अभिजात हिंदुस्थानी संगीतातील एक गायनप्रकार. तो सुगम शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत विभागात गणला जातो. सुरुवातीला भारताच्या उत्तर भागात प्रामुख्याने वाराणसी आणि आसपासच्या परिसरात याचे गायन केले जात असे. तेथे ग्रामीण भागात याचे गायन विवाह, उत्सव, धार्मिक कार्य यांमध्ये स्थानिक परंपरागत गायक करीत असत. नंतर अर्धशास्त्रीय संगीतामध्ये या प्रकाराला स्थान मिळाले. चैती हा प्रकार उत्तर भारतीय संगीत परंपरेतील अनुक्रमे होरी, चैती, कजरी, सावनी या ऋतुगीतांमध्ये गणला जातो.
भारतीय संस्कृतीनुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र होय. या महिन्यात उन्हे तापायला सुरुवात झालेली असते. शेतातील पिकांची कापणी, झाडांची नवीन पालवी, कोकिळेचे कुंजन, सुंगधित वारा, चैतन्यदायी संध्याकाळ, मधूर चांदणी असे आल्हाददायक वातावरण सभोवताली पसरलेले असते. या वातावरणाला साजेशी आणि त्याचा परिचय करून देणारी लोकगीताचा ढंग असलेली गीते म्हणजे चैती गायली जातात. रामजन्म, त्यांचा विवाह, श्रीकृष्णाच्या लीला, होळीचे वर्णन, प्रेम आणि श्रृंगाररस, निसर्गवर्णन, लोकरीती इत्यादी विषयांचा समावेश असलेला हा गानप्रकार आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या रामजन्माचे निमित्त साधून अनेक गीते यात रचलेली दिसून येतात. सर्वसाधारणपणे या गीतांत प्रत्येक ओळीनंतर किंवा कडव्यानंतर ‘रामा’ हा शब्द आलेला आढळतो. उदा., “राजत राम सिय साथे हो रामा, अवध नगरिया। माता कौशल्या तिलक लगावे, सुमित्रा के हाथ सोहे पनमा हो रामा,अवध नगरिया।।
चैती गायनात बसंत आणि त्यामध्ये इतर रागांचे मिश्रणही दिसून येते. चैती गायनाचे चैती, चैता, घाटो, चैता दंगल असे प्रकार आहेत. काफी, पिलू, पहाडी या रागांमध्ये आणि दीपचन्दी, अध्धा, कहरवा या तालांमध्ये या गीतांच्या रचना केलेल्या दिसून येतात. गिरिजादेवी, शोभा गुर्टू, रसूलनबाई या गायिकांचे आणि भारतरत्न बिस्मिल्लाखाँ या सनईवादकांचे या कलाप्रकारावर प्रभुत्व होते. त्यांनी याचा प्रसार आपल्या कलेद्वारे भारतभर केला.
संदर्भ :
- Ranade, Ashok, Hindustani Music, 2006.
समीक्षण : वर्षा देवरुखकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.