प्रस्तावना : आरोग्य सेवेमध्ये औषधोपचार (Medication Therapy) हा रुग्णांच्या उपचार व्यवस्थापनाचा कणा मानला जातो. रुग्णास विविध आजारांमध्ये तोंडावाटे दिली जाणारी औषधे (Oral Medications) ही सर्वाधिक वापरली जाणारी, सुलभ व तुलनेने सुरक्षित औषध देण्याची पद्धत आहे. या पद्धतीत औषधे तोंडावाटे देऊन ती पचनसंस्थेद्वारे (Gastrointestinal Tract) शोषली जातात व रक्ताभिसरण प्रणालीत (Systemic Circulation) प्रवेश केल्यानंतर त्यांचे शरीरात अभिसरण होते तथापि, औषध देण्यामध्ये झालेली कोणतीही चूक (Medication Error) रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे योग्य रुग्ण, योग्य औषध, योग्य तेवढी मात्रा किंवा डोस तसेच रुग्णाची औषध देण्यापूर्वीची योग्य तयारी, औषध देण्याचे दहा नियम व तत्त्वे (Ten Rights) आणि औषध दिल्यानंतरचे निरीक्षण इ. परिचारिकेची व्यावसायिक, नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे.
व्याख्या : रुग्णाला तोंडावाटे दिली जाणारी व पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊन शरीरावर उपचारात्मक परिणाम (Therapeutic Effect) करणारी औषधे म्हणजे तोंडावाटे दिली जाणारी औषधे (Oral Medications) होय.
रुग्णास तोंडावाटे औषधे देण्याचे निकष : १) रुग्ण शुद्धीत असून गिळण्यास सक्षम असेल; रुग्णाला मधुमेह, रक्तदाब यांसारखे दीर्घकालीन आजार झाले असतील; बाह्यरुग्ण उपचार सुरू असतील; स्वयंऔषधोपचारासाठी रुग्ण सक्षम असेल इत्यादी परिस्थितींमध्ये रुग्णाला तोंडावाटे औषधे दिली जातात. २) रुग्ण बेशुद्धावस्थेत असेल, त्याला तीव्र उलटी किंवा मळमळ होत असेल, गिळण्यास अडचण येत असेल (dysphagia), आतड्यांची हालचाल मंदावलेल्या स्थितीमध्ये असेल, औषध शोषण प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे आजार झाले असतील (Malabsorption) इत्यादी परिस्थितींमध्ये रुग्णाला तोंडावाटे औषधे देऊ नयेत.
तोंडावाटे द्यावयाच्या औषधांचे प्रकार (Types of Oral Medications) :
- घन स्वरूपातील औषधे (Solid Dosage Forms) उदा., गोळ्या (Tablets), संपुटिका (Capsules), चघळण्याच्या गोळ्या (Chewable Tablets) इ.
- द्रव स्वरूपातील / पातळ औषधे, उदा., सिरप (Syrups), साधारण मध्यम स्वरूपातील घट्ट औषधे (Suspensions), द्रावण (Solutions) इ.
- विशेष स्वरूपातील औषधे, उदा., जिभेखाली ठेवण्याची औषधे (Sublingual Drugs).
- हळूहळू परिणाम देणारी किंवा दिसून येणारी औषधे (Sustained / Controlled Release).
- पाण्यात विरघळवून देण्यात येणारी औषधे (Effervescent Preparations).
औषध देण्यापूर्वी रुग्णाची तयारी : औषध देण्यापूर्वी रुग्णाची योग्य तयारी करणे ही औषध सुरक्षिततेची (Medication Safety) अत्यावश्यक पायरी आहे. उदा., १) रुग्णाची ओळख : तोच रुग्ण असल्याची खात्री करणे (Patient Identification), २) रुग्णाची शुद्धावस्था व गिळण्याची क्षमता तपासणे, ३) रुग्णास एखाद्या औषधाची अधिहर्षता किंवा विपरीत परिणाम इ. माहितीचा इतिहास विचारणे (History of Drug Allergy), ४) रुग्णाने काही खाल्ले आहे का? किंवा रुग्ण उपाशी पोटी आहे? (Fasting Status) याची चौकशी करावी, ५) औषधाबाबत रुग्णाला माहिती देणे (Patient Education), ६) आवश्यक असल्यास तोंड स्वच्छ करण्यास सांगणे, ७) रुग्णास योग्य स्थितीत बसवणे (Upright Position).
रुग्णास औषध देण्याची दहा तत्त्वे (Ten Rights of Medication) :
- योग्य रुग्ण (Right Patient)
- योग्य औषध (Right Drug/Medicine )
- योग्य मात्रा (Right Dose)
- योग्य वेळ (Right Time)
- योग्य मार्ग (Right Route)
- योग्य आणि आवश्यक अशी लिखित नोंद ठेवणे (Right Documentation)
- रुग्णास योग्य किंवा आवश्यक त्याच कारणासाठी औषध देणे (Right Reason)
- रुग्णातील योग्य त्या / अपेक्षित आणि अनपेक्षित परिणामाचे मूल्यांकन करणे (Right Response)
- रुग्णास योग्य आणि गरजेचे रुग्ण शिक्षण किंवा माहिती पुरविणे (Right Education)
- रुग्णास औषध नाकारण्याचा अधिकार (Right to Refuse the medication)
रुग्णास तोंडावाटे औषध देताना परिचारिकेची जबाबदारी :
- औषध देण्यापूर्वी : वैद्यकीय आदेशाची तपासणी (Medication Order), औषधाची समाप्ती तारीख पाहणे (Expiry Date), औषधाची योग्य मात्रा /डोस निश्चित करणे इ.
- औषध देताना : स्वच्छ व सुरक्षित पद्धतीने देणे, रुग्णास औषध चघळायचे, गिळायचे किंवा तोंडात ठेवून विरघळवायचे हे स्पष्ट करणे, रुग्णाने औषध पूर्णपणे गिळल्याची खात्री करणे इ.
- औषध दिल्यानंतर : रुग्णास औषध दिल्याची नोंद करणे, औषधाचे परिणाम – दुष्परिणाम यांचे निरीक्षण ठेवणे, रुग्णास औषधाची पुढील किंवा फेर मात्रा घेण्यासाठी मार्गदर्शन देणे.
सारांश : तोंडावाटे औषधोपचार ही प्रभावी उपचारपद्धती असली तरी रुग्णाची पूर्वतयारी, औषधांचे प्रकार, औषध देण्याची दहा तत्त्वे आणि परिचारिकेने घ्यावयाची दक्षता या सर्व घटकांवर रुग्णातील औषधोपचाराचे यश अवलंबून असते. वैज्ञानिक तसेच शास्त्रशुद्ध ज्ञान व नैतिक जबाबदारी यांचा समन्वय साधणारी परिचारिका औषधोपचार प्रक्रियेत रुग्ण सुरक्षेची हमी देते.
संदर्भ :
- Berman, A.; Snyder, S.; Frandsen, G.; Kozier & Erb’s Fundamentals of Nursing, Pearson, 2023.
- Indian Nursing Council, Standards of Nursing Practice, INC, 2021.
- Kee, J. L.; Marshall, S. M.; Woods, M. Clinical Calculations, Elsevier, 2022.
- Potter, P. A.; Perry, A. G.; Stockert, P.; Hall, A. Fundamentals of Nursing 10th, Elsevier, 2021.
- World Health Organization Medication Safety in Nursing Practice, WHO, 2020.
समीक्षक : सरोज वा. उपासनी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.