द्राविडी भाषासमुहातील एक भाषा. कोंडा भाषा प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम्, विशाखापटनम्, पूर्व व पश्चिम गोदावरी, पार्वतीपुरम् मन्याम जिल्ह्यात आणि ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात राहणारे ‘कोंड-दोरा’ या अनुसूचित जमातीचे लोक बोलतात. २०११ च्या जनगणनेनुसार कोंडा भाषेच्या मूळ भाषकांची संख्या ६१,००० इतकी होती. ही भाषा कोंडा-दोरा किंवा कुबी या नावानेही ओळखली जाते. तेलुगु भाषेमध्ये ‘कोंड’ म्हणजे टेकडी किंवा डोंगर आणि ‘दोरा’ म्हणजे स्वामी, प्रमुख किंवा सरदार. ‘कोंडा-दोरा’ म्हणजे डोंगराळ प्रदेशाचे स्वामी/प्रमुख. त्यावरून या भाषेला ‘कोंडा-दोरा’ भाषा असे नाव प्राप्त झाले.
कोंडा भाषा द्राविडी भाषासमुहाच्या ‘मध्य द्राविडी’ शाखेत वर्गीकृत केली जाते. मध्य द्राविडी शाखेत कुई, कुवी, खोंड, कोलामी, कोंडा, नायकी, परजी, कोया, ओल्लारी, सालूर, गोंडी इ. भाषांचा समावेश होतो. त्यामुळे कोंडा भाषेचा संबंध या शाखेतील भाषांबरोबरच तेलुगु आणि ओडिया भाषांशी येतो. कोंडा भाषेत ओडिया आणि तेलुगु भाषेतून बराच शब्दसंग्रह घेतला आहे. मध्य द्राविडी भाषा इ. स.पूर्व अनेक शतके आदि-द्राविडच्या दक्षिण शाखेपासून वेगळ्या झाल्या, असे मानले जाते. कोंडा भाषा आदि-मध्य-द्रविडीयनची अनेक वैशिष्ट्ये जपते. कुवी आणि कुईशी तिचा जवळून संबंध येतो. तसेच, तिचा पेंगो आणि मांडाशीदेखील अधिक जवळून संबंध दिसून येतो. कोंडा भाषा आंध्र प्रदेशात तेलुगु लिपीत आणि ओडिशामध्ये ओडिया लिपीत लिहिली जाते. भारतीय भाषाशास्त्रज्ञ सतुपती प्रसन्न श्री यांनी या भाषेसाठी एक स्वतंत्र लिपी तयार केली आहे.
व्याकरणिक वैशिष्ट्ये
स्वर : कोंडा भाषेत पाच स्वर आहेत. तसेच स्वरांचे प्रत्येकी ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन प्रकार आहेत. अशा प्रकारे एकूण दहा स्वरस्वनिम असून, बहुतांश द्राविड भाषांमधील हे एक प्रमाणभूत वैशिष्ट्य आहे. कोंडा भाषेत स्वरांचा ऱ्हस्व-दीर्घ असा भेद केवळ शब्दाच्या आरंभीच्या स्थानावर असतानाच स्पष्टपणे ओळखला जातो. कोंडा भाषेत संयुक्त स्वर (Diphthongs) अस्तित्वात नाहीत, परंतु काही प्रसंगी दोन स्वर एकमेकांच्या पाठोपाठ येऊ शकतात. अशा स्थितीत, दोन्ही स्वरांचे उच्चारण स्वतंत्रपणे केले जाते आणि हे उच्चारण शब्दांमधील विलगीकरण (Separation) दर्शवते.
| कोंडा भाषेतील स्वर-स्वनिम | ||||
| स्थान/ स्थिती | उच्च/संवृत | मध्य/अर्ध-संवृत | निम्न /विवृत | |
| अग्र | ऱ्हस्व | i | e | |
| दीर्घ | iː | eː | ||
| मध्य | ऱ्हस्व | a | ||
| दीर्घ | aː | |||
| पश्च | ऱ्हस्व | u | o | |
| दीर्घ | uː | oː | ||
व्यंजने : कोंडा भाषेतील व्यंजने तेलुगुशी जवळजवळ जुळणारी आहेत. असे असले तरी काही किरकोळ फरकही आहेत. तेलुगु भाषेत नसलेला कंठद्वारीय स्पर्श ध्वनी (Glottal stop) /ʔ/ कोंडा भाषेत स्वनिमिक आहे. कोंडा भाषेत असलेला हा ध्वनी दक्षिण आशियातील भांषांमध्ये दुर्मिळ आहे. हा ध्वनी /r̥/, /ɳ/, आणि /ŋ/ प्रमाणे, शब्दाच्या सुरुवातीला येत नाही. सर्व व्यंजने दोन स्वरांच्या मध्ये येऊ शकतात. कोंडा भाषेतील सर्व व्यंजने शब्दाच्या सुरुवातीला अंत्य स्थानापेक्षा अधिक स्पष्टपणे उच्चारली जातात.
| कोंडा भाषेतील व्यंजने | ||||||
| ओष्ठ्य | दंत्य/दंतमूलीय | मूर्धन्य | मृदूतालव्य | कंठद्वारीय | ||
| स्पर्श | अघोष | p | t | ʈ | k | ʔ |
| घोष | b | d | ɖ | ɡ | ||
| घर्षक | अघोष | s | h | |||
| घोष | z | |||||
| कंपनयुक्त | अघोष | r̥ | ||||
| घोष | r | |||||
| अर्धस्वर/अन्तःस्थ | मध्यवर्ती | w | j | |||
| पार्श्विक | l | ɭ | ||||
| अनुनासिक | m | n | ɳ | ŋ | ||
| ताडित | ɾ | ɽ | ||||
कोंडा भाषेत व्यंजने दोन मुख्य श्रेणींमध्ये मोडतात : अवरोधक (obstruent) आणि स्वरवाचक (sonorant). अवरोधकांमध्ये सर्व स्पर्श व्यंजने, घर्षक आणि कंपित व्यंजने समाविष्ट होतात व त्यांच्यामध्ये घोष-अघोष भेद केला जातो. या उलट, स्वरवाचकांमध्ये अनुनासिके, अंतस्थ व्यंजने, ताडित व्यंजने तसेच कंठद्वारीय स्पर्श व्यंजने यांचा समावेश होतो. ही सर्व व्यंजने (नेहमी अघोषच असणाऱ्या कंठद्वारीय स्पर्श व्यंजनाचा अपवाद वगळता) घोष असतात.
कोंडा भाषेतील दोन किंवा तीन व्यंजनांनी बनलेली संयुक्त व्यंजने (Consonant clusters) प्रामुख्याने स्वरांच्या मध्ये (Intervocalic position) आढळतात आणि ती शब्दाच्या सुरुवातीला आढळणे अत्यंत दुर्मिळ आहे.
दोन व्यंजनांनी बनलेल्या संयुक्त व्यंजनांचे वर्गीकरण खालील चार स्तरांवर केले जाते :
- अवरोधक + अवरोधक
- स्वरवाचक + स्वरवाचक
- अवरोधक + स्वरवाचक
- स्वरवाचक + अवरोधक
संयुक्त व्यंजनांत, कंठद्वारीय स्पर्श व्यंजन पहिल्या स्थानावर येत नाही आणि /r̥/ दुसऱ्या स्थानावर येत नाही. तीन व्यंजनांची जवळपास सर्वच संयुक्त स्वरवाचक + अवरोधक + स्वरवाचक या एकाच विशिष्ट क्रमाची आहेत.
व्याकरणिकदृष्ट्या कोंडा भाषेत दोन लिंग आहेत : पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. बहुतेक नामांमध्ये लिंगाचे स्पष्ट चिन्हक नसते, उलट, नामाचे लिंग त्याच्या अर्थावरून निश्चित केले जाऊ शकते. पुरुष व्यक्तींचा निर्देश करणारी नामे (एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही) पुल्लिंगी वर्गात येतात. नपुंसकलिंगी वर्गात स्त्रिया आणि मानवेतर वस्तूंचा उल्लेख करणारी नामे (उदा. पक्षी, वनस्पती, प्राणी, निर्जीव वस्तू इत्यादी) मोडतात. कोंडा भाषेत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन वचने आहेत. एकवचन चिन्हांकित केले जात नाही. तथापि, बहुवचनात प्रत्ययांचे दोन गट आहेत; एक प्रत्यय फक्त पुल्लिंगी नामांसाठी वापरला जातो आणि दुसरा प्रत्यय प्रामुख्याने नपुंसकलिंगी नामांसाठी वापरला जातो. इतर द्राविड भाषांप्रमाणेच, कोंडा भाषेत प्रथमा, द्वितीया-चतुर्थी, करण-अपादान, षष्ठी, सप्तमी अशा विभक्ती आढळतात. प्रत्येक विभक्तीचे स्वतंत्र प्रत्यय असतात. कोंडा भाषेमध्ये क्रियापदांना काळ व अर्थाचे प्रत्यय व पुरुषवाचक प्रत्यय लागतात. याशिवाय, आत्मवाचक (reflexive) प्रत्ययही क्रियापदांनाच लागतो.
सद्यस्थितीत कोंडा भाषेचे काही मोजके भाषक उरले असून, ही भाषा अतिशय संकटग्रस्त मानली जाते. कोंडा-दोरा जमातीची एकूण लोकसंख्या मोठी असली, तरी प्रत्यक्ष ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या मात्र कमीच आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, शिक्षण आणि सामाजिक प्रगतीसाठी तरुण पिढी तेलुगु आणि ओडियासारख्या प्रभावी प्रादेशिक भाषांचा वाढता वापर करत असल्याने मोठ्या प्रमाणावर ‘भाषिक स्थित्यंतर’ (Language shift) होत आहे.
संदर्भ :
- कृष्णमूर्ती, भा., ‘कोंडा ऑर कुबी : अ द्रविडियन लँग्वेज’, ट्रायबल कल्चरल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हैदराबाद, १९६९. https://repository.tribal.gov.in/handle/123456789/74080?viewItem=browse (Accessed: 18 march, 2026).
- बिस्वास, दि., ‘द इक्स्टिन्शन ऑफ ट्रायबल लँग्वेजेस इन इंडिया : अ सोशियो-लिंग्विस्टिक अँड कल्चरल लॉस’, द सोशल सायन्स रिव्ह्यू : अ मल्टिडिसिप्लिनरी जरनल, २(५), २०२४. https://doi.org/10.70096/tssr.240205027 (Accessed: 18 march, 2026).
- https://omniglot.com/writing/konda.htm (Accessed: 18 march, 2026).
- https://www.ethnologue.com/language/kfc/ (Accessed: 18 march, 2026).
समीक्षक : रेणुका ओझरकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.