अमूर्त स्वरूपातील एक चलन. विनिमयाचे माध्यम म्हणून चलनाचा इतिहास हा वस्तूविनिमयापासून ते संगणकयुगातील आभासी चलनापर्यंत अत्यंत रोचक असा आहे. चलन हे व्यवहाराचे माध्यम म्हणून सर्वमान्य आणि सर्वांना स्वीकारार्ह्य होण्यासाठी चलनाला कायद्याचे म्हणजेच शासनाचे पाठबळ असणे आवश्यक ठरते. मग तो विधिग्राह्य म्हणजे कायद्याने मान्य केलेला पैसे ठरतो आणि अशा पैशाद्वारे केले जाणारे व्यवहार हेदेखील कायदेशीर ठरतात.

व्याख्या : यूरोपिअन सेंट्रल बँकेच्या मते, ‘आभासी चलन म्हणजे एक प्रकारचे असे अनियंत्रित अंकीय (डिजिटल) चलन जे प्रामुख्याने अशा चलनाच्या विकासकाकडून नियंत्रित केले जाते आणि विशिष्ट आभासी समुदायाकडून वापरले व स्वीकारले जाते’.

द यु. एस. डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी यांच्या मते, ‘विनिमयाचे असे माध्यम की, जे विशिष्ट परिस्थितीत चलनाप्रमाणे कार्य करते; परंतु खऱ्या चलनाचे गुणधर्म त्यात नसतात. यातील महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे अशा चलनाला विधिग्राह्यता नसते’.

प्रसिद्ध चिनी संगणकतज्ज्ञ वेई दाई (Wei Dai) यांनी १९९७ मध्ये प्रथमतः आभासी चलनाची संकल्पना मांडली. तत्पूर्वी डेव्हिड चौम (David Chaum) या तज्ज्ञाने १९८३ मध्ये ई-कॅश नावाची आभासी चलन प्रणाली सूचविली होती. आभासी चलनाद्वारे लोक अज्ञात राहून विनिमय व्यवहार करू शकतील आणि चलनावर सरकारचे कोणतेही निर्बंध असू शकणार नाही, अशी संकल्पना दाई यांनी मांडली. माहितीचे संरक्षण करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते, त्यास क्रिप्टोग्राफी म्हणतात. असे तंत्रज्ञान वापरून जे आभासी चलन वापरात येते, त्यास क्रिप्टो करन्सी असे म्हणतात. अशा स्वरूपाचे पहिले बिटकॉइन हे आभासी चलन २००८ मध्ये सान्तोशी नाकामोटो या व्यक्तीने शोधले असून ते सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे आभासी चलन २००९ पासून आस्तित्वात आले; मात्र नाकामोटो नामक व्यक्ती किंवा संस्था मुळात आस्तित्वात नसावी, असाही एक प्रवाद आहे. आंतरजालावर उपलब्ध मुक्त मृदुजाल (सॉफ्टवेअर) प्रणालीतून बिटकॉइन आस्तित्वात येतात आणि वितरित केले जातात. बिटकॉइनच्या कार्यप्रणालीत ब्लॉकचेन पद्धती वापरली जाते. एकप्रकारे बिटकॉईनच्या व्यवहाराची ती नोंदवही आहे. ही एक संगणकीय माहिती आहे जी ‘चेन’च्या म्हणजेच सार्वजनिक माहिती (पब्लिक डेटा) या स्वरूपात साठवली जाते.

आभासी चलनाचे महत्त्व : आभासी चलन अंकीय जगातील एक क्रांतिकारी पाऊल असून त्याचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल :

  • जलद व सुलभ व्यवहार : आभासी चलनामुळे प्रत्यक्ष रोख रकमेची आवश्यकता भासत नसून मोठमोठे व्यवहार काही क्षणातच होत असतात. पूर्वी पारंपरिक बँकिंग प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय व्यवहाराला बराच कालावधी लागायचा; मात्र आता आभासी चलनामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार अत्यंत कमी वेळात पूर्ण होतात.
  • व्यवहाराचा खर्च कमी : आभासी चलनांच्या विविध प्रकारांपैकी बहुतेक आभासी चलने ही विकेंद्रित असून व्यवहार करताना बँक किंवा कोणत्याही मध्यवर्ती संस्थेची गरज नसते; ज्यामुळे व्यवहाराचा खर्च कमी होतो.
  • सुरक्षितता व पारदर्शकता : हे व्यवहार ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे अत्यंत सुरक्षित मानले जाते. प्रत्येक व्यवहाराची नोंद सार्वजनिक लेजरमध्ये होत असल्याने त्यात फेरफार करणे कठीण असते. त्यामुळे आभासी चलनाचा व्यवहार हा सुरक्षित व पारदर्शक मानला जातो.
  • बँक खाते विरहित व्यवहार : आभासी चलन व्यवहाराकरिता बँकचे खाते असण्याची आवश्यकता नाही. खात्याशिवायही इंटरनेटच्या साहाय्याने आभासी चलनाद्वारे व्यवहार करता येऊ शकतो. या सेवामुळे दुर्गम भागातील लोकांना मुख्य आर्थिक प्रवाहात येण्यास मदत होते.
  • अंकीय अर्थव्यवस्थेला चालना : भारतात आरबीआय या मध्यवर्ती बँकेने आणलेला अंकीय रुपया (सीबीडीसी) चलन व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यास आणि अंकीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास मदत करत आहे.
  • गोपनीयता : महत्त्वच्या आभासी चलनांमध्ये व्यवहाराची आणि वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती गोपनीय व सुरक्षित असते.

