गव्हाणकर, दत्तात्रय नारायण : (२२ एप्रिल १९१५ २८ मार्च १९७१). शाहीर द. ना. गव्हाणकर. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर. त्यांचा जन्म महागोंड, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे झाला. द. ना. गव्हाणकर यांच्या वडिलांचे नाव नारायण गव्हाणकर तर आई लक्ष्मीबाई. त्यांच्या  जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर काहीच दिवसात आईच्या मृत्यूमुळे त्यांच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे निघून गेले. त्यांचे  बालपण महागोंड या ठिकाणी व्यतीत झाले. त्या परिसराचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व जडणघडणीवर प्रभाव पडला. कोल्हापूर राजाराम महाविद्यालयातून, इंग्रजी विषय घेऊन त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. राष्ट्रीय शाहीर महादेव नानिवडेकर यांच्या सहवासात गव्हाणकर आले. शाहीर नानिवडेकरांकडून त्यांनी शाहिरीचे धडे घेतले. कसे गावे, कसे सांगावे, निवेदन कसे करावे याचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. शाहीर नानिवडेकर यांच्या सहवासामुळे लोकसंवाद साधण्याची कला त्यांना अवगत झाली. गव्हाणकर यांनी मनोमन ठरवून टाकले की, शाहिरी ही लोकसेवेसाठी चालू ठेवायची. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेच्या वेळी कम्युनिस्ट पक्षातर्फे जे जाहीर कार्यक्रम सादर झाले; त्यातूनच लालबावटा कलापथक उदयास आले. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि शाहीर गव्हाणकर या तिघा मित्रांनी मिळून लालबावटा कलापथकाची स्थापना केली. याच लालबावटा कलापथकाने पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली.

शाहीर गव्हाणकर यांच्या साहित्यसंपदेत एकूण १० लोकनाटय, ८ पोवाडे, ९ गीते, लावण्या, अनुवादलेखन, परीक्षण, प्रस्तावना, प्रकाशित काव्यसंग्रह व अप्रकाशित साहित्य इत्यादीचा समावेश होतो. बंड्या दिवाणमहाराजा ग्रामसिंह, शेतकऱ्याची पंढरी (१९४२), स्वर्गलोकचा बातमीदार (१९५०), मुंबईचा कामगार, नगरपित्याची निवडणूक (१९४८), भामट्यांचा बाजार, राजा संग्रामसिंह, काश्मीरची फाळणी अशी अनेक लोकनाटय शाहीर गव्हाणकरांनी लिहिली. ‘महाराष्ट्रा वळुनि बघ जरा’, ‘पुढाऱ्यांची कवाली’, ‘हुतात्म्यांना आवाहन’ (१९४७), ‘अजरामर लेनिन’, ‘श्रीमान योगी कादंबरीतील पोवाडा’, ‘छत्रपतींचा पोवाडा’, ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’, ‘उद्धमसिंगाचा पोवाडा’ अशा अनेक पोवाड्यांचा समावेश शाहीर गव्हाणकरांच्या साहित्यात आहे. ‘धरतीची लेकरं’, ‘गड्या हे सवराज असलं रं कसलं’, ‘क्रांतीचे वारकरी’(अभंग), ‘ऊठ भारता तुला लागली काळझोप कारे ?’, ‘रे मानवतेच्या देहावरती’, ‘राष्ट्रास हांक द्यारे’, ‘युवकांनो उठा पहा पहा आता तुम्ही राष्ट्रध्वज सावरा’, ‘बांधोनी उठा चंग’, ‘देशात गर्जना करती ते प्रधानमंत्री नेहरू आघाडीवरती या देशाला तारू’ (१९५१) अशासारख्या अनेक गीतरचना गव्हाणकरांच्या लेखणीतून उतरल्या. रणजित देसाई लिखित ऐतिहासिक कादंबरी श्रीमान योगी यातील पोवाडा गव्हाणकरांच्या प्रतिभेची साक्ष देणारा ठरतो. शाहीर गव्हाणकर यांनी कवाली हा  काव्यप्रकार देखील हाताळलेला दिसून येतो.

