वार्ष्णेय, राजीव कुमार : (१३ जुलै १९७३). आनुवंशिकी, जनुकशास्त्र (जीनोमिक्स) आणि रेणवीय प्रजननशास्त्रातील भारतीय-ऑस्ट्रेलियन कृषिशास्त्रज्ञ. भारतातील जैविक विज्ञानासाठी सर्वांत प्रतिष्ठेचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला (२०१५). थॉमसन रॉयटर्स यांनी सलग तीन वेळा त्यांना उद्धृत संशोधक आणि रिसर्च एक्सलन्स इंडिया प्रशस्तिपत्र पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच त्यांना जगातील सर्वांत प्रभावशाली सायंटिस्ट माइंड्सच्या यादीत सूचीबद्ध केले.

वार्ष्णेय यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बहजोई येथे झाला. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून वनस्पतिशास्त्राची पदवी (१९९३) आणि आनुवंशिकी, वनस्पती प्रजननशास्त्र आणि रेणवीय जीवशास्त्र विषयांत पदव्युत्तर पदवी (१९९५) प्राप्त केली. त्यांनी मेरठच्या चौधरी चरणसिंग विद्यापीठातील प्राध्यापक पी. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी वनस्पतिशास्त्रातील रेणवीय जीवशास्त्र विषयातील भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने प्रायोजित केलेल्या गव्हाच्या जैवतंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत संशोधन कार्य करून पीएच.डी. पदवी संपादन केली (२००१). त्यानंतर ते जर्मनीतील गॅटरस्लेबन येथील लायप्निट्स इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जेनेटिक्स अँड क्रॉप प्लांट रिसर्च येथे संशोधन-शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली (२००१). त्यांनी येथे जवाचे (खपली गहू; बार्ली) रचनात्मक व कार्यात्मक जनुकशास्त्र आणि तृणधान्य सापेक्ष जनुकशास्त्र या क्षेत्रात पाच वर्षे काम केले. त्यांनी पतनचेरू, हैदराबाद येथील इक्रिसॅट (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्ट‍िट्यूट फॉर द सेमी-अरीड ट्रॉपिक; International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) या संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून पदभार स्वीकारला (२००५). इक्रिसॅटमध्ये असतांना त्यांनी मेक्सिकोमधील CGIAR CIMMYT (CGIAR – Consultative Group on International Agricultural Research; CIMMYT  स्पॅनिश संक्षिप्त रूप Centro Internacional de Mejoramiento de Maíz y Trigo अर्थात International Maize and Wheat Improvement Center) येथे २००७ या वर्षी संचालित केलेल्या जनरेशन चॅलेंज प्रकल्पांतर्गत (GCP) ‘सबप्रोग्राम २-जनुक संशोधनाच्या दिशेने जीनोमिक्स’ या कार्यक्रमाचे उपकार्यक्रम नेता म्हणून अर्धवेळ काम केले. त्यानंतर इक्रिसॅट मध्ये प्रमुख शास्त्रज्ञ पदावर पदोन्नती झाली (२००८). २००७—१३ च्या कार्यकाळात त्यांच्याकडे इक्रिसॅटचे प्रमुख वैज्ञानिक आणि गॅटरस्लेबन, जर्मनी येथील GCPचे उपकार्यक्रम नेता अशी दुहेरी जबाबदारी होती. नंतर त्यांची युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथे साहाय्यक प्राध्यापक वनस्पती-जीवशास्त्र म्हणून नियुक्ती झाली (२०१०). त्यांना २०१२ मध्ये चीनमधील ग्वांगडोंग अकादमी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सेस येथे अभ्यागत प्राध्यापक आणि बीजिंग जीनोमिक्स इन्स्टिट्यूट ऑफ हाँगकाँग येथे उपप्राध्यापक अशी पदे बहाल करण्यात आली. ऑगस्ट २०१३ मध्ये त्यांनी इक्रिसॅटमध्ये संशोधनकार्यक्रम संचालक गळीत धान्य ( रिसर्च प्रोग्रॅम डायरेक्टर- ग्रेनलेगुम) पदाची सूत्रे हाती घेतली .पुढे त्यांनी इक्रिसॅटचे ग्लोबल रिसर्च प्रोग्रॅम डायरेक्टर, जेनेटिक ग्रेन्स म्हणून काम पाहिले (फेब्रुवारी २०१६ ते २०२२ पर्यंत). या पदावर कार्यरत असताना जीनबँक, प्री-ब्रिडिंग, सेल, रेणवीय जीवशास्त्र, आनुवांशिक अभियांत्रिकी, जीनोमिक्स आणि वैशिष्ट्य शोध, फॉरवर्ड आणि इंटिग्रेटेड ब्रीडिंग, बीज प्रणाली, अफलाटॉक्सिन व्यवस्थापन आणि जैवतंत्रज्ञान यासह विविध विषयांसाठी संशोधन प्रकल्पांचे धोरणात्मक पर्यवेक्षण प्रदान करणे अशी जबाबदारी त्यांच्याकडे होती.

वार्ष्णेय यांनी इक्रिसॅटमध्ये विविध पदावर असताना समर्पक नेतृत्व गुणांतून संस्थेची उद्दिष्टे आणि धोरणांचा जगातील कोरडवाहू प्रदेशात ठसा उमटवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. इक्रिसॅटमध्ये जीनोमिक्स संशोधनासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त केंद्र स्थापित करणे आणि पुढे त्याचे संगोपन करण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात या केंद्रामार्फत त्याच्या नेतृत्वात आशिया आणि उप-सहारा आफ्रिका या देशांच्या राष्ट्रीय भागीदारी सहकार्यतून उच्च दर्जाचे प्रतिस्त्रोत संशोधन केले. काही पिकावर परिणाम टाकण्यासाठी त्यांनी संस्थात्मक उद्दिष्टे आणि कमी संशोधन झालेल्या पिकांच्या जनुक क्रमनिर्धारण (जीनोम सिक्वेंसिंग) संशोधन प्रयत्नांचे नेतृत्व केले. प्रगत अनुवंशशास्त्र आणि जनुक अभिव्यक्ती नकाशाधारित पुस्तक विकसित केले. भुईमूग पिकांमधील ५०पेक्षा जास्त गुण वैशिष्ट्यांचे मानचिन्हांकन केले आणि रेणवीय प्रजनन पद्धतीद्वारे विकसित केलेल्या भुईमुगाच्या सुधारित हवामान संवेदनशील १० पेक्षा अधिक वाणांचे वितरण करण्यासाठी भागीदारांसह स्थानांतरण संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांच्या सहयोगी प्रयत्नांमुळे या पिकांसाठी रेणवीय प्रजनन तंत्र, जननिक क्रमासंबंधी संशोधन अशी मोठ्या प्रमाणात जीनोमिक संसाधने निर्माण झाली, त्यामुळे या पूर्वी जीनोमिक संसाधनांच्या कमतरतेमुळे अनुवाशिंकविज्ञानाच्या आधारे संशोधन वंचित उडीद, मूग, तूर, हरभरा, तीळ, भुईमूग, बाजरी इ. पिकावरील संशोधनास चालना मिळाली.

वार्ष्णेय यांनी विकसनशील देशांमधील जैवतंत्रज्ञानाच्या अनुप्रयोगावरील एफ.ए.ओ परिषद वनस्पती आणि प्राणी जीनोम परिषद आशिया यांसह अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी संचालन समिती, आयोजन समिती, कार्यक्रम समितीमध्ये काम केले. तसेच त्यांनी अध्यक्ष म्हणून जीवविज्ञाना संबधीच्या अनेक परिषदांचे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनाशी संबंधित अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले. जुलै २०१२ मध्ये बिल गेट्स यांच्या अध्यक्षतेखाली बिल अँड मेलिंदा गेट्स फाऊंडेशनमध्ये शेतीसाठी डिजिटल क्रांती या विषयावर विचारमंथन सत्र आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांनी तूर सुधारणेसाठी जीनोम अनुक्रमाच्या वापराचा आराखडा तयार करण्यासाठी एक विचारमंथन सत्र आयोजित केले. या दोन्ही आयोजनासाठी सहभागी होण्यास त्यांना आमंत्रित केले होते.

वार्ष्णेय यांच्या संशोधनाला परदेशातील बिल अँड मेलिंदा गेट्स फाऊंडेशन, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, जनरेशन चॅलेंज प्रोग्राम, यूएस नॅशनल सायन्स फाऊंडेशन, इंडो-जर्मन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर आणि कृषीसंशोधन परिषद, जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग या भारतीय अग्रगण्य फंडिंग संस्थांकडून संशोधन अनुदान मिळाले .

वार्ष्णेय यांची भातातील इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी, नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया, नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेस, इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग इ. संस्थांनी फेलो म्हणून निवड केली गेली. तसेच परदेशातील अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सेस, जर्मन नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, क्रॉप सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका, वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस अशा अनेक विज्ञान अकादमीचे फेलो म्हणून त्यांची निवड झालेली आहे.

वार्ष्णेय यांचे २५० हून अधिक शोधनिंबध अनेक नामांकित वैज्ञानिक नियतकालिकामधुन प्रकाशित झाले आहेत. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : नेचर, नेचर बायोटेक्नॉलॉजी, नेचर जेनेटिक्स, ट्रेंड्स इन बायोटेक्नॉलॉजी, डीएनए रिसर्च, प्लांट बायोटेक्नॉलॉजी जर्नल, मॉलिक्युलर प्लांट, फंक्शनल अँड इंटिग्रेटिव्ह जीनोमिक्स, थिऑरॉटिकल अँड अप्लाइड जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग इत्यादी. वार्ष्णेय यांनी थिऑरॉटिकल अँड अप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर जेनेटिक्स अँड जीनोमिक्स, प्लांट ब्रीडिंग, फ्रॉन्टीयर्स इन प्लांट सायन्सेस इ. नियतकालिकांच्या संपादक मंडळात काम केले आहे. तसेच त्यांनी जीवविज्ञानावरील अनेक पुस्तकांचे संपादन केले आहे.

वार्ष्णेय यांना क्रॉप सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका यांच्यातर्फे युवा क्रॉप सायंटिस्ट पुरस्कार, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनातर्फे ‘किलू फ्रेंडशिप पुरस्कार’ यांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय कृषी क्षेत्रातील पीक जीनोमिक्स आणि रेणवीय प्रजनन क्षेत्रातील संशोधनाचा अनुभव आहे. अर्धशुष्क उष्णकटिबंधातील कडधान्य आणि तृणधान्य पिकांच्या उपयोजित प्रजननासाठी जीनोमिक साधने आणि धोरणांचा विकास व वापर करण्यात त्यांना आवड आहे

वार्ष्णेय २०२२ पासून संचालक, वेस्टर्न ऑस्ट्रेलियन स्टेट ॲग्रीकल्चरल बायोटेक्नोलॉजी सेंटर, पर्थ; संचालक, सेंटर फॉर क्रॉप अँड फूड इनोव्हेशन; युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया आणि मरडॉक युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृषी आणि अन्न सुरक्षा अशा पदावर कार्यरत आहेत.

कळीचे शब्द : #पीक #जीनोमिक्स #प्रजनन# जननिक क्रम संशोधन

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.