गुंतागुंतीच्या कठीण अशा गणितीय प्रणालीतून बिटकॉइन मिळते. अशा प्रकारे मिळणाऱ्या बिटकॉइनची नोंद आभासी पॉकिटात (व्हर्च्युअल वॉलेट) होते. बिटकॉइनच्या व्यवहारात सहभागी व्यक्तीचे वा संस्थेचे नाव माहित नसते. त्याला फक्त संकेतांक दिला जातो. त्यानुसार सर्व व्यवहार होतात. व्यवहार करायचे आहेत, पण माहिती उघड होऊ नये अशा व्यक्ती आणि संस्थाना बिटकॉइन व्यवहार सोयीचे वाटतात. त्यामुळे या व्यवहारांच्या संख्येत वाढ होत आहे. बिटकॉइनप्रमाणे इतरही आभासी चलन जगात आहेत. उदा., लिटकॉइन (२०११). बिटकॉइन आस्तित्वात आले, त्या वेळी बिटकॉइनचा दर प्रति १ डॉलर इतका होता; मात्र त्याच्या लोकप्रियतेमुळे आता १ बिटकॉइन = ५०० डॉलर पेक्षा अधिक इतका दर आहे. अर्थात यात दररोज चढ उतार होत असतात.

आभासी चलनाचे तोटे : आभासी चलनाचे(Virtual Currency) फायदे असले तरी, त्यामध्ये काही गंभीर तोटे आणि धोके देखील आहेत. मुख्य तोटे खालीलप्रमाणे आहेत :

  • सुरक्षेचा अभाव : आभासी चलनामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरी हे चलन ज्या अंकीय पॉकीट किंवा इतर ठिकाणी साठवले जाते, ते सायबर हल्ल्यांना किंवा हॅकिंग यांसारख्या प्रकाराला बळी पडू शकतात. त्यामुळे आभासी चलन हे कितपत सुरक्षित आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
  • कायदेशीर संरक्षणाचा अभाव : बहुतेक आभासी चलने हे स्वनियंत्रित असून ते कोणत्याही कायदेशीर मध्यवर्ती बँकेद्वारे नियंत्रित नसतात. त्यामुळे एखाद्या वापरकर्त्याची फसवणूक झाल्यास किंवा तांत्रिक बिघाडामुळे पैसे गमाविल्यास तक्रार करण्यासाठी कोणतीही अधिकृत संस्था किंवा कायदेशीर यंत्रणा उपलब्ध नाही.
  • अस्थिर किंमत : आभासी चलनांच्या किमतीत दिवसागणिक खूप वेगाने चढ-उतार होत असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो.
  • अदेय व्यवहार : आभासी चलनाद्वारे एखादा व्यवहार पूर्ण झाला की, तो पुन्हा रद्द करता येत नाही किंवा मागे घेता येत नाही. तसेच जर व्यवहार करताना चुकून एका चुकीच्या पत्त्यावर पैसे पाठवले गेले, तर ते परत मिळविणे अशक्य असते.
  • चलनाचा गैरवापर : आभासी चलन हे गोपनीय असल्यामुळे त्याचा वापर काळा पैसा पांढरा करणे, अमली पदार्थांची तस्करी करणे, दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करणे इत्यादींसाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • पासवर्ड विसरण्याचा धोका : आभासी खाते उघडताना वापरकर्त्याला स्वत:चा पासवर्ड निर्माण करायचा असतो. त्याद्वारे तो आपले आभासी खात्यातून व्यवहार करत असतो; मात्र जर तुम्ही तुमचा हा खाजगी पासवर्ड विसरलात, तर तुम्ही तुमच्याकडील सर्व आभासी चलन कायमचे गमावू शकता.
  • मर्यादित वापर : आभासी चलनाचे काही फायदे जरी असले, तरी अजूनही खरेदी-विक्रीसाठी किंवा दैनंदिन व्यवहारांसाठी प्रत्यक्ष चलनाचा किंवा इतर रोख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

आभासी चलनात कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांचे नाव नसते. या चलनावर केवळ सॉफ्टवेअरचे नियंत्रण असून सर्व व्यवहार संकेतांकाच्या आधारे होतात. त्यामुळे बेकायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता यात वाढते. अमेरिका, कॅनडा ऑस्ट्रलिया, यु. के. इत्यादी देशांनी मर्यादित स्वरूपात व नियमांच्या चौकटीत या चलनाला मान्यता देण्यास अनुकूलता दर्शविलेली असली, तरी अनेक देशांनी अद्यापही आभासी चलनाला अशी मान्यता दिलेली नाही. चीन या देशाने तर यावर बंदीच घातलेली आहे.

संदर्भ :

  • कहाते, अतुल, बिटकॉइन : आभासी चलनाची अद्भुत दुनिया, सकाळ प्रकाशन, २०१८.
  • गोविलकर, वि. म., अर्थजिज्ञासा : आर्थिक संकल्पनांचा अर्थ आणि आशय, पुणे, २०१९.
  • साळगावकर, जयराज, बिटकॉइन : चलनक्रांतीच्या एक पाऊल पुढे, परम मित्र प्रकाशन, २०१९.

समीक्षक : संतोष दास्ताने


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

This Post Has One Comment

  1. अनंत कापसे

    क्रिपटो करंन्सी ला भारतात प्रचंड पाठबळ मिळत आहे अंतरजाळा वरील माहिती वरून हे स्पष्ट होते

Leave a Reply