जैन धर्मात पाच महाव्रते व पाच अणुव्रते (लहुव्रते) अशी दोन प्रकारची व्रते आहेत. जैन आचार्य उमास्वाती यांनी व्रतींचे दोन प्रकार कल्पिले आहेत. एक, अणुव्रतांचे पालन करणारे ते ‘अगारी’ आणि दोन, महाव्रतांचे पालन करणारे ते ‘अनगारी’. पुढे जाऊन त्यांनी या प्रत्येक व्रताच्या अतिचारांचे वर्णन केलेले आहे. गृहस्थाश्रमी श्रावक-श्राविकांसाठी स्थूलमानाने आचरावयाची सोपी अणुव्रते आहेत. कुटुंबात व समाजात राहून विविध प्रकारचे व्यवसाय, उद्योग, व्यापार, शेती इ. कामे करणाऱ्या सर्वसामान्य गृहस्थींकरिता म्हणजे श्रावकांकरिता जी व्रते आहेत, ती काहीशी सौम्य व लवचीक आहेत त्यांना ‘अणुव्रते’ म्हणतात. कारण त्यांना एकांगी व अतिरेकी होऊन भागत नाही. त्यांना घरातील, कुटुंबातील, समाजातील इतर माणसांची बंधने पडतात व ती मानावी लागतात.

अणुव्रते श्रावकधर्मात अपरिहार्य म्हणून ‘मूलगुणरूप’ म्हटली आहेत, ती अशी : (१) प्राणातिपात-विरमण म्हणजे अहिंसा, (२) मृषावाद-विरमण म्हणजे सत्य, (३) अदत्तादान-विरमण म्हणजे अचौर्य, (४) स्वदार-संतोष म्हणजे स्वस्त्रीसंतोष आणि (५) इच्छा-परिमाण म्हणजे आवश्यक गरजेपुरत्या वस्तूंव्यतिरिक्त इतरांचा त्याग.

१. अहिंसा : ‘अहिंसा परमोधर्मः।’ हे जैनांचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे. कोणत्याही स्वरूपात हिंसा करणे हे जैन धर्मात महापाप समजले जाते. हिंसेपासून अलिप्त राहण्यास ‘प्राणातिपात विरमण व्रत’ असे म्हटले आहे. एका इंद्रियांपेक्षा ज्या जीवांना अधिक इंद्रिये आहेत त्यांची हिंसा करू नये. मग ते जीव किडे, मुंग्या, डास, ढेकूण, विंचू, सर्प यांपासून ते मानवापर्यंत कोणत्याही प्रकारातील (कोटीतील) असोत. स्वतःला जरी कितीही त्रास, कष्ट, धोका निर्माण झाला, तरी मुनीने कोणत्याही जीवाची हत्या करता कामा नये.

प्राण्यांची व द्रव्याची हिंसा चार प्रकारची असून संकल्प हिंसा, आरंभी हिंसा, उद्योगी हिंसा व विरोधी हिंसा हे ते होत. निरपराध प्राण्यांची सहेतुकपणे शिकार व हिंसा करणे ही ‘संकल्पी हिंसा’ होय. स्वच्छ अन्न शिजवणे, इतर स्वच्छता करणे यांस ‘आरंभी हिंसा’ म्हटले जाते. अर्थार्जन करण्यामध्ये जी हिंसा केली जाते, तिला ‘उद्योगी हिंसा’ म्हणतात. एखाद्या प्राण्याने, व्यक्तीने हल्ला केल्यास त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंसा करणे, अशा आत्मसंरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या हिंसेला ‘विरोधी हिंसा’ म्हणतात.

२. सत्य : सत्याचे वचन व आचरण करणे हे दुसरे महाव्रत आहे. सत्य हे ज्ञानाच्या क्षेत्रात मोडते. असत्याचा त्याग करून निखळ सत्य म्हणजे सत्तेचे वास्तव स्वरूप समजण्याचा प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करावयास हवे.

असत्याचेही चार प्रकार जैनधर्मात कल्पिले आहेत. ‘संकल्पी अतथ्य’ म्हणजे स्वार्थाने प्रेरित होऊन दुसऱ्याच्या हिताहिताचा विचार न करता निरपराध व्यक्तीशी खोटे किंवा असत्य बोलणे. ‘आरंभी अतथ्य’ म्हणजे आजारी व वेड्या माणसांचे किंवा बालकांचे रक्षण करण्यासाठी जाणूनबुजून किंवा सहजही असत्य वचन करणे. ‘उद्योगी अतथ्य’ अर्थार्जन करण्यासाठी व करीत असताना काहीवेळा आपली गुपिते लपवावी लागतात. अशी लपवाछपवी करणे नीतिनेमांच्या विरुद्ध असते. त्या वेळी जे खोटे बोलावे किंवा करावे लागते, त्याला ‘उद्योगी अतथ्य’ म्हणतात. ‘विरोधी अतथ्य’ अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी व करताना आणि स्वतःचे नैतिक संरक्षण करण्यासाठी जे असत्य बोलावे किंवा करावे लागते त्यास ‘विरोधी अतथ्य’ म्हणतात.

३. अस्तेय (अचौर्य) : जैन दर्शनानुसार अस्तेय किंवा अचौर्य हे एक महाव्रत आहे. त्याचा अर्थ चोरी न करणे, कोणाचीही वस्तू किंवा धन त्या व्यक्तीला न विचारता घेणे, पळविणे, अनधिकृतरित्या घेणे, याला चौर्य किंवा चोरी करणे असे म्हणतात.

चौर्याचेही संकल्पी, आरंभी, उद्योगी व विरोधी असे चार प्रकार आहेत. ‘संकल्पी चौर्य’ म्हणजे योजनापूर्वक बुद्धिपुरस्सर रीतीने इतरांचे धन, वस्तू इत्यादींचा अपहार करणे. ‘आरंभी चौर्य’ म्हणजे स्वतःच्या नव्हे, पण दुसऱ्याच्या हितासाठी धन, वस्तू, माहिती इत्यादींचे अपहरण करणे. ‘उद्योगी चौर्य’ म्हणजे आपला उद्योगधंदा व व्यवसाय यशस्वीरीतीने करण्यासाठी व करताना काही माहिती, वस्तुस्थिती, आकडेवारी उघड न करता गुप्तपणे चोरून ठेवणे. ‘विरोधी चौर्य’ म्हणजे न्यायोचित अशा आत्मसंरक्षणासाठी विशेषतः युद्धात स्वतःच्या, कुटुंबाच्या किंवा देशाच्या संरक्षणासाठी विरोधी पक्षाची माहिती, सामग्री, उपकरणे, धनधान्य इत्यादींची चोरी करणे. ही जरी चोरी असली, तरी अपवाद म्हणून क्षम्य ठरू शकते.

४. ब्रह्मचर्य (स्वस्त्रीसंतोष) : जैन दर्शनानुसार साधू व साध्वी यांना कुठल्याही स्वरूपात लैंगिकक्रिया निषिद्ध मानले आहे. भगवान महावीरांनी मात्र ब्रह्मचर्याचा समावेश महाव्रतात केला आहे. पण स्वस्त्रीसंतोष या अणुव्रतात आपल्या वैवाहिक जोडीदाराव्यतिरिक्त अन्य महिला वा पुरूषाशी लैंगिकक्रिया करणे निषिद्ध मानले गेले.

जैनांच्या मते मैथुनाचेही संकल्पी, आरंभी, उद्योगी व विरोधी असे चार प्रकार आहेत. ते पाळले नाहीत, तर स्त्री-पुरूषांना पाप लागते. ‘संकल्पी मैथुन’ म्हणजे व्यवहारात ज्याला व्यभिचार म्हणतात ते. ‘आरंभी मैथुन’ म्हणजे कामवासना तृप्त करण्यासाठी व प्रजोत्पत्ती करण्यासाठी जे मैथुन केले जाते व त्यापुरते असते ते. ‘उद्योगी मैथुन’ म्हणजे जेव्हा कोणतेही मैथुन पैसे मिळविण्यासाठी केले जाते ते. ‘विरोधी मैथुन’ म्हणजे जेव्हा एखादी स्त्री शत्रूच्या जाळ्यात सापडली असता देशकाल परिस्थितीनुरूप इच्छा नसताना मैथुनाला संमती द्यावी लागते किंवा गुप्तहेर स्त्रीला शत्रूकडून माहिती मिळविण्यासाठी शत्रूकडील एखाद्या पुरूषाशी शय्यासोबत करणे अटळ ठरते, तेव्हा तिने केलेला समागम हा ‘विरोधी मैथुनात’ मोडतो.

५. अपरिग्रह (इच्छा-परिमाण) : अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा व धनाचा संचय न करणे; धनधान्य, घरदार, वस्त्रपात्र, इ. भोग्य वस्तू गरजेपुरत्याच ठेवून अधिकाचा त्याग करणे.

परिग्रहाचेही संकल्पी, आरंभी, उद्योगी व विरोधी असे चार प्रकार आहेत. ‘संकल्पी परिग्रह’ म्हणजे भोगलालसा, अहंकार व मोह यांमुळे आपणास नको इतक्या वस्तूंचा संग्रह व संचय करणे. ‘आरंभी परिग्रह’ म्हणजे जीवनाच्या निर्वाहासाठी, आपली कामे करण्यासाठी, इतरांची सेवा करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा संग्रह किंवा संचय करणे. ‘उद्योगी परिग्रह’ म्हणजे उद्योगाशी संबंधित वस्तू त्याला वापराव्या लागतात. एवढेच नव्हे, तर त्या स्वतःच्या मालकीच्याही असाव्या लागतात. अशा वस्तूंचा संग्रह करणे अटळ असतो. अशा वस्तूंच्या संग्रहाला उद्योगी परिग्रह म्हणतात. ‘विरोधी परिग्रह’ म्हणजे अन्यायी आणि अत्याचारी शक्तींपासून स्व-संरक्षण करण्यासाठी जो परिग्रह करावा लागतो तो.

संदर्भ :

  • कांबळे, जालिंदर, ‘अष्टधर्म परिचय’, २०१५.
  • चौधरी, पां. दा. ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास’, नागपूर, १९७९.
  • जोशी, ग. ना. संपा., ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहास’, खंड १ ते १२, पुणे, १९९४.
  • डांगे, सिंधू, ‘जैन धर्म आणि तत्त्वज्ञान’, पुणे, १९८०.
  • दीक्षित, श्रीनिवास हरि, ‘भारतीय तत्त्वज्ञान’, कोल्हापूर, २००२.
  • मेहता, मोहनलाल, जैन आचार, वाराणसी, १९६६.
  • वैद्य, प. ल. ‘जैन धर्म आणि वाङ्मय’, नागपूर, १९४८.

समीक्षक : नवनाथ रासकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.