाठी आसुसलेला १९३८ मधला व्हिएन्ना शहरातील ज्यू तरुण यात आहे. तसेच २०१९ मध्ये अमेरिकेच्या सरहद्दीवर आईपासून ताटातूट झालेली एक तरुणी आहे. दोन वेगवेगळ्या कालखंडातील जीवांची मन हेलावून टाकणारी ही कथा आहे.

इसाबेल यांना १९८३ या वर्षीचा चिली या देशाचा सर्वोत्तम कादंबरीचा पुरस्कार मिळाला. पुढे सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार (मेक्सिको, १९८६), सर्वोत्कृष्ट लेखन (जर्मनी, १९८६), साहित्याचे पारितोषिक (इटली, १९९३), अमेरिकन कला-साहित्य अकादमी पुरस्कार (यू. एस. ए., २००४). साहित्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (चिली, २०१०), राष्ट्रपती घोषित ‘स्वातंत्र्य-पदक’ (यू. एस. ए., २०१४), नेत्रदीपक साहित्यिक कामगिरीबद्दल साहित्य आणि मानवी हक्क क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेच्या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार (यू. एस. ए., २०१६), ‘पेन’ (लेखणी या अर्थाने) सेंटर जीवनगौरव पुरस्कार (यू. एस. ए., २०१६),) अमेरिकन साहित्यावर त्यांच्या लेखनामुळे पडलेल्या विशेष प्रभावाच्या गौरवाखातर डिकॅलतर्फे मिळालेले खास राष्ट्रीय मानपदक (डिकॅल, यू. एस. ए., २०१८ – ‘डिकॅल’ म्हणजे डिस्टिंनग्वीश्ड कॉन्ट्रीब्यूशन टू अमेरिकन लेटर्स), पेन या संस्थेचे माननीय सदस्यत्व (चिली, २०२१), लॉस अँजेल्स, कॅलिफोर्निया येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक पारितोषिकांच्या परिषदेमध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण लेखनासाठी आणि त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी मिळालेला सन्मान (यू. एस. ए., २०२३).

मानवी आशा-आकांक्षांची स्पंदने जाणणारी, संवेदनशील मनाची लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.

संदर्भ : 

समीक्षक : अनघा भट बेहेरे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.