बहुधातुक पिंड खोल समुद्राच्या तळाशी (>४००० मी. पाण्याच्या खोलीवर) विस्तीर्ण क्षेत्रात (abyssal plain) आच्छादलेल्या असतात. हे पिंड लोह, मॅंगॅनीज, तांबे, कोबाल्ट, निकेल यांसारख्या मौल्यवान धातूंनी तसेच पृथ्वीतील विविध दुर्मीळ घटकांनी संपृक्त असतात. पृथ्वीवरील सर्व महासागरांच्या समुद्रतळावर लाखो चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या या धातूंच्या एकूण साठ्यांपैकी बहुधातुक पिंडातील (Mn + Fe + Cu + Ni + Co) या मूल्यवान धातूंचे प्रमाण ४०% इतके असते.
लोह मॅंगनीज पिंड अवसादी गाळांच्या खडकात आढळणारे खनिज साठे आहेत. सु. ३ ते १० सेंमी. व्यासाचे, बटाट्याच्या आकाराचे हे पिंड लोह आणि मॅंगॅनीज ऑक्साइड आणि हायड्रॉक्साइडच्या केंद्रकीय थरांनी बनलेले असतात. यांचा केंद्रक घट्ट गाळाचा किंवा खडकाचा कण, तर काही वेळा सूक्ष्मजीवाश्म किंवा शार्क यांच्या दाताचा लहान तुकडा असू शकतो. या केंद्रकाभोवती यांची वाढ अत्यंत धिम्या गतीने साधारणपणे प्रति दशलक्ष वर्षात १ ते १० मिमी. व्यास इतकी असते.
स्रोत : बहुधातुक पिंडातील महत्त्वाच्या धातूंचे दोन स्रोत आहेत : (१) जलज (हायड्रोजेनेटिक; seawater) : यातील धातू समुद्राच्या पाण्यातून थेट गाठींच्या पृष्ठभागावर अवक्षेपित होतात. अशा गाठी कोबाल्ट, सेरियम आणि प्लॅटिनममध्ये समृद्ध असतात. या तुलनेत मॅंगॅनीज व लोहाचे प्रमाण अल्प प्रमाणात असते.(२) अनुक्षेपी (डायजेनेटिक) : यातील धातू खोल समुद्राच्या गाळातील पाण्यात अवक्षेपित होतात. या गाठींमध्ये मॅंगॅनीज व लोहांचे प्रमाण जलज स्त्रोतांच्या तुलनेत थोडे जास्त असते, तर त्या निकेल व तांबे या धातूंनी समृद्ध असतात. ही बहुधातुक पिंड प्रामुख्याने प्रशांत व हिंद महासागरात आढळतात.
प्रशांत महासागरातील हवाई मेक्सिको दरम्यान उत्तर मध्य भागात पसरलेले क्लॅरियन-क्लिपरटन प्रदेशाचे विस्तीर्ण क्षेत्र, आग्नेय प्रशांत महासागरातील पेरू सागरी द्रोणी. दक्षिण प्रशांत महासागर स्थित पेनर्हिन सागरी द्रोणी. मध्य हिंद महासागर खोरे (CIOB). या खोऱ्यात आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणाने (International Sea Bed Authority ISBA) ७५,००० चौ. किमी. क्षेत्रातील या खनिज साठ्यांचा शोध व उत्खनन करण्यास भारत सरकारला विशेष अधिकार दिले आहेत.विषुववृत्तीय हिंदी महासागरात १९८१ मध्ये या बहुधातुक गाठींचा शोध लागल्याने भारताने या भागात व्यापक शोध आणि सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. या क्षेत्रात बहुधातुक पिंडांची संसाधन क्षमता ३८० दश लक्षटन इतके असल्याचे अनुमान काढले आहे. विद्युत घट इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स यामधील उपयुक्तततेमुळे बहुधातुक गाठींना विशेष आर्थिक महत्त्व आहे.
संभाव्य पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन (EIA), खाणकामासाठी विदा तयार करणे; तसेच खोल समुद्रातील खनिजांचे धातू प्रक्रिया आणि खाणकाम यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे अशी महत्त्वाचे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानातील संशोधकांनी हाती घेतले आहेत.
संदर्भ :
- Qasim, S.Z. and Nair, R.R. Editors. From the first nodule to the first mine site: An account of the polymetallic nodules project. Department of Ocean Development; New Delhi, 50 pp, 1988.
- Sharma, R. , First nodule to first mine-site: development of deep-sea mineral resources from the Indian Ocean. Current Science, 99 (6), 750-759, 2010.
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.