कम्युनिस्ट विचारसरणीतून तयार झालेली शाहीर गव्हाणकर यांची लोकनाटय, शाहिरी रचना शेतकरी, कामगार, श्रमिक यांची व्यथा, दुःख चित्रित करणारी आहे. शेतकरी, कामगार, श्रमिक, गावकरी अशा वास्तव जीवनातील पात्रांचा वापर त्यांनी केला. त्यांच्या  साहित्यातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार संपावा आणि एक नवा सुधारित समाज उदयास यावा, ही तळमळ दिसून येते. पोवाडा हा स्तुती किंवा गुणदर्शनपरच असला पाहिजे ; ही प्रथा झुगारून गव्हाणकर यांनी वेगळा विचार समाजापुढे मांडण्याचे धाडस ‘स्वर्गलोकचा बातमीदार’ या पोवाड्याच्या माध्यमातून केले आहे.  या पोवाड्यात नारदाच्या भूमिकेतून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा आढावा घेतला गेला आहे. त्यांनी शेतकरी व कामगारांचे दुःख या पोवाड्यात मांडले आहे. पौराणिक कथेचा आधार घेऊन नारद या पात्रामधून सामान्य जनतेची वेदना येथे  सांगितली आहे. आपल्या शाहिरी रचनांची मांडणी ते अगदी साधी, सोपी, सहजतेने आणि हृदयाला चटकन भिडेल अशीच करतात. शाहीर गव्हाणकर हे त्यांच्या साहित्यकृतीमध्ये प्रयोगशीलतेचा वापर करताना दिसतात. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचा -अभंगाचा ते अभिव्यक्तीसाठी वापर करतात. त्यांना जीवनाची आणि साहित्याची एक स्वतंत्र दृष्टी होती.

महाराष्ट्रात शाहिरांचे संघटन होणे आवश्यक होते. त्यासाठी ‘महाराष्ट्र शाहिरी परिषदेची’ स्थापना करण्याचा विचार होऊ लागला. यामध्ये शाहीर गव्हाणकर यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. शाहीर गव्हाणकर छायाचित्रणाच्या क्षेत्रातही चमकले. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन’ आणि ‘गोवा मुक्ती लढा’ या चळवळीतील त्यांनी टिपलेली छायाचित्रे त्या काळी खूप गाजली. शाहीर गव्हाणकर हे अतिशय प्रभावीपणे पोवाडे म्हणत. यंग इंडिया व कोलंबिया या कंपन्यांनी त्यांच्या ‘डौलान चाल ढवळ्या’,‘जाती घडी पुन्हा येणार न्हाय रे’,‘स्वर्गलोकचा नारद’,‘पंजाब दिल्ली दंगा’ हे पोवाडे ध्वनिमुद्रित केले होते. बंगाल प्रांतामध्ये भीषण दुष्काळाने थैमान मांडले होते. त्यावेळी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व स्तरातून मदतकार्य सुरू झाले होते. अशावेळी शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलापथकाच्या माध्यमातून मदत देण्याचे कार्य केले.

द. ना. गव्हाणकर यांनी चार दिन चार राहे (१९५९ ) या हिंदी चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक  म्हणून काम केले. सात हिंदुस्तानी (१९६९) या हिंदी चित्रपटासाठी निर्मिती प्रबंधक म्हणून काम पाहिल्याचे दिसून येते. तसेच के. अब्बास यांच्या ‘परदेसीया’ चित्रपटासाठी  सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून मॉस्कोला देखील जाऊन आले होते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’या कादंबरीवर आधारित ‘फकिरा’ हा चित्रपट शाहीर गव्हाणकर यांनी काढला.  या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. शाहीर गव्हाणकर हे चित्रपट क्षेत्रात मात्र फार काळ रमले नाहीत.

लेखक, कवी, छायाचित्रकार, दिग्दर्शक या सर्व भूमिकांसोबतच अभिनेत्याची भूमिका गव्हाणकर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केल्याचे दिसून येते. अकलेची गोष्ट या लोकनाट्यातील ‘जानबा’ ही भूमिका, माझी मुंबई लोकनाट्यातील ‘विष्णू’ ही भूमिका, बेकायदेशीरमधील ‘सत्तू’ या सर्व भूमिकातून त्यांची अभिनयक्षमता दिसून येते. तसेच गव्हाणकर यांनी गुरु शाहीर नानिवडेकर यांच्या फॅशनचा वग, किसरूळचा शेतकरी, वसाडगावचा जमीनदार अशा अनेक तमाशामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या.

शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावणीचे संगीत हे शाहीर गव्हाणकरांचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले वग शाहीर गव्हाणकरांनी बसवलेले होते. लालबावटा कलापथकाचे संघटन प्रामुख्याने गव्हाणकर यांनी केले. शाहिरी परंपरा शाहीर गव्हाणकरांनी पुढे नेली. ते शिक्षित होते, त्यामुळे काव्यशास्त्राशी त्यांची चांगली जवळीक होती. त्यांनी भारत देशातच नव्हे तर भारताबाहेर, फ्रान्समध्ये शाहिरीचा प्रसार होण्यास मौल्यवान योगदान दिले आहे.  उपेक्षित असलेल्या लोकांना आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून केंद्रवर्ती आणण्याचं काम शाहीर द. ना.गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख यांनी केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर गव्हाणकर यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. लोकांचे प्रबोधन केले, लोकांना लढण्यास भाग पाडले. हे त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

संदर्भ :

• सामंत, पूजा पराग, द.ना.गव्हाणकर यांचे शाहिरी वाङ्मय, पुणे

• सामंत, पूजा पराग, शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य, मुंबई.

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.