राव, वेलचाला प्रवीण : (१७ जानेवारी १९५९). भारतीय कृषितज्ज्ञ. शिक्षक, संशोधक आणि सक्षम प्रशासक म्हणून त्यांचे कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.
राव यांचा जन्म तेलंगणा राज्यात झाला. आई-वडिलांसह इतर शेतकऱ्यांना शेतकामात मदत करत असताना बालवयातच त्यांच्यात शेती आणि विज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. शालेय शिक्षणानंतर त्यांनी आंध्रप्रदेश कृषी विद्यापीठातून कृषिशास्त्र विषयातील पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी उष्णकटिबंधीय शेती पिकांसाठी सिंचनाद्वारे खतांचे कार्यक्षम व्यवस्थापन, पीक उत्पादनआधारित जल नियोजन आणि जलसिंचनाच्या वेळापत्रकातून पिकाची उत्पादकता वाढवण्याचा अभ्यास करून परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठातून (सध्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ) पीएच.डी. पदवी प्राप्त केली. तसेच इस्रायलची मशाव अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) मिळाल्यानंतर पाच वर्षे त्यांनी बेन-गुरीयन विद्यापीठात जल व्यवस्थापन आणि सूक्ष्मसिंचनासंबधित पुढील संशोधन केले. नंतर ते आंध्रप्रदेश कृषी विद्यापीठात (नामांतरानंतरचे आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ) सहायक कृषिवेत्ता म्हणून रुजू झालेत. पुढे त्यांनी येथेच सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, विस्तार कृषिशास्त्रज्ञ, संचालक, जल तंत्रज्ञान केंद्र कुलसचिव आणि विशेष अधिकारी अशा विविध पदांवर काम केले. हैदराबादच्या प्रोफेसर जयशंकर तेलंगणा ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये ते कुलगुरूही होते. सध्या ते कावेरी विद्यापीठात कुलगुरू पदावर कार्यरत आहेत.
राव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात नव्या कल्पना राबविल्या आहेत. जल तंत्रज्ञान केंद्राचे संचालक असताना त्यांनी खारवट जमिनीचे नकाशे तयार करवून जमीन उपयोगात आणली. भात व विविध पिकांमध्ये ठिबक सिंचनाचे वेळापत्रक निर्धारित करून पाण्याची उत्पादन क्षमता व पिकांची उत्पादकता वाढवली. त्यांनी बियाणे उत्पादन, बियाण्यांचे गाव (Seed village) संकल्पना, बियाण्यांचे मेळावे, विकेंद्रित मूल्यवर्धन आणि बाजारपेठांवर आधारित उत्पादनासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देणे अशा अनेक योजना विद्यापीठात कार्यन्वित केल्या. त्यांनी विद्यापीठात स्थापन केलेले ॲग्रीहब हे नाविन्यता केंद्र उद्योजक, कृषी व्यवसाय, नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानातील नवोद्योजक आणि ग्रामीण उपजीविकेला साहाय्य करते. सध्या अनेक कृषी नवोद्योजक ॲग्रीहबसोबत शेतीविषयक समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, संगणक नियतरीती (अल्गोरिथम) आधारित तंत्रज्ञान, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, संवेदके आणि भौगोलिक पद्धतींचा वापर करून तोडगा काढतात आणि उत्पादनांचे शेतकऱ्यांच्या शेतातच प्रमाणिकरण करतात. त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या साहाय्याने तेलंगणा राज्यातील नागरिकांच्या अन्न वापराच्या सवयीबद्दल शास्त्रीय अभ्यास केला. यातून आलेल्या निष्कर्षांची राज्य सरकारला नागरिकांची अन्न व पोषणसुरक्षा निश्चित करण्यासाठी ‘पीक धोरण’ ठरविण्यात मोलाची मदत झाली. राज्यातील ३१ जिल्ह्यात माती परीक्षण करून मातीची सुपीकता निश्चित केली गेली. त्या निष्कर्षांचे एका नकाशाच्या रूपाने आलेले प्रकाशन नीतिरचनाकार, पर्यावरणवादी, विस्तार कार्यकर्ते आणि खते निर्मात्यांना त्यांचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मदतगार ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करोनासंकटकाळी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठात प्रात्यक्षिक आणि वर्ग अध्यापनात ई-लर्निंग ही आधुनिक शिक्षणपद्धती प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी सहज हाताळली. इररी (IRRI), इक्रीसॅट (ICRISAT), कॉर्नेल युनिव्हर्सिटी, वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॉरिडा, युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहेम इत्यादींसोबत सहकार्य आणि साथीदारी करण्यासाठी राव यांच्या पुढाकाराने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळाला. त्यांच्या नेतृत्त्वांतर्गत,विद्यापीठाने हवामानाला सामोरे जाणारे, अधिक उतारा देणारे, पौष्टिक गुणधर्म असलेले निरनिराळ्या पिकांचे ४६ वाण विकसित करून प्रसारित केले. तांदळाच्या वाणांनंतर (उदा., तेलंगणा सोना, जेजीएल २४४२३ आणि कुणाराम सन्नालू) तेलंगणा राज्यातील ३० लक्षाहून अधिक शेतकऱ्यांबरोबर भारतातील आठ प्रमुख भात उत्पादक राज्यांमध्ये सुधारित वाण लोकप्रिय केले. प्रगत वाणाबरोबर उत्कृष्ट कृषी विस्तार माध्यमातून संसाधन संवर्धन करणाऱ्या धान्य उत्पादनांच्या योग्य पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यामुळे राज्यातील भात लागवडचे क्षेत्र आणि उत्पादन तिपटीने वाढले. त्यामुळे तेलंगणा राज्याला ‘देशाचे उदयोन्मुख भातपिकांचे कोठार’ म्हणून आळोख मिळाली. असेच यश हरभरा व राज्यातील इतर प्रमुख पिकांच्या बाबतीत नोंदवले गेले. त्यांनी तांत्रिक सल्लागार म्हणून जगातील सर्वांत मोठा आंध्र प्रदेश सूक्ष्मसिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. हा प्रकल्प विभाजन पूर्व आंध्र प्रदेशातील २३ जिल्ह्यात राबविला गेला. या त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील १२ लक्षापेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत झाली. हा प्रकल्प भारतीय कृषी क्षेत्रातील एक मैलाचा दगड होता.
राव यांनी नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याच्या आकांक्षा लक्षात घेऊन शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कृषी पर्यावरण आधारित संशोधन उपक्रमाला चालना देण्यासाठी कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी तंत्रनिकेतन आणि संशोधन केंद्र अशा अनेक नवीन कृषी संस्था सुरू केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली या विद्यापीठांना भारतातील सर्वोच दहा कृषी विद्यापीठांमध्ये मानांकन मिळाले. दिल्लीच्या इंडियन काऊन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्चकडून इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स पुरस्कार आणि विद्यापीठाधीन १३ संशोधन आणि विस्तार केंद्रांना सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्कार मिळाले.
राव अनेक राज्य सरकारांच्या सिंचन सल्लागार गटांवर मार्गदर्शक होते. तेलंगणा राज्याचा शेतीक्षेत्राच्या वाढीचा दर ८-१० % राखला गेला. आजवर १९८ सूक्ष्मसिंचन प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले. ऊसासाठी ठिबकसिंचनाचा प्रभावी वापर करता येतो हे त्यांनी दाखवून दिले आणि अन्य अनेक पिकांसाठी सूक्ष्मसिंचन हाच किफायतशीर पर्याय असू शकतो, हेही त्यांच्या प्रयोगांमुळे अनेक शेतजमिनींमध्ये सिद्ध झाले. यापैकी तेलबिया प्रकल्पांसाठी त्यांनी केलेले सिंचन-मार्गदर्शन विशेष उल्लेखनीय आहे.
राव इस्रायलतर्फे आशिया-पॅसिफिक, आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन देशांना जलसंधारण तंत्रज्ञानाच्या सूक्ष्मसिंचन पद्धतींचे मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ गटात सूक्ष्मसिंचन सल्लागार म्हणून सामील झाले होते. त्यांनी दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील २०हून अधिक देशांमध्ये धान्यपिके, कंद, ऊस, भाजीपाला, फळबाग पिकांमध्ये भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचनाला चालना देण्यासाठी विकासात्मक प्रकल्प हाताळले. त्यांनी पिकांचे सूक्ष्म सिंचन आणि फलन, पाण्याच्या कमतरतेचे इष्टतम वाटप, ठिबक आरेखन मसुदा आणि ठिबक सिंचनक्षेत्र, भाजीपाला, कंद,धान्य पिके, फळबागा आणि वनवृक्षपिके यांसाठी अनेक संशोधन केले. सध्या त्यांचा वापर भारत आणि दक्षिण आशिया, आग्नेय आशिया येथील शेतकरी, सिंचन नियोजक आणि कृषी अभियंता करत आहेत. त्यांच्या मते, ओलीत (जलसिंचन) हे जमिनीला पूर्ण ओलेचिंब करण्यासाठी नव्हे तर पिकाच्या गरजेनुसार दिले पाहिजे. त्यामुळे पाण्यासारख्या अमूल्य संसाधनाच्या अपव्य टाळता येतो. या तत्त्वावर ठाम राहून त्यांनी भात पिकामध्ये अतिउपयोगामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी‘जमिनीला आळीपाळीने ओलीत देणे-कोरडे होऊ देणे’ या एका नाविन्यपूर्ण शास्त्रीय पाणी व्यवस्थापन पद्धतीची तेलंगणातील भात शेतकऱ्यांना ओळख करून दिली. यापद्धतीला शेतकऱ्यांची पसंती मिळत असून भात पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम न होता पाण्याची, विजेची व मनुष्यबळाची बचत होत आहे.
राव यांचे शेती क्षेत्रातील, मुख्यत्वे भारतीय शेतकरी समाजाची उपजीविका उत्थानासाठी असलेले मोलाचे योगदान ओळखून त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यांना स्वामिनाथन पुरस्कार, शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार, धोरणात्मक सर्वोत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, जगातील सर्वांत व्यापक सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबवल्याबद्दल भारतीय मृदा संवर्धन सोसायटी यांचा जीवनगौरव पुरस्कार, भारत, आफ्रिका, आणि दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये सूक्ष्म जलसिंचनाचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल नेतृत्व पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांना अनेक मंडळे आणि संस्थांची अधिछात्रवृत्ती मिळाली. त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, नवी दिल्ली या संस्थेचे सल्लागार म्हणून योगदान दिले. ते अमेरिकन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी, क्रॉप सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका, सॉईल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका, अमेरिकन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल आणि बायोलॉजिकल इंजिनिअर्स, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हॉर्टिकल्चरल सायन्स, एशियन पीजीपीआर सोसायटी ऑफ सस्टेनेबल ॲग्रीकल्चर अशा अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत. तसेच ते इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी, इंडियन सोसायटी ऑफ प्लांट फिजिओलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स, इंडियन सोसायटी ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स आणि सॉईल अँड वॉटर कॉन्झर्व्हेशन सोसायटी ऑफ इंडिया इ. राष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्य आहेत.
राव यांची ३८०हून अधिक प्रकाशने आणि १४० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकातून प्रकाशित आहेत. त्याव्यतिरिक्त दहा पुस्तके, अनेक शेत भिजवण (फील्ड इरिगेशन) मार्गदर्शिका, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सादरीकरणे असा त्यांचा लेखनप्रपंच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ११ पदव्युत्तर आणि ११ पी.एचडी. विद्यार्थ्यांनी संशोधन केले. त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी संकेतस्थळ विकसित केले. भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्समधील शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे शाश्वत ऊस उत्पादन व्हावे म्हणून या संकेतस्थळाचा वापर करतात.
राव बियाणे उत्पादन, ॲग्रोव्होल्टेइक पीक मॉडेल्समधील ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर ॲग्री-नवउद्योजकताच्या सहकार्याने उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करीत आहेत.ते भारत सरकार व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध समित्या व मंडळांचे सभापती आणि सदस्य म्हणून सेवा देत आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक राष्ट्रीय, राज्य आणि भारतीय प्रादेशिक मंडळे आणि कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयीन समित्यांचे सदस्य, अध्यक्ष आणि तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
कळीचे शब्द : #खारवट #कृषी नवउद्योजकता # ॲग्रीहब
संदर्भ :
- https://pjtsau.edu.in/VPRao_VC_Aptmnt.html
- https://360degree.news/top-news/meet-dr-praveen-rao–vc-of-telangana..
- https://www.pjtsau.edu.in/our-vice-chancellor.html
- https://m.edexlive.com/news/2021/dec/08/dr-praveen-rao-vc-telanganas
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.