ॲगेट या खनिजाचे भारतीय नाव. चालसेडोनी या सूक्ष्मस्फटिकी प्रकारातील. हे प्रामुख्याने क्वार्ट्झ (SiO₂) पासून बनलेले असून सिलिका समूहातील महत्त्वाचे खनिज. त्याच्या आकर्षक पट्टेदार रचनेमुळे आणि विविध रंगांमुळे अकीक रत्न म्हणून प्रसिद्ध. अकीकचा उपयोग दागिने, मणी, सजावटी वस्तू, कोरीव काम व धार्मिक वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.
१) रासायनिक संघटन व रचना : रासायनिक सूत्र SiO₂. यात सिलिकॉन व ऑक्सिजन अणूंची त्रिमितीय जाळी असते.
अकीक हा क्वार्ट्झचा गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिक असलेला; crypto crystalline) प्रकार असल्यामुळे त्याचे स्फटिक डोळ्यांनी ओळखता येत नाहीत.
२) भौतिक गुणधर्म : पांढरा, करडा, निळा, लाल, तपकिरी, हिरवा व काळा अशा विविध रंगांमध्ये आढळतो. यामधील पट्टेदार रचना ही याचे प्रमुख वैशिष्ट्य. कठिनता ६.५ ते ७, विशिष्ट गुरुत्व २.५८ते २.६४. स्फटिकांचे विदलन अनुपस्थित. भंजन शंखाभ, पारदर्शकता अर्धपारदर्शक ते अपारदर्शक.
अकीक कठीण, टिकाऊ व हवामानास प्रतिरोधक असल्यामुळे तो अलंकार व सजावटी वस्तूंमध्ये वापरला जातो.
३) ध्रुवीकृत प्रकाशातील गुणधर्म : सामान्यतः रंगहीन. तथापि, सूक्ष्म-समावेश, अशुद्धता किंवा विखुरलेल्या प्रभावांमुळे ते बहुतेकदा फिकट तपकिरी, राखाडी किंवा पांढऱ्या रंगात दिसून येते. अपवर्तनांक सु. १.५३ – १.५४ असतो; द्विवर्तन कमी (~0.004) दिसून येते.
काट निकोलखालील गुणधर्म : अकीक व्यतिकरण रंग हे कमी क्रमाचे करडे ते पांढरे रंग दर्शवितो. तंतुमय व पट्टेदार रचना स्पष्ट दिसते. गूढस्फटिकी स्वरूपामुळे स्वतंत्र स्फटिक स्पष्टपणे दिसत नाहीत.
प्राप्तिस्थान : अकीक प्रामुख्याने ज्वालामुखी खडकांतील पोकळ्यांमध्ये तयार होतो. लाव्हा थंड होताना तयार झालेल्या वायुपोकळ्यांमध्ये सिलिका-समृद्ध भूजल साचते व स्तरानुसार स्फटिकीकरण होते. त्यामुळे पट्टेदार रचना तयार होते. अकीक जिओड्स, लाव्हा प्रवाह व काही गाळ खडकांमध्ये गाठींच्या स्वरूपात आढळतो.
भारत अकीक उत्पादनासाठी प्रसिद्ध. खंबात (गुजरात) हे अकीक कापणे, त्यांना झिलई देणे, त्यापासून विविध आकाराच्या शोभिवंत वस्तू बनविणे यासाठी जागतिक स्तरावर ओळखले जाते. तसेच राजपिपळा, जुनागड येथे अकीक आढळतो. डेक्कन ट्रॅप प्रदेशातील महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथेही त्याचे साठे आहेत. अकीक ब्राझील व उरुग्वे येथे मोठ्या प्रमाणात आढळतो, तसेच जर्मनीत (इदार-ओबर्स्टाईन), युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिको येथेही अकीक सापडतो.
अकीक हे सिलिका समूहातील सुंदर व उपयुक्त खनिज असून त्याचे भौतिक व प्रकाशीय गुणधर्मामुळे त्याला भूशास्त्रीय व आर्थिक दृष्ट्या महत्त्व आहे.
संदर्भ :
- Deer, W.A., Howie, R.A. & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals, Longman, 1992.
- Walter Schumann, Robert Bradshaw, Handbook of Rocks, Minerals, and Gemstones, 1993.
- Nesse, W. D., Introduction to Optical Mineralogy, Oxford University Press, 2004. समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.