दगडी कोळशाचा सर्वांत उच्च श्रेणीचा (Highest Rank Coal) प्रकार. अँथ्रॅसाइट खनिजात कार्बनचे प्रमाण खूप जास्त आणि बाष्पनशील द्रव्यांचे प्रमाण अत्यल्प असते. कोळशाच्या उत्क्रांती (Coalification) प्रक्रियेतील हा सर्वांत परिपक्व व रूपांतरिेत कोळसा आहे. उच्च तापमान व दाबामुळे त्याची रचना अधिक सघन व स्थिर बनते. यामध्ये साधारणतः ८५–९५% (कधीकधी ९८ % पर्यंत) कार्बन असतो. हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन यांचे प्रमाण अत्यल्प असते. बाष्पनशील द्रव्ये अत्यंत कमी असल्याने ज्वलनाच्या वेळी धूर जवळजवळ तयार होत नाही. आर्द्रता आणि राख कमी असल्याने त्याचे उष्णतामूल्य सर्वाधिक असते. यामुळे ऊर्जानिर्मितीसाठी हा अत्यंत कार्यक्षम इंधन प्रकार मानला जातो.
भौतिक गुणधर्म : रंग गडद काळा. चमक काचेसारखी किंवा धातूसारखी. कठिनता २-२.५. विशिष्ट गुरुत्व १.३२-१.७. भंजन शंखाभ. प्रवृत्ती ठिसूळ. पारदर्शकता अपारदर्शक. अँथ्रॅसाइटमधील कार्बन सघन असल्यामुळे ते हाताळताना हात काळे होत नाहीत. इतर कोळशांपेक्षा तो अधिक कठीण व घन असतो.
ज्वलन वैशिष्ट्य : अँथ्रॅसाइटमध्ये बाष्पनशील घटक कमी असल्याने ते असते, मात्र पेटल्यानंतर तो स्वच्छ, धूररहित व आखूड निळसर ज्योत देतो. सल्फरचे प्रमाण कमी असल्यामुळे वायूप्रदूषणही कमी होते. दीर्घकाळ सातत्याने उष्णता देण्याची त्याची क्षमता जास्त असते.
निर्मिती : अँथ्रॅसाइट हा रूपांतरित कोळसा आहे. त्याची निर्मिती पुढीलप्रमाणे टप्प्या-टप्प्यांतून होते (१) दलदलीतील वनस्पती अवशेषांचे संचयन → पीट, (२) दाब वाढल्याने → लिग्नाइट, (३) अधिक दाब व तापमान → बिट्युमेनी कोळसा, (४) पर्वतनिर्मिती, घडी पडणे व भंगरेषा यांच्या परिणाम स्वरूप तीव्र दाब व तापमान → अँथ्रॅसाइट.
अँथ्रॅसाइट प्रामुख्याने घडीदार पर्वतरांगांमध्ये आढळतो. कोळशाचे थर अरुंद व तुटक स्वरूपाचे असतात. ते अनेकदा वाकलेले व भंगलेले असतात. उच्च श्रेणीच्या रूपांतरणामुळे त्याचा पोत अधिक सघन व कठीण बनतो. अशा प्रकारचे कोळसा क्षेत्रे प्लेट्सच्या धडकेमुळे तयार होतात. उदा., ॲपलाचियन पर्वतरांगांतील कोळसा क्षेत्र.
आढळ : युनायटेड किंग्डम, अमेरिका, चीन रशिया या देशात अँथ्रॅसाइटचे साठे आढळतात. भारतामध्ये प्रामुख्याने गोंडवाना समूहातील बिट्युमेनी कोळसा आढळतो. अँथ्रॅसाइटचे नैसर्गिक साठे भारतात जवळजवळ नाहीत.
उपयोग : प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले उच्च तापमान वापरत असलेल्या औद्योगिक भट्ट्यांमध्ये अँथ्रॅसाइटचा वापर करतात. धातुकर्म उद्योग, ऊर्जा निर्मिती केंद्रे, घरगुती इंधन – धूररहित असल्याने सुरक्षित. सल्फर अल्प असल्यामुळे आम्लवृष्टीची शक्यता कमी होते. तरीही तो जीवाश्म इंधन असल्याने कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन होतो. त्यामुळे त्याचा वापर मर्यादित ठेवण्यावर भर दिला जातो. उच्च दर्जाचा व उच्च उष्णतामूल्य असलेला कोळसा असल्याने त्याची बाजारमूल्य जास्त असते.
संदर्भ :
- Berry, L. G., Mason, B. & Dietrich, V. Mineralogy, CBS Publishers, 1983.
- Boggs, S. Principles of Sedimentology and Stratigraphy (5th Ed.), Pearson, 2012.
- Dana, J. D. & Klein, C. Manual of Mineral Science (22nd Ed.), Wiley, 2002.
- Geological Survey of India (GSI) – Indian Coal Resources Reports (Gondwana Coalfields).
- Krynine, P. D. & Judd, W. R. Principles of Engineering Geology and Geotechnics, McGraw-Hill, 1957.
- Singh, R. Physical and Engineering Geology, New Delhi, Standard Publishers, 2018.
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.