छायाचित्र संदर्भ

इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम : (१९१३ – १९२७). विसाव्या शतकातील फ्रेंच साहित्यातील एक सप्तखंडात्मक महत्त्वपूर्ण कादंबरी. लेखक मार्सेल प्रूस्त (१८७१-१९२२). ‘आ ला रशेर्श द्यु ताँ पेर्द्यु’  (इं. भा. ‘इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम’) ज्याचा अर्थ होतो, ‘हरवलेल्या वेळेच्या शोधात’. १९०६ ते १९२२ दरम्यान ती लिहिली व १९१३ – १९२७ या कालावधीत प्रकाशित झाली. सुमारे १३,००,००० शब्द असलेल्या या महाकादंबरीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये सर्वांत लांब कादंबरी म्हणून झाली आहे.  ही कादंबरी केवळ तिच्या प्रचंड लांबीमुळेच नव्हे, तर अनोख्या कथनशैलीमुळेही वेगळी ठरते. स्मृती, वेळ, प्रेम आणि कला यांसारखे विषय प्रूस्तने आपल्या शैलीत मांडताना त्या काळातील कथनाचे सर्व पारंपरिक नियम बाजूला सारले.

मार्सेल या मुख्य पात्राच्या अनुभवांभोवती ही कादंबरी आकार घेत जाते. ती थेट आत्मकथा नसली, तरी मार्सेलची व्यक्तिरेखा मोठ्या प्रमाणावर प्रूस्तच्या स्वतःच्या जीवनावर आधारलेली आहे. आपल्यात एक कादंबरीकार दडलेला आहे, ही गोष्ट मार्सेलला हळूहळू कशी उमजत जाते, हे या कादंबरीत दाखविले आहे. फ्रान्स मधल्या नॉर्मांदी (Normandy) प्रदेशातील काबुर्ग (Cabourg) या शहरातल्या ‘ल ग्राँत ओतेल’ (le Grand Hôtel) नावाच्या हॉटेलमध्ये १९०७ – १९१४ या कालावधीत खोली क्रमांक ४१४ मध्ये प्रूस्तचे वास्तव्य होते. कादंबरीच्या काही भागाचे लेखन प्रूस्तने या हॉटेलच्या वास्तव्यात केले. या कादंबरीत काबुर्ग शहराचा उल्लेख बालबेक (Balbec) या नावाने केला आहे.

कादंबरीचा पहिला खंड ‘द्यु कोते द शे स्वान’ (इं. भा. ‘स्वान्स वे’, १९१३) अनेक प्रकाशकांनी नाकारल्यामुळे प्रूस्तने तो स्वखर्चाने प्रकाशित केला. पण त्याची दखल घेतली गेली नाही. मात्र १९१९ साली, ‘आ लोम्ब्र दे जन फी आँ फ्लर’ (इं. भा. ‘विद‍िन अ बड‍िंग ग्रोव्ह’) या दुसऱ्या खंडाला फ्रान्सचा प्रतिष्ठित‘प्री गाँकूर’ (Prix Goncourt) साहित्य पुरस्कार जाहीर झाला. या सन्मानामुळे प्रूस्तला मान्यता आणि प्रसिद्धी लाभली.

कादंबरीच्या पहिल्या खंडाची सुरुवात एका मध्यमवयीन निवेदकाच्या बालपणीच्या रम्य आठवणींनी होते. निवेदक कॉम्बरेतील (Combray) त्याचे घर आणि शार्ल स्वान (Charles Swann), ओदेत् द क्रेसी (Odette de Crécy), जिल्बेर स्वान (Gilberte Swann), मादाम् द गेरमॉन्त (Madame de Guermantes) अशा परिचितांचं चित्रण करतो. या खंडातील एका गाजलेल्या उताऱ्यात, रोज संध्याकाळी आईकडून मिळणाऱ्या मुक्याचे महत्त्व आण‍ि एखाद्या वेळेस मुका न मिळाल्यास  निर्माण होणारी अस्वस्थता लेखक मांडतो. पुढे कथानक स्वान आणि ओदेत् यांच्या गुंतागुंतीच्या प्रेमसंबंधांवर केंद्रित होते. अखेरीस निवेदक पॅरिसमधील स्मृती जागवत जिल्बेर वरील आपल्या पहिल्या प्रेमाचा मागोवा घेतो.

‘आ लोम्ब्र दे जन फी आँ फ्लर’ या दुसऱ्या खंडात निवेदक स्वान आणि ओदेत् यांच्या विवाहाची कथा उलगडतो. शाँझेलिझे (Champs-Élysées) येथील जिल्बेर सोबतच्या भेटी आणि नंतर प्रेमातली निराशा आपल्यासमोर मांडतो. ‘मादम्वाझेल द स्तेरमारिया’ (Mademoiselle de Stermaria), गेरमॉन्त घराण्यातले रोबेर द सँ-लू (Robert de Saint-Loup), ल बाराँ द शारल्युस् (le baron de Charlus) आणि आल्बेर्तीन (Albertine) च्या भेटींबद्दल सांगतो. तिसऱ्या भागात निवेदक पॅरिसमधील आठवणींना उजाळा देत, जिल्बेर स्वान वरील आपल्या प्रेमाचे वर्णन करतो.

आल्बेर्तीन ही पुढील खंडांतील ‘ल कोते द गेरमॉन्त’ १ आणि २’ (इं. भा. ‘गर्मांत वे’ १९२०, १९२१), ‘सोदॉम ए गोमॉर’ १ आणि २ (इं. भा. ‘सिटीज ऑफ द प्लेन’, १९२२), ‘ला प्रिझोन्येर’ (इं. भा. ‘द कॅप्ट‍िव्ह, १९२३) कथाविषयाचा केंद्रबिंदू ठरते. ‘ल कोते द गेरमॉन्त’ या खंडात द्यूशेस द गेरमॉन्त (Duchesse de Guermantes) नायकाला आकर्षित करते. तो प्रयत्नपूर्वक तिच्या शेजारी राहायाला येतो. द्यूशेसशी जवळीक साधायच्या हेतूने तो द्यूशेसच्या भाच्याची सॅ-लूपची भेट घेतो. पॅरिस ला परतल्यावर त्याची आजी मृत्यू पावते, पण त्याला त्याचे दुःख वाटत नाही. आल्बेर्तीन त्याला भेटायला येते. पण मादम्वाझेल द स्तेरमारिया  (Mademoiselle de Stermaria) चे विचार त्याच्या मनात असल्यामुळे, तो या भेटीकडे अलिप्तपणे बघतो.

‘सोदॉम ए गोमॉर’ खंडाच्या पहिल्या भागात कथा प्रामुख्याने शार्ल्युस (Charlus) आणि निवेदकाच्या समलैंगिकतेच्या भोवती फिरते. निवेदकाचा फोबुर्ग सँ-जेरमॅ च्या उच्चभ्रू वर्तुळात वावर वाढतो. त्यांची उच्चभ्रू जीवनशैली त्याला मोहित करते. निवेदक त्याच्या आईबरोबर बालबेकला परततो. आजीच्या जाण्याचं दुःख त्याला आता जाणवू लागते. आल्बेर्तीनला भेटण्याची इच्छा पूर्ण होते, पण तिच्याबद्दलची शंका आणि मत्सर त्याच्या मनात वाढतच जातो. ‘ला प्रिझोन्येर’ मध्ये नायक आणि आल्बेर्तीन पॅरिस मध्ये एकत्र राहतात. तो कधी मत्सराने, तर कधी कंटाळ्याने त्रस्त असतो. त्याला कधी कधी वाटते की, आल्बेर्तीनने निघून जावं म्हणजे त्याला इतर स्त्रियांसोबत आनंद उपभोगता येईल. त्याला शंका येते की आल्बेर्तीन आंद्रे सोबत त्याची फसवणूक करत आहे. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण करतो.

‘आल्बेर्तीन दिस्पार्यू’ (Albertine disparue, १९२५) आल्बेर्तीनच्या जाण्याने नायकाला खूप यातना होतात. तिला परत आणण्याचे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. ज्या वेळी त्याला असे वाटते की, या त्रासातून आल्बेर्तीनचा मृत्यूच आपल्याला सोडवू शकतो, दुर्दैवाने त्याच क्षणी एका पत्राद्वारे त्याला कळतं की, आल्बेर्तीनचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. आल्बेर्तीन आता या जगात नाही. हे स्वीकारण्याचा खडतर प्रवास सुरू होतो. जिल्बेर ची अनपेक्षित भेट होते. ‘ल फिगारो’ मध्ये छापून आलेला स्वतःचा लेख पाहून त्याला आश्चर्य वाटते. ह्या अनुभवानंतर लेखनाची इच्छा दृढ होते.  आंद्रे निवेदकाला आल्बेर्तीनच्या प्रेमसंबंधांविषयी (विवाहबाह्य आणि समलैंगिक) जे काही सांगते, ते ऐकून त्याला काहीही वाटत नाही. न राग, न मत्सर, न दुःख. व्हेनिस येथे वास्तव्यास असताना आल्बेर्तीन बद्दलची उदासीनता त्याला अधिक प्रखरतेने जाणवते.

‘ल ताँ रत्रूवे’ (इं. भा. ‘टाइम रीगेन्ड’, १९२७) हा शेवटचा खंड निवेदकाच्या लेखक होण्याच्या जाणिवेला आणि त्या व्यवसायाच्या स्वीकृतीला समर्पित आहे. ही जाणीव त्याला आलेल्या अनेक आठवणींच्या पुनर्जागरणातून होते. एकूणच या कादंबरीचे सर्व खंड उत्कंठावर्धक कथानक आण‍ि वाचकमनात सतत कुतूहल जागृत ठेवतात. या कादंबरीच्या शेवटच्या तीन खंडांचे प्रकाशन लेखकाच्या मृत्यूनंतर झाले.

संदर्भ :

  • https://archive.org/details/larecherchedut01prou