ईजिप्तच्या दक्षिण भागातील आस्वान या प्रशासकीय विभागाच्या (गव्हर्नोरेट) राजधानीचे ठिकाण व प्रमुख शहर. लोकसंख्या ३,७०,००० (२०२४). नाईल नदीच्या पूर्व तीरावर हे शहर वसले असून नाईल नदीमधील पहिल्या प्रपाताच्या खालच्या
बाजूस अगदी जवळच हे स्थान आहे. समुद्रसपाटीपासून ९९ मीटर उंचीवर हे शहर स्थित आहे. शहराचे अक्षांश व रेखांश अनुक्रमे २४° ५′ २०″ उ. व ३२° ५३′ ५९″ पू. आहे. ज्या भौगोलिक प्रदेशात हे शहर आहे, त्या प्रदेशाचे हवामान उष्ण वाळवंटी प्रकारचे आहे. जगातील सर्वांत उष्ण आणि कोरडे हवामान असलेल्या ठिकाणांपैकी हे एक आहे. येथील उन्हाळे दीर्घकाळ आणि कडक असतात. वर्षभर हवामान उष्ण असते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान सातत्याने ४०° अंश से. पेक्षा अधिक असते, तर हिवाळ्यातील सरासरी तापमान २५° से. पेक्षा अधिक असते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ७.२ ते १८.७ मिमी. इतके कमी असते. पर्जन्याची ही सरासरी गेल्या सहा दशकांतील पर्जन्याच्या नोंदीवरून काढलेली आहे. सहसा येथे पाऊस पडतच नाही.
जगातील प्राचीन काळापासून सातत्याने वस्ती असणाऱ्या शहरांपैकी हे एक आहे. याची स्थापना इ. स. पूर्व ६०० मध्ये झाली असल्याचे इतिहासात पुरावे मिळतात. म्हणजे सुमारे २,६०० वर्षांपासून येथे वस्ती आहे. स्वेन (स्वेनेट) या प्राचीन ईजिप्शियन शहराचेच आधुनिक नाव आस्वान आहे. स्वेन हे त्यावेळी एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. स्वेन याचा अर्थ ‘द मार्ट’ म्हणजे बाजार असा होता. ग्रीक काळात ते साइनी या नावाने, तर अरेबिक काळात ते आस्वान नावाने ओळखले जाऊ लागले. फारोनिक ईजिप्त या प्राचीन ईजिप्त संस्कृतीची दक्षिण सरहद्द आस्वानपर्यंत होती. फारोनिक ईजिप्त म्हणजे इ. स. पू. सुमारे ३,००० वर्षे इतका प्रदीर्घ काळ आफ्रिकेच्या ईशान्य भागात अस्तित्त्वात असणारी प्रबळ व समृद्ध संस्कृती. आस्वान हे रोमन, तुर्क आणि ब्रिटिश राजवटींच्या काळातही त्या त्या राज्यांच्या सरहद्दीवरील लष्करी ठाणे होते. आस्वान येथे ग्रॅनाइटच्या खाणी असून त्या स्थानिक खाणींमधून अनेक प्राचीन वास्तूंसाठी ग्रॅनाइटचा पुरवठा केलेला आहे. अजूनही त्या खाणी अस्तित्वात आहेत. येथील खाणींमधून ग्रॅनाइटाबरोबरच संगमरवरचेही उत्पादन घेतले जाते.
आधुनिक आस्वान शहराचा विस्तार बराच वाढला आहे. सध्या हे शहर एक प्रमुख औद्योगिक, व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. तांबे आणि पोलाद निर्मिती, रसायन उद्योग, खतनिर्मिती, सिमेंट उद्योग, साखर निर्मिती इत्यादी उद्योगधंदे येथे चालतात. इ. स. १९०२ मध्ये बांधून पूर्ण झालेले जुने आस्वान धरण आस्वान शहरापासून दक्षिणेस ५ किमी. वर आहे, तर १९७० मध्ये बांधून पूर्ण झालेले नवे आस्वान धरण या शहरापासून दक्षिणेस ११ किमी. अंतरावर आहे. आस्वान धरणामुळे हे शहर जगप्रसिद्ध झाले आहे. शहरात उच्च औद्योगिक संस्था आहेत. येथे १९८० मध्ये मत्स्योद्योग प्रशिक्षण विद्यालय सुरू करण्यात आले आहे. हिवाळी सहलीचे ठिकाण आणि पर्यटन केंद्र म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. तसेच सूदानकडील व्यापाराचेही हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आस्वान शहराच्या परिसरातील आस्वान धरण, राजांची थडगी, प्राचीन वास्तू, पुरातत्त्वीय ठिकाणे, अबू सिंबेल मंदिर हे जगप्रसिद्ध स्थळ, धरणातील नौकानयन ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. कैरो-आस्वान रेल्वेचे हे दक्षिणेकडील अंतिम स्थानक आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे शहराचे नवीनतम
विस्तारीकरण होत आहे.
शहरात न्यूबियन हे आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय (स्थापना १९९७) असून ते प्रमुख पुरातत्त्वीय केंद्र आहे. त्यात न्यूबियन संस्कृती, कारागिरी, लोककला आणि सांस्कृतिक वारसा या संदर्भातील विविध घटकांचे जतन केलेले आहे. न्यूबियन हे शहर यूनेस्को क्रिएटिव सिटिज नेटवर्कचा (यूसीसीएन) भाग आहे. वैशिष्ट्यपूर्ण संगीत, नृत्यकला, हस्तव्यवसाय, रंगीत ग्रामीण वास्तुकला इत्यादी समृद्ध न्यूबियन परंपरांचे जतन या शहरात केल्याचे आढळते. आस्वान शहराच्या समोरच नाईल नदीच्या पात्रात एलफँटाइनी (आधुनिक जझिरट आस्वान) हे बेट असून त्याच्यावर येब या प्राचीन शहराचे, तसेच ईजिप्सियन, रोमन, सारासेन या प्राचीन संस्कृतींचे अनेक अवशेष पाहायला मिळतात. नवीन आस्वान धरण निर्मितीच्या कालावधीत अनेक सांस्कृतिक भूभाग पाण्याखाली गेले असले, तरी जतन केलेले प्राचीन पुरावशेष एलफँटाइनी बेटावरील आस्वान या प्रशासकीय विभागाच्या वस्तुसंग्रहालयात ठेवले आहेत.
संदर्भ : Kamil, Jill, Aswan and Abu Simbel, American University in Cairo Press, 1993.
समीक्षक : सुरेखा दौंडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
