पृथ्वीच्या कवचातून (Crust) फिरणाऱ्या गरम, खनिजयुक्त पाण्यातून घन पदार्थांच्या अवक्षेपणाने तयार  झालेले जलऔष्णिक साठे. हे साठे खनिजांचा संचय असून तांबे, सोने, चांदी, शिसे आणि जस्त यांसह इतर धातूंचे स्रोत आहेत. या प्रकारातले सामुद्रिय साठ्यांचा शोध १९७७ साली गालापागोस (Galapagos) बेटांजवळ सर्वेक्षण करताना लागला. या ठिकाणी गरम पाण्याचे उत्सर्जन होऊन येथील पाणी सूक्ष्म खनिज कणांनी संपॄक्त असल्याने गढूळ दिसते. या जल औष्णिक साठ्यांचा अभ्यास सर्व महासागरांमध्ये सुरू आहे.

सामन्यात: समुद्राच्या तळाशी असलेल्या पाण्याचे तापमान खूप कमी (३-४ डिग्री सेल्सिअस) असते. मध्य सागरातील डोंगर रांगामध्ये सर्वेक्षणादरम्यान समुद्रामध्ये खूप खोलीवर (३००० – ४००० मी.) तळाशी असलेल्या पाण्याचे तापमान अति उच्च असल्याचे  (३००-४५० डिग्री सेल्सिअस) निदर्शनास आले. समुद्राचे पाणी जेव्हा पृथ्वीतील भेगांमधून (faults and cracks) पृष्ठभागाखाली जाते; तेव्हा अतिशय गरम लाव्हारसाबरोबर त्याची अन्योन्यक्रिया होऊन रासायनिक अभिक्रियेमुळे पाण्यातून ऑक्सिजन, मॅग्नेशियम आणि सल्फेट्स काढून टाकली जातात. त्याच वेळी ह्याचे रूपांतर अति उष्ण आम्लयुक्त द्रवात होऊन हे द्रव लगतच्या खडकांमध्ये लोह, जस्त, तांबे, शिसे आणि कोबाल्ट सारख्या धातूंनी संपृक्त होतात. ३५०-४०० डिग्री सेल्सियस  तापमान असलेल्या या द्रवाचा जेव्हा समुद्राच्या तळाशी उद्रेक होतो; तेव्हा या द्रवामध्ये विरघळलेल्या धातूंचे अवक्षेपण होते. यामुळे समुद्रतळाशी उद्रेक होणारे गरम द्रव (३५०- ४००°C) कण समृद्ध असते. समुद्राच्या तळाशी खोलवर उच्च दाब (२००० – ४००० मी.) असल्यामुळे हे द्रव उकळत नाही. या द्रवाचा खोल समुद्राच्या तळाशी असलेल्या थंड पाण्याबरोबर ‘आंतरक्रिया’ होऊन त्यातील धातूंचे अवक्षेपण (Precipitation) होते आणि काळ्या धुरासारखे पाण्याचे उत्सर्जन होते. हे दृश्य एखाद्या धुराच्या चिमणीसारखे दिसते. म्हणून या उत्सर्जनाला ‘ब्लॅक स्मोकर’ संबोधले जाते. जल औष्णिक खनिज साठयांमध्ये महत्त्वाच्या धातूंचे नवीन स्रोत सापडले आहेत.

अरबी समुद्रातील ‘कार्ल्सबर्ग तसेच दक्षिण-पूर्व हिंद महासगरीय व  मध्य-सागरीय रीज’ या ठिकाणी जल-औष्णिक साठ्यांचा शोध घेण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन संशोधकांनी खोल समुद्रीय पाणबुडीतून सर्वेक्षण करून एका अनोख्या अशा परिसंस्थेचा (ecosystem) शोध लावला. या खोल समुद्राच्या तळाशी अशी परिसंस्था अस्तित्वात असणे हे आश्चर्यचकित करणारे होते. प्रशांत महासागरामध्ये संशोधकांना नलिका जंतू (Tube worm) हा जीव-जंतू सापडला. या जीवाचे अस्तित्व प्रथमच पृथ्वीवर आढळले. याशिवाय हे सर्व जीव-जंतू नुसतेच सूर्यप्रकाशाविना जगत नव्हते, तर झपाट्याने वाढत आहेत.

हे सर्व जीव-जंतू रासायनिक संश्लेषण करून वाढत आहेत. ऊर्जेसाठी सूर्यप्रकाशाद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेशणावर अवलंबून नसून, उत्सर्जन परिसंस्था क्षेत्रावर (vent ecosystem) आधारित असतात. बॅक्टेरिया आणि आर्किया सेंद्रिय पदार्थ तयार करण्यासाठी ऊर्जा स्त्रोत म्हणून उत्सर्जित द्रव-पदार्थांमधील रासायनिक संयुगे, प्रामुख्याने हायड्रोजन सल्फाइड वापरतात. हे सूक्ष्मजंतू अन्नसाखळीचा आधार बनतात. जलऔष्णिक उत्सर्जन परिसंस्था क्षेत्रामध्ये (हायड्रोथर्मल व्हेंट इकोसिस्टम) परिसंस्था असतात, ज्यांना खोल, अंधाऱ्या महासागरात जीवसृष्टीचे ‘नंदनवन’ मानले जाते. या जीवसृष्टीच्या शोधामुळे अंतराळ-जीवशास्त्रज्ञांनी युरोपा आणि एन्सेलाडस या गुरू आणि शनीच्या चंद्रांसारख्या इतर खगोलीय पिंडांवर जीव जंतूंच्या अस्तित्वाची शक्यता वर्तवली आहे.

संदर्भ: https://www.whoi.edu/ocean-learning-hub/ocean-topics/how-the-ocean-works/seafloor-below/hydrothermal-vents/

                                              समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.