गुंतवणूकदारांच्या भौतिक (कागदी) स्वरूपातील प्रतिभूतींचे, म्हणजेच भागपत्रे किंवा कर्जरोखे इत्यादींचे इलेक्ट्रॉनिक (ऑनलाईन) स्वरूपात रूपांतर करून समान मूल्याची रक्कम डी–मॅट खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला अभौतिकीकरण अथवा अमूर्तिकरण असे म्हणतात. भारतात सेंट्रल सेक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (सीडीएसएल) आणि नॅशनल सेक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या दोन प्रतिभूती कोषागार (निक्षेपगार) आहेत. याठिकाणी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती जमा व संवर्धित केली जातात आणि प्रतिभूतींचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आवश्यक सुविधा प्रदान करतात. कोषागार (डिपॉजिटरी पार्टीसिपंट – उदा., बँक, ब्रोकरेज फर्म, वित्तीय संस्था इत्यादी) हा एक नोंदणीकृत वित्तीय मध्यस्थ असून तो सीडीएसएल आणि एनएसडीएल या प्रतिभूती कोषागारांचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्यांची नोंद भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाकडे (सेबी) असणे आवश्यक आहे. ज्या गुतंवणूकदारांना त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभूतींचे अभौतिकीकरण करायचे आहे, त्यांची कोषागार मध्यस्थाकडे नोंद असणे, म्हणजेच कोषागार मध्यस्थासोबत ऑनलाईन खाते उघडणे आवश्यक आहे. बँक, दलाल मध्यस्थ संस्था, वित्तीय संस्था किंवा प्रतिभूती व्यवहार करणाऱ्या तत्सम संस्था या कोषागार मध्यस्थ असू शकतात. त्या कोषागार व गुतंवणूकदारांमध्ये समन्वय साधण्यास मदत करतात. गुंतवणूकदाराला त्याच्या नावे असलेली भौतिक प्रतिभूती प्रमाणपत्रे या कोषागार मध्यस्थाकडे हस्तांतरित करावी लागतात. अभौतिकीकरण हे फक्त प्रतिभूतींचे भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करते; मात्र मालकी हक्क अबाधित राहतात.

गुतंवणूकदाराने ऑनलाईन पद्धतीने प्रतिभूतींचे अभौतीकीकरण करण्यासाठी कोषागार मध्यस्थाला विनंती अर्ज केल्यानंतर कोषागार मध्यस्थ गुंतवणूकदाराच्या प्रतिभूती संबंधित जारीकर्त्याला पाठवते. कोषागार मध्यस्थ त्यांच्या कोषागार प्रणालीचा वापर करून संबंधित जारीकर्त्याला प्रतिभूतींवर अभौतिकीकरणाचा शेरा मारून विनंती अर्जासह खात्री व मंजुरीसाठी ऑनलाईन सूचना देतात. जारीकर्ता प्रतिभूतींचा क्रम तपासून खात्री करतात व कोषागार मध्यस्थाची नोंद प्रतिभूतीधारक म्हणून मान्य करून कोषागार मध्यस्थाला ऑनलाईन संमती कळवतात. अशा प्रकारे कोषागार मध्यस्थाला प्रतिभूती जारीकर्त्याकडून अंतिम मान्यता मिळाल्यावर कोषागार गुंतवणूकदाराच्या कोषागार मध्यस्थखात्यात प्रतिभूतींचे मूल्य समप्रमाणात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जमा करतो व अभौतिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतात.

जारीकर्ता किंवा गुतंवणूकदाराकडे नोंद असलेले सर्व प्रकारचे समभाग (इक्विटी) आणि अनेक प्रकारच्या कर्जरोख्यांचे (उदा., समभाग, अधिमानभाग, अंशतः अदा केलेले समभाग, बंधपत्र, ऋणपत्र (डिबेंचर्स), वाणिज्यपत्र, जमा प्रमाणपत्र (डिपॉझिट प्रमाणपत्र), सरकारी प्रतिभूती (जी-एसईसी), परस्पर निधीचे युनिट्स इत्यादी) अभौतिकीकरण केले जाऊ शकते. नियमावलीनुसार अभौतिकीकरणासाठी अर्ज केल्याच्या (भौतिक प्रतिभूती मिळाल्याच्या) दिवसापासून ते १५ दिवसांच्या आत अभौतिकीकरण झाले पाहिजे.

अभौतिकीकरणामुळे प्रतिभूती व्यवहारांना सुरक्षा आणि सुविधा प्राप्त होते. भौतिक स्वरूपात प्रतिभूती प्रमाणपत्रे जवळ बाळगल्यास विविध प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात. उदा., बनावट प्रमाणपत्रे बनविणे, महत्त्वाची प्रमाणपत्रे हरविणे किंवा चोरी जाणे इत्यादी. यांमुळे प्रतिभूती प्रमाणपत्र हस्तांतरणास विलंब होऊ शकतो. म्हणून अशा संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी अभौतिकीकरण करणे आवश्यक ठरते. अभौतिकीकरणानंतर संबंधित मध्यस्थ भौतिक प्रतिभूती प्रमाणपत्रे नष्ट करतो किंवा स्वतःजवळ ठेवतो. अभौतिकीकरण प्रक्रियेसाठी कोषागार मध्यस्थ कोणत्याही प्रकारचे मूल्य आकारात नाही; परंतु टपाल मूल्य आकारू शकते.

निक्षेपस्थान कायदा १९९६ नुसार गुंतवणूकदारास भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक (डी-मॅट) स्वरूपात प्रतिभूती ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असतो; परंतु सेबीच्या सूचनांनुसार सूचीबद्ध रोखेबाजारातील व्यवहारांची देवाण-घेवाण फक्त डि-मॅट माध्यमांद्वारेच झाली पाहिजे, म्हणजेच भौतिक स्वरूपातील प्रतिभूतींचे अभौतिकीकरण करणे आवश्यक आहे. शासनाने २०१९ पासून भौतिक स्वरूपातील प्रतिभूतींचे व्यवहार करण्यासाठी प्रथम त्यांचे अभौतिकीकरण होणे बंधनकारक केले आहे. अभौतिकीकरण न केलेल किंवा भौतिक स्वरूपातील प्रतिभूती तांत्रिक दृष्ट्या साधारण समजल्या जातील आणि त्यांचे व्यवहार होणार नाही. अभौतिकीकरण केलेल्या प्रतिभूती या परस्पर हस्तांतरणीय असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुक्रमांक किंवा ओळख क्रमांक नसतो, तर त्यांना संकेतांक कोड (स्क्रिप्ट कोड) असतो.

याउलट, प्रतिभूती भौतिकीकरण म्हणजे एखाद्या गुतंवणूकदाराने त्याच्याकडील प्रतिभूतींचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपात रूपांतर करणे होय. ज्या गुतंवणूकदाराकडे १ किंवा २ प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत, त्या गुतंवणूकदारांना प्रतिभूतींचे भौतिकीकरण करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. याद्वारे गुतंवणूकदार डी-मॅट खात्याचा सांभाळ खर्च वाचवू शकतात.

संदर्भ : https://nsdl.co.in/services/demat.php

समीक्षक : अविनाश कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.