सेनगुप्ता, सुदीप्ता : (२० ऑगस्ट १९४६). भारतीय भूशास्त्र वैज्ञानिक. अदिती पंत यांच्यासह अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. वैज्ञानिक संशोधनासाठी भारत सरकारची सर्वोच्च संस्था असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने १९९१ मध्ये त्यांना पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञानातील योगदानासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित केले.

सुदीप्ता यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील हवामानशास्त्रज्ञ होते. काही वर्षे  नेपाळमध्ये असल्याने सुदीप्ता यांना लहानपणीच गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. गिर्यारोहणाच्या आवडीतून भूशास्त्रामध्ये शिक्षण घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठातून भूशास्त्र विषयात बी. एस्सी., एम.एस्सी. आणि ‘संरचनात्मक भूशास्त्र’ या विषयात पीएच.डी. (१९७२) पदव्या संपादन केल्यात. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये त्या भूशास्त्रज्ञ म्हणून काही काळा कार्यरत होत्या (१९७०—७३). त्यानंतर संशोधन करण्यासाठी त्यांना ब्रिटन सरकारची रॉयल कमिशन फॉर जिऑलॉजी शिष्यवृत्ती मिळाली (१९७३) आणि त्यांनी तीन वर्षे लंडनमधील इंपिरियल महाविद्यालयात संशोधन केले. काही महिने स्वीडनच्या अप्साला विद्यापीठातही त्यांनी संशोधन केले (१९७७). भारतात परतल्यावर  त्या जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ भूशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्या (१९७९). पुढे त्यांनी सेवानिवृत्तपर्यंत जादवपूर विद्यापीठात भूशास्त्राचे अध्यापन व संशोधन केले (१९८२ — २००६).

भारताच्या तिसऱ्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमेत सुदीप्ता आणि सागरीजीवशास्त्रज्ञ अदिती पंत यांची निवड झाली (१९८३). अंटार्क्टिक मोहिमेसाठी भारतीय संरक्षण दलातर्फे त्यांना हिमालयावर खडतर प्रशिक्षण देण्यात आले. अंटार्क्टिकावरील शून्यापेक्षा कमी तापमान, जोराचे बोचरे वारे, हिमवादळे, सहा महिने दिवस अशा टोकाच्या वातावरणाला त्यांना तोंड द्यावे लागले. अंटार्क्टिक मोहिमेच्या  संशोधन कार्याबरोबरच सर्व सोयींनी परिपूर्ण दक्षिण गंगोत्री हे अंटार्क्टिकावरील पहिले भारतीय संशोधन केंद्र तयार करण्याची जबाबदारी त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली. परंतु १९८९ मध्ये दक्षिण गंगोत्री बर्फात बुडून गेले. एक वर्षांनी त्याला बर्फातून वर काढून त्याची दुरुस्ती केली आणि १९९०पासून ते मोहिमांसाठी लागणारे सामान ठेवण्यासाठी आणि मोहिमेच्या तात्पुरत्या व्यवस्थेसाठी वापरले जाऊ लागले. १९८९ मध्ये ‘मैत्री’ आणि २०१२ मध्ये ‘भारती’ ही दोन अत्याधुनिक केंद्रे तयार झाली.

सुदीप्ता यांनी पुन्हा १९८९ मध्ये नवव्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमेत भाग घेतला होता. त्यांनी दोन्ही मोहिमांमध्ये द्वीपकल्पीय कॅम्ब्रियन पूर्व कालखंडातील (प्री-कॅम्ब्रियन -पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी) खडकांच्या निर्मितीबाबतचे संशोधन केले. त्याअंतर्गत गोंडवानाचा सखोल अभ्यास व संशोधन केले. त्यासाठी त्यांचे अंटार्क्टिकावरील शिरमाचर या टेकडीचे भूशास्त्रीय संशोधन मूलभूत व अतिमहत्त्वाचे होते. या संशोधनाचा उपयोग प्राचीन काळातील जमिनीचा व हवामानाचा अभ्यास करण्यासाठी व भविष्यातील बदलांचे भाकित करण्यासाठी होतो.  त्यांचे  अंटार्क्टिकावरील संशोधन पुढील संशोधनासाठी मार्गदर्शक ठरले.

सुदीप्ता यांच्या संशोधनात द्वीपकल्पीय (प्री-कॅम्ब्रियन) काळातील भारत, स्कॉटिश हायलॅंड, स्कॅंडिनॅव्हियन कलोडोनाईडस् आणि पूर्व अंटार्क्टिका या भागांच्या संरचनात्मक भूशास्त्राचा समावेश आहे. त्यांनी व्यवस्था नसलेल्या दुर्गम परिस्थितीत भारत आणि इतर देशांत दुर्मिळ खडक मिळवून संशोधन केले. क्षेत्रीय कामासाठी त्यांना गिर्यारोहणाच्या अनुभवाचा फार उपयोग झाला. त्या प्रामुख्याने संरचनात्मक भूशास्त्रज्ञ (स्ट्रक्चरल जिऑलॉजीस्ट) आहेत. संरचनात्मक भूशास्त्र म्हणजे खडकांची निर्मिती, त्यांचा आकार, घडण, बाह्य व अंतर्गत रचना यांची माहिती, त्यांचे विश्लेषण इत्यादींचे अभ्यासात्मक संशोधन. पेट्रोलियम, खाण, इमारती, जलसाठा, धरणे इत्यादींच्या निर्मिती आणि नियोजनासाठी हे संशोधन उपयुक्त ठरते. त्यांनी भूशास्त्राच्या अध्यापन व संशोधनाबरोबरच गिर्यारोहणालाही महत्त्व दिले. एडमंड हिलरी यांच्याबरोबर एव्हरेस्ट सर करणारे तेनसिंग नॉरगे यांच्याकडून त्यांनी गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण घेतले. भारताशिवाय त्यांनी नेपाळ व यूरोप इथेही गिर्यारोहण मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. स.स.पासून ६,२६५ मी. उंचीवर असलेल्या माउंट ललनावरील फक्त महिलांसाठी असलेली मोहिमही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

सुदीप्ता यांचे अनेक वैज्ञानिक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. बंगाली भाषेतील ‘अंटार्क्टिका’ पुस्तक जगभर प्ररसिद्ध आहे. त्यांचे अंटार्क्टिका मोहिमेवरील अनेक लेख आणि दूरदर्शनवरील मुलाखती प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘Evolution of Geological Structures in Micro- to Macro – Scales’ हे पुस्तक संपादित केले. या पुस्तकात संरचनात्मक भूशास्त्र या विषयातील तज्ञांचे लेख आहेत. त्या ‘जर्नल ऑफ स्ट्रक्चरल जिऑलॉजी’ या नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्या आहेत (२००२). त्या आंतरराष्ट्रीय भूशास्त्र संघ भूखंड मंच आणि रचनात्मक भूविज्ञान (International Union of Geological Sciences Task Force on Tectonics and Structural Geology), भारतीय गिर्यारोहक संस्था, भारतीय विज्ञान अकॅडमी (Indian Mountaineering Foundation, Indian National Science Academy) अशा संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत. फेलो ऑफ इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी, नॅशनल मिनरल अवॉर्ड, अंटार्क्टिका अवॉर्ड इ. सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या सेनगुप्ता मानकरी आहेत. नवी दिल्ली येथील भारतीय आंतरराष्ट्रीय केंद्रातील ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला’ या मंचाच्या त्या सदस्य आहेत.

कळीचे शब्द : #भूशास्त्रज्ञ #अंटार्क्टिका मोहीम #संरचनात्मक भूविज्ञान

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.