फुंज, ईनेझ : (११ एप्रिल १९४९). चिनी पर्यावरणतज्ज्ञ. कॅलिफोर्निया विद्यापीठात वातावरणीय विज्ञानाच्या प्राध्यापिका आणि पृथ्वी-ग्रह विज्ञान विभाग व पर्यावरण विज्ञान, धोरण-व्यवस्थापन विभागात संयुक्तपणे नियुक्तीत आहेत. त्या बर्कले इन्स्टिट्यूट ऑफ द इन्व्हायर्नमेंटच्या सह-संचालक देखील आहेत.
फुंज यांचा जन्म हाँगकाँग येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिशनरी मुलींच्या शाळेत झाले. किंग्स कॉलेज हाँगकाँग येथून त्या पदवीधर झाल्यात (१९६७). चीनमध्ये १९६७ ला झालेल्या सांस्कृतिक क्रांतीमुळे त्यांनी नॉर्थ अमेरिकेला प्रयाण केले. न्यूयॉर्क राज्यातील सिरॅक्यूज विद्यापीठातील युटिका महाविद्यालयात प्रवेश केला, परंतु नंतर त्यांनी मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रवेश करून उपयोजित गणितातील बी.एस्सी. पदवी संपादन केली. (१९७१). पुढे त्यांनी तेथूनच हवामानशास्त्र विषयातील एस्सी.डी. (डॉक्टर ऑफ सायन्य) पदवी संपादन केली (१९७७). त्यांनी नंतर विद्युत अभियांत्रिकीच्या द्रायुगतिकी (फ्लुइड डायनॅमिक्स) विषयाचा अभ्यास केला. पदवी घेतल्यावर त्यांनी नासामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्या नासा येथे कार्यरत होत्या. नंतरही त्यांची नासामध्ये ‘गुणश्री शास्त्रज्ञ’ म्हणून नेमणूक करण्यात आली.
फुंज यांनी गणिती ज्ञानाला द्रायुगतिकीच्या ज्ञानाची जोड दिली. नासाचे अवकाशवीर पृथ्वीवर परत येताना पॅसिफिक महासागरात उतरतात, त्यामुळे सागरी प्रवाहांचा आणि वादळांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला. द्रायुगतिकीच्या साहाय्याने धुळीच्या वादळांचा आणि सागरी वादळांचा अंदाज घेणे शक्य झाले. त्यांच्या अभ्यासातून त्यांनी बदलत्या जलवायुमानाचा धोका ओळखला आणि त्याबद्दल पूर्वसूचना देणारी प्रणाली कार्यरत करता आली. जमीन तापण्यापासून हवेच्या वरच्या थरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास जलवायुमानात होतो. गेल्या १२२ वर्षात सर्वाधिक उष्ण दिवस, अवकाळी पाऊस, त्यामुळे पिके धोक्यात येणे, गडगडाटी पावसात वीज पडून गुरे मरणे इत्यादी बाबी जलवायुमानाशी संबंधीत असतात.
फुंज यांच्या मते त्यांनी केलेल संशोधन जनसामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवले पाहिजे. ‘पृथ्वीचा शुक्र होईल’ म्हणजे शुक्र ग्रहावर झालेले वातावरणीय बदल भविष्यात पृथ्वीवरही होण्याची शक्यता आहे. खनिज इंधनाचा वापर करीत राहिल्यामुळे ध्रुवीय बर्फ वितळेल. त्याचा सागरी प्रवाहावर परिणाम होईल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
फुंज यांना नासाने ‘गुणश्री शास्त्रज्ञ’ पदाने सन्मानित केले (२०१९). नासामध्ये असे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. त्यांना पुढीलप्रमाणे अनेक मान-सन्मान प्रदान करण्यात आले आहे : रॉस्बी ॲवॉर्ड (१९७७), नासा एक्सेप्श्नल सायंटिफिक अचिव्हमेंट मेडल (१९८९), रॉजर रेव्हेल मेडल (२००४) इत्यादी.
कळीचे शब्द : # जलवायुमान #नासा
संदर्भ :
- Skelton, Rainy, Forcast Earth : The story of Climate Scientist Inez Fung, 2006.
समीक्षक : अ. पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.