हिंगे, किसनराव : (जन्म : १८ ऑगस्ट १९२९ – १ जून १९९८).महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेवाव्रती शाहीर. जन्मस्थळ पुणे. वडिलोपार्जित व्यवसाय – बेलदार. संगमरवरी दगडावर नक्षीकाम करून उपजीविका करणाऱ्या सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पत्नी सुलोचना,दोन मुले व एक मुलगी.पुणे स्थानकाशेजारील एका साध्या कौलारू घरात वास्तव्य.शाहीर हिंगे यांचे शिक्षण इयत्ता ७ वी पर्यंत झाले होते. विद्यार्थिदशेत शाहीर म.ना. नानिवडेकर यांच्या पोवाड्यांनी त्यांना प्रभावित केले आणि एकलव्याच्या निष्ठेने त्यांनी शाहिरी कला आत्मसात केली.शाहीर हिंगे यांची स्त्रीशक्ती व स्त्रीमहिमा यांवर गाढ श्रद्धा होती. त्यांच्या लेखनातून जिजामाता,उमाबाई दाभाडे,इंदिरा गांधी,अहिल्याबाई होळकर,झाशीची राणी यांच्यावर त्यांनी नितांतसुंदर आणि स्फूर्तिदायक पोवाडे उतरविले. यांबरोबरच आग्र्याहून सुटका,चाकणचा वेढा,नारायणराव पेशव्यांचा वध,चिनी आक्रमण अशा अनेक ऐतिहासिक,सामाजिक व राजकीय विषयांवरचे पोवाडे त्यांनी लिहिले.मराठी भाषेबरोबरच हिंदी भाषेतूनही त्यांनी पोवाड्यांचे लिखाण केले. महाराष्ट्र शाहीर परिषद या शाहिरांच्या संघटनेची स्थापना त्यांनी केली.त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील तमाम नामवंत शाहिरांनी पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यापुढे आपली शाहिरी सादर केली.शाहिरी क्षेत्रातील हा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरला.या कार्यक्रमापासून अनेक नवोदितांनी शाहिरीची प्रेरणा घेतली आणि अनेक नवीन शाहीर उदयास आले.शासनाच्या शाहिरी शिबिरांचे संचालक म्हणून ते काही काळ कार्यरत राहिले. १९४२ पासून ते अनेक आंदोलनांत सक्रिय सहभागी झाले.त्यांनी पदरमोड करून भावी पिढीला शाहिरी शिक्षण दिले.महाराष्ट्र शाहिरी परिषदेने त्यांच्या वयाच्या एकषष्टीनिमित्त एक लाख रुपयांची थैली देऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार घडवून आणला.‘काळाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दातं जात ही आमुची पहा चाळुनी पाने आमुच्या इतिहासाची’ अशा स्वाभिमानाने मराठी वीरांची महती लिहिणारा व गाणारा शाहीर, शाहिरी क्षेत्रात कायम अजरामर राहिला.त्यांचे पुणे येथे निधन झाले.
संदर्भ :
- जगताप, विजय, (संपा),महाराष्ट्रातील राष्ट्रीय शाहीर, पुणे, २००५.