भारतातील प्राचीन, व्यापक आणि भूगर्भीय दृष्ट्या महत्त्वाचा शैलसमूह. तो आर्कीयन ते प्रोटेरोझोइक पूर्वार्धातील (Precambrian) खडकांनी बनलेला असून अरवली पर्वतरांगांमध्ये (राजस्थान) मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतीय भूगर्भरचनेच्या आद्य इतिहासाचे जिवंत साक्षीदार म्हणून अरवली संघ विशेष महत्त्वाचे आहे. संरचनात्मक दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा. त्यामध्ये घड्या (folds), विभंग, अभिविसंगती (Unconformities) आणि विविध प्रकारचे रूपांतरणीय (Metamorphic) परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. या वैशिष्ट्यांमुळे त्या काळातील भूगर्भीय हालचाली, दाब-तापमान परिस्थिती आणि पर्वतनिर्मिती (Orogeny) प्रक्रियांची माहिती मिळते. विशेषतः बृहत् सीमा-विभंग (Great boundary Fault), अभिनति रचना (synclinal structures) आणि प्रचंड जाडी यांमुळे या शैलसमूहाचे संरचनात्मक महत्त्व अधोरेखित होते.
स्तरिक (Stratigraphic) दृष्टीनेही अरवली संघ अभ्यासनीय, कारण तो भारतीय ढालप्रदेशातील प्राचीन अवसादन (Sedimentation). त्यानंतर झालेले रूपांतरण आणि पर्वतनिर्मिती प्रक्रियांचे एकत्रित परिणाम दर्शवतो. त्यामुळे भारतीय भूगर्भीय इतिहासातील सुरुवातीच्या टप्प्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे.
अरवली संघाचे खडक अलवरच्या दक्षिणेकडून मेवाड, अजमेर–मेरवाड, चितोड परिसर ओलांडून गुजरातमधील चांपानेरपर्यंत पसरलेले आहेत. या प्रदेशात अरवली पर्वतरांगांची दिशा ईशान्य–नैऋत्य अशी आहे. संघाची जाडी साधारणतः ३,००० मी.पेक्षा अधिक; ज्यामुळे त्याची निर्मिती दीर्घकाळ चाललेल्या अवसादन आणि नंतरच्या रूपांतरण प्रक्रियांमुळे झाल्याचे स्पष्ट होते. अरवली पर्वतरांग ही एक उत्कृष्ट संरचनिक पर्वतरांग (Structural Mountain Range) आहे. येथे खडकांना तीव्र दाब (Compression) पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घड्या आणि विभंग निर्माण झाले आहेत. या प्रदेशात प्रचंड समभिनति (Synclinorium) निर्माण झालेली आहे. अरवली संघ, रायालो माला आणि दिल्ली संघ हे तीन मुख्य घटक या समभिनतित आढळतात. अरवली संघ तळाशी असून त्यावर रायालो माला आणि त्यावर दिल्ली संघ विसंगतपणे अधिचित्रित झाले आहेत.
बृहत् सीमा-विभंग अरवली पर्वतरांगेच्या आग्नेय सीमेला ‘राजपुतान्यातील महान सीमा-विभंग’ आढळतो. विक्षोभित क्षेत्र आणि विंध्य संघाचे स्थिरित सपाट क्षेत्र एकमेकांच्या संपर्कात आलेले आहेत. भारतीय भूगर्भरचनेतील एक महत्त्वाचा रचनात्मक घटक मानला जातो.
शिलावर्णन अरवली संघातील खडक प्रामुख्याने मृण्मय अवसादी स्वरूपाचे असून त्यांचे विविध प्रमाणात रूपांतरण झालेले आहे. मुख्य खडकांचे प्रकार शेल, स्लेट, फिलाइट, अभ्रकी सुभाजा (Mica schist), क्वॉर्ट्झाइट, पिंडाश्म (Conglomerate), अर्कोज, लोही चुनखडक (Ferruginous limestone) आहेत. संघाच्या तळाशी पिंडाश्म, क्वॉर्ट्झाइट किंवा अर्कोज यांचा पातळ थर आढळतो. त्यावर शेल, स्लेट व फिलाइट यांचे प्राबल्य दिसते. मध्यम भागात क्वॉर्ट्झाइट व चुनखडकाचे स्तर आढळतात, तर माथ्याशी पुन्हा क्वॉर्ट्झाइट व क्वचित ज्वालामुखी खडकांचे अवशेष सापडतात.
अरवली संघातील खडकांचे रूपांतरण कमी ते मध्यम श्रेणीचे आहे. वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना रूपांतरणाची तीव्रता कमी होत जाते. काही भागांत ग्रॅनाइट अंतःक्षेपणामुळे संमिश्र पट्टिताश्म (Composite gneiss) निर्माण झालेले आहेत. रूपांतरणीय प्रक्रियांमुळे मूळ अवसादी खडकांचे शेल ते स्लेट, स्लेट ते फिलाइट आणि पुढे सुभाजात रूपांतर झालेले आढळते. हे परिवर्तन प्रादेशिक दाब व तापमानवाढ यांमुळे झाले आहे.
अरवली संघ खनिज संपत्तीने समृद्ध आहे. तांबे, जस्त, शिसे, संगमरवर व अभ्रक यांसारखी खनिजे या प्रदेशात आढळतात. विशेषतः खेत्री तांबे पट्टा व उदयपूर परिसरातील जस्त-शिसे खाणी प्रसिद्ध आहेत.
‘अरवली संघ’ हे नाव १८७७ मध्ये सी. ए. हॅकेट यांनी दिले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी ए. एम. हेरन यांनी राजस्थानचे सविस्तर सर्वेक्षण केले. त्यांच्या कार्यावरून राजस्थानातील शैलसमूहांची माहिती मिळते.
संदर्भ :
- Heron, A. M. The Geology of Central Rajputana. Memoirs, GSI, 1953.
- Hackett, C. A. Notes on the Aravalli System. Records, GSI, 1877.
- Krishnan, M. S. Geology of India and Burma. CBS Publishers, 1982.
- Puri, V. D. & Verma, B. C. Indian Stratigraphy. Vishal Publishing Co., 1998.
- Valdiya, K. S. The Making of India: Geodynamic Evolution. Springer, 2010.
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.