न्यायवैद्यक परिचर्या ही परिचर्येची एक विशेष अद्ययावत शाखा असून शरीरावर किंवा मनावर झालेल्या जखमा, आघात, अत्याचार अथवा हिंसाचार यांचा वैद्यकीय व कायदेशीर दृष्टिकोनातून अभ्यास करून रुग्णसेवा देणाऱ्या परिचर्येच्या विशेष शाखेस न्यायवैद्यक परिचर्या असे म्हणतात. ही शाखा वैद्यकशास्त्र, परिचर्याशास्त्र आणि कायदेविज्ञान यांचा समन्वय साधणारी अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील उपशाखा आहे. गुन्हेगारी घटनांमुळे बाधित झालेल्या व्यक्तींची शारीरिक, मानसिक व सामाजिक शुश्रूषा करणे तसेच कायद्याच्या कक्षेत राहुन व न्यायवैद्यकांच्या मार्गदर्शनानुसार न्यायप्रक्रियेसाठी आवश्यक वैद्यकीय पुरावे संकलित करणे हे न्यायवैद्यक परिचारिकेचे मुख्य कार्य असते.
न्यायवैद्यक परिचर्येत कार्य करणाऱ्या परिचारिकांना मानवी शरीररचना, जखमांचे प्रकार, विषबाधा, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, बालछळ, वृद्धांवरील अत्याचार, आत्महत्येचे प्रयत्न, अपघात व संशयास्पद मृत्यू इत्यांदींविषयी सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.
शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण : या विभागात कार्यरत असलेल्या परिचारिकेने मूलभूत परिचर्या शिक्षण (B.Sc. Nursing) पूर्ण केलेले असावे. त्यानंतर न्यायवैद्यक परिचर्येत पदव्युत्तर शिक्षण (M.Sc. Nursing – Forensic / Medico-legal Nursing) किंवा किमान एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course in Forensic Nursing) पूर्ण केलेला असणे आवश्यक असते.
न्यायवैद्यकशास्त्र ही वैद्यकाची एक उपशाखा असून त्यामध्ये जखमांचे विश्लेषण, मृत्यूचे कारण, गुन्हेगारी पुराव्यांचे जतन, वैद्यकीय कायदे, नैतिक मूल्ये आणि साक्ष देण्याची प्रक्रिया इत्यादींचा अभ्यास केला जातो.
स्वरूप व गरज
न्यायवैद्यक परिचर्या ही समाजातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अत्यंत महत्त्वाची ठरलेली स्वतंत्र शाखा आहे. या शुश्रूषेमध्ये न्यायवैद्यक तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस यंत्रणा आणि कायदेतज्ज्ञ यांचा संयुक्त सहभाग असतो.
न्यायवैद्यक परिचारिका पीडित व्यक्तीची तात्काळ वैद्यकीय काळजी घेतात, त्याच्या जखमांचे शास्त्रशुद्ध निरीक्षण करतात, आवश्यक पुरावे नष्ट न होता सुरक्षित ठेवतात आणि रुग्णास मानसिक आधार देतात. तसेच पीडित व्यक्तीचा आत्मसन्मान, गोपनीयता व मानवी हक्क यांचे संरक्षण करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते.
व्याप्ती : गेल्या काही दशकांत आरोग्यसेवा व कायदेव्यवस्थेत झालेल्या बदलांमुळे न्यायवैद्यक परिचर्येची व्याप्ती लक्षणीय रीत्या वाढली आहे. आपत्कालीन विभाग (Emergency Department), शासकीय व खाजगी रुग्णालये लैंगिक अत्याचार निवारण केंद्रे, मानसिक आरोग्य संस्था, कारागृहे व सुधारगृहे, बालसंरक्षण व महिला संरक्षण संस्था, शवविच्छेदन कक्ष (Post-mortem Unit), गृह आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य व कायदा अंमलबजावणी संस्था तसेच लैंगिक अत्याचार परिचर्या (Sexual Assault Nursing), बालन्यायवैद्यक परिचर्या (Pediatric Forensic Nursing), मानस–न्यायवैद्यक परिचर्या (Forensic Psychiatric Nursing), वृद्धांवरील अत्याचार परिचर्या असे काही सर्वसाधारण विभाग अथवा संस्था आहेत जेथे न्यायवैद्यक परिचारिका रुग्ण सेवेत सहभागी होऊ शकतात.
१) पीडित रुग्णाच्या शारीरिक जखमांचे बारकाईने निरीक्षण, मोजमाप व दस्तऐवजीकरण (record) करणे.
२) वैद्यकीय–कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाचे पुरावे (कपडे, जैविक नमुने, छायाचित्रे) शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णालयाच्या नियमानुसार संकलित व सुरक्षित ठेवणे.
३) रुग्णाची / नातेवाईकांची लेखी संमती घेऊन तपासणी करणे व गोपनीयता राखणे.
४) रुग्णाच्या मानसिक स्थितीचे मूल्यमापन करून आवश्यक समुपदेशन पुरविणे.
५) पोलीस व न्यायवैद्यक तज्ज्ञ यांच्याशी समन्वय साधणे.
६) न्यायालयीन साक्ष देण्यासाठी आवश्यक नोंदी अचूक व स्पष्ट ठेवणे.
७) रुग्ण व नातेवाइकांना कायदेशीर प्रक्रियेविषयी योग्य माहिती देणे.
उपचार केंद्रातील परिचारिकेच्या जबाबदाऱ्या :
१) रुग्णाचा सविस्तर वैद्यकीय, सामाजिक तसेच वैयक्तिक बाबींविषयीच्या माहितीची नोंद ठेवणे.
२) प्रयोगशाळा तपासण्या व प्रतिमा परीक्षण (photography) अहवाल तज्ज्ञांपर्यंत पोहोचविणे.
३)औषधोपचार, जखम व्यवस्थापन व संसर्ग प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करणे.
४) रुग्णाच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे व पुनःअत्याचार टाळण्यासाठी उपाययोजना करणे.
५) सर्व वैद्यकीय–कायदेशीर नोंदी क्रमबद्ध पद्धतीने जतन करणे.
न्यायवैद्यक परिचारिका : व्यावसायिक व नैतिक जबाबदारी :
न्यायवैद्यक परिचारिका रुग्णसेवा देताना उच्च नैतिक मूल्यांचे पालन करतात. मानवी हक्क, गोपनीयता, निष्पक्षता आणि शास्त्रशुद्धता या तत्त्वांवर आधारित सेवा देणे ही त्यांची व्यावसायिक जबाबदारी असते. परिचारिकांनी आपले ज्ञान व कौशल्य सतत अद्ययावत ठेवून पुराव्यानिशी आधारित परिचर्या (Evidence Based Forensic Nursing Practice) करणे अपेक्षित असते. न्यायवैद्यक परिचर्येतील नोंदी संशोधन, धोरणनिर्मिती आणि न्यायप्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
संदर्भ :
- Hammer, R. M.; Moynihan, B.; Pagliaro, E. M. Forensic Nursing: A Handbook for Practice, 2013.
- Lynch, V. A.; Duval, J. B. Forensic Nursing Science, 2nd Ed., 2011.
- Indian Academy of Forensic Medicine – Guidelines and Publications.
समीक्षक : सरोज वा. उपासनी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
