प्लॅजिओक्लेज फेल्स्पार गटातील कॅल्शियम-समृद्ध खनिज. रासायनिक संज्ञा CaAl₂Si₂O₈. हे खनिज प्रामुख्याने अग्निजन्य खडकांमध्ये आढळते. हे खनिज कॅल्शियम, ॲल्युमिनिअम, सिलिकॉन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. प्लॅजिओक्लेज मालिकेत ते कॅल्शियम-अंतिम सदस्य, तर अल्बाइट (NaAlSi₃O₈) हा सोडियम-अंतिम सदस्य आहे.
भौतिक गुणधर्म : ॲनॉर्थाइट याचा रंग पांढरा, करडा किंवा फिकट निळसर असू शकतो. स्फटिक संरचना त्रिनताक्ष प्रणालीतील. यात सिलिका (SiO₄) चतुष्फलक एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यामध्ये ॲल्युमिनिअम (Al) अंशतः सिलिकॉनची जागा घेतो. कॅल्शियम आयन (Ca²⁺) या संरचनेतील पोकळ्यांमध्ये संतुलन राखतात. (Si,Al)-O चतुष्फलकांमधील मोठे अंतर (Ca,Na) आयनांनी असते. आकार सारणी आकारात. भंजन असमान. चमक काचबिंदूसारखी. विशिष्ट गुरुत्व २.५७ — २.७. कठिनता ६. स्फटिकांचे विदलन दोन संच, परंतु एक चांगला विकसित झालेला. सूक्ष्मदर्शकाखाली समतल ध्रुवीकृत प्रकाशातील गुणधर्म रंगहीन किंवा करडा असल्याने वर्णबदल नाही. यात समांतर पट्ट्यांसारखी जुळणी स्पष्ट दिसते. कधीकधी कार्ल्सबॅड यमलनदेखील आढळते. तिर्यक विलोपन. विलयन कोन तुलनेने मोठा (२०°–३७° पर्यंत) असू शकतो. प्रत्येक पट्टी वेगवेगळ्या कोनात विलोपीत होते. काही स्फटिकांमध्ये रासायनिक बदलांमुळे मंडलन दिसते, जे वेगवेगळ्या व्यतिकरण रंगांच्या पट्ट्यांद्वारे ओळखता येते.

काट निकोलखालील गुणधर्म – अनॉर्थाइटचे दुहेरी अपवर्तन कमी ते मध्यम असते, त्यामुळे प्रामुख्याने प्रथम क्रमातील (First order) करडे, पिवळसर किंवा फिकट रंग दिसतात.
प्राप्तिस्थान व सहसंबंध : ॲनॉर्थाइट मुख्यतः बेसाल्ट, गॅब्रो आणि सारख्या मॅफिक अग्निजन्य खडकांमध्ये तयार होते. उच्च तापमानाच्या मॅग्मामधून याची स्फटिकीकरण प्रक्रिया होते. हे पायरोक्सिन, ऑलिव्हीन आणि मॅग्नेटाइट यांसारख्या खनिजांसोबत आढळते. काही रूपांतरित खडकांमध्येही ते आढळू शकते.
विशेषतः कॅल्शियमयुक्त मॅफिक व अतिमॅफिक खडकांमध्ये याची निर्मिती होते. काही रूपांतरित खडकात (कॅल्क-सिलिकेट शिस्ट किंवा हॉर्नफेल्समध्ये) आढळते. जागतिक स्तरावर कॅनडा, नॉर्वे आणि अमेरिका तर भारतामध्ये अनॉर्थाइटचे वितरण प्रामुख्याने दख्खन ट्रॅप प्रदेशात आढळते, विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे बेसाल्टिक खडकांमध्ये. तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू मधील गॅब्रो खडकांमध्येही त्याची नोंद आहे. पूर्व घाट पट्ट्यातील रूपांतरित खडकांमध्येही अनॉर्थाइट आढळते.
औद्योगिक दृष्ट्या ॲनॉर्थाइटचा वापर सिरेमिक, काच उद्योग आणि अग्निरोधक पदार्थांच्या निर्मितीत केला जातो. त्यामुळे त्याला भूशास्त्रीय तसेच औद्योगिक महत्त्व आहे.
संदर्भ :
- Deer, W.A., Howie, R.A., & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals. Longman, 1992.
- Walter Schumann,Robert Bradshaw, Handbook of Rocks, Minerals, and Gemstones, 1993.
- Read, H., Rutley’s Elements of Mineralogy 24th edition, Londan, 1947.
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.