फेल्स्पारसमृद्ध जाडकणी संशकली अवसादी खडक. अर्कोज खडक फेल्स्पारमय ॲरेनाइट म्हणूनही ओळखला जातो. वालुकाश्मांच्या वर्गीकरणात फेल्स्पाराचे प्रमाण २५%, क्वॉर्ट्झचे प्रमाण साधारणतः ५०७५% दरम्यान असते, तर उर्वरित भागात कोनीय व उप कोनीय आकाराचे भरडकणी शकलयुक्त तुकडे व सूक्ष्म आधारक आढळते. मर्यादित रासायनिक अपक्षय व फार दूरची वाहतूक न झालेल्या गाळापासून बनलेला अर्कोज निकटस्थ अवसाद या प्रकारात मोडतो. यामुळे यातील फेल्स्पारचे उच्च प्रमाण टिकून राहते आणि खनिज दृष्ट्या अपरिपक्वता हे अर्कोजचे प्रमुख लक्षण आहे.

विवर्तनिक महत्त्व : अर्कोज सक्रिय विवर्तनिकीचे द्योतक मानला जातो. पर्वतनिर्मिती (orogeny) किंवा विभंगांमुळे भूउत्थान वेगाने होते. यामुळे खडक उघडे पडून त्यांचा अपक्षय जलद होतो. परिणामी फेल्स्पारसमृद्ध गाळ थेट निक्षेपित होतो म्हणून याचा अभ्यास पुराविवर्तनिकीमध्ये अत्यंत उपयुक्त आहे.

आढळ : अर्कोज बहुधा ग्रॅनाइट, नाइस किंवा फेल्स्पारसमृद्ध अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांपासून निर्माण होतो. ग्रॅनाइट स्त्रोत प्रदेशातील जलद अपक्षयामुळे फेल्स्पार व क्वॉर्ट्झ यांचे मिश्रण गाळरूपात वाहून नेले जाते. महाद्वीपीय खच (Craton), नव्याने उन्नत पर्वतरांगा, जलोढ पंखे (Alluvial fan), गुंफित (Braided) नदीप्रणाली, खच द्रोणी ही या खडकाच्या निर्मितीची प्रमुख क्षेत्रे आहेत. या वातावरणात गाळाचा प्रवास अल्प व निक्षेप वेगवान असतो. परिणामी कण कोनीय राहतात व वर्गीकरण अपूर्ण विल्हेवारी (poorly sorted) असते.

कोरडे (arid) किंवा शीत (cold) हवामान अर्कोज खडकाच्या निर्मितीसाठी योग्य असते. अशा परिस्थितीत रासायनिक अपक्षय कमी प्रमाणात होतो आणि फेल्स्पार टिकून राहतो. या उलट उष्णआर्द्र हवामानात फेल्स्पाराचे रूपांतर चिकणमातीमध्ये होते, त्यामुळे अशा प्रदेशात हा खडक कमी प्रमाणात आढळतो. हा खडक पुराहवामान (Paleoclimate) अभ्यासासाठी एक महत्त्वाचा निर्देशक आहे. त्यामुळे तो केवळ एक खडक नसून, पृथ्वीच्या गतिशील इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. उदा., कलाडगी  संघ (Kaladgi Group) हा कर्नाटकातील बागलकोटजमखंडी परिसरात विस्तृत पसरलेला पूर्वकॅम्ब्रियन (मुख्यतः प्रोटोझोइक) अवसादी अनुक्रम आहे. हा समूह दख्खन क्रेटॉनच्या उत्तर भागात विकसित झालेल्या क्रेटॉन बेसिनमध्ये निक्षेपित झाला. या समूहातील वालुकाश्मांमध्ये उत्कृष्ट अर्कोजचे नमुने आढळतात.

संदर्भ :

  • Blatt, H., Middleton, G., & Murray, R. Origin of Sedimentary Rocks, Prentice Hall, 1980.
  • Boggs, S. Principles of Sedimentology and Stratigraphy, Pearson, 2012.
  • Dickinson, W.R. Interpreting provenance relations from detrital modes of sandstones, 1985.
  • Pettijohn, F.J., Potter, P.E. & Siever, R.  Sand and Sandstone, Springer, 1987.
  • Tucker, M.E. Sedimentary Petrology, Blackwell Science, 2001.

                                                                समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.