कार्बोनेट गटातील खनिज. कॅल्शियम कार्बोनेटचे बहुरूप. रासायनिक संज्ञा CaCO3. स्फटिक संरचना समचतुर्भुजी. ॲरॅगोनाइट व कॅल्साइट या दोन्ही खनिजांची रासायनिक संज्ञा सारखी. स्फटिकीभवन भिन्न. अब्राहम गॉटलोब वेर्नेर यांना १७९० मध्ये हे खनिज ॲरॅगोन (स्पेन) प्रांतात आढळून आले, त्यावरून हे नाव पडले.
भौतिक गुणधर्म : आकार षट्कोनी, टोकाशी सुईसारखे किंवा त्रिकोणी, गोल व वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराचे), स्तंभकार वा झुंबराकार स्वरूपात. रंग पांढरा, लाल, स्फटिक नारंगी, जांभळा, करडा, निळा, तपकिरी पिवळा व हिरवा. भंजन उपशंखाभ (पृष्ठभागावर अर्धवर्तुळाकार रेषा). चमक काचेसारखी व अर्धपारदर्शक. विशिष्ट गुरुत्व २.९५, कठिनता ३-४.
प्रकाशीय गुणधर्म : वर्णबदल नाही किंवा क्षीण. स्फटिक तंतुमय, विकिरण किंवा स्तंभाकृती. व्यतिकरण उच्च श्रेणीचे (४.३). अपवर्तनांक १.६३. विलोपन समांतर. अपस्करण क्षीण.
ॲरॅगोनाइट अंधारात चकाकते; या गुणधर्माला प्रतिदीप्ती म्हणतात. अंधारामध्ये निळा, पांढरा तर अतिनील किरणांमध्ये पिवळ्या रंगाचा दिसतो.
आढळ : ॲरॅगोनाइट जैविक आणि अजैविक या दोन्ही पद्धतीने तयार होतो. सामान्य तापमानात व दाबाला ते खनिज अस्थिर असून कालांतराने त्याचे कॅल्साइटमध्ये परिवर्तन होते. सागरी पर्यावरणात अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या कवचामध्ये व प्रवाळा़ंमध्ये ते सामान्यपणे आढळून येते. उच्च दाबाखाली तयार होत असल्याने रूपांतरित खडकांमध्ये आणि बेसाल्ट व अँडेसाइट सारख्या खडकांमध्ये तयार होणाऱ्या भेगांमध्ये, तसेच नैसर्गिक चुनखडकाच्या गुहेमध्ये स्टॅलक्टटाइटच्या रूपात अजैविकपद्धतीने तयार झालेले आढळून येते. स्पेन, फ्रान्स, उटा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, मोरोक्को इ. ठिकाणी त्याचे साठे सापडतात. भारतात अजमेर व सांबर (राजस्थान) सरोवर येथे या खनिजाचे साठे आढळून येतात.
उपयोग : प्रदूषित पाण्यामधून झिंक कोबाल्ट व शिसे यांच्या अशुद्धी काढून टाकण्यासाठी अधिशोषक म्हणून वापर. समुद्राच्या पाण्याचा सामू (पीएच) संतुलीत राखण्यात महत्त्वाची भूमिका असल्याने मत्स्यालयातील पाण्यात त्याचा वापर. विविध रंग व आकार यांमुळे रत्न व सजावटीसाठी उपयुक्त.
संदर्भ :
- Deer, Howie and Zussman, Rock-Forming Minerals, Sheet Silicates: Micas, volume 3A, 2nd edition.: By M.E. Fleet, The Geological Society, London, 2003, 758 pp.
- Read, H., Rutley’s Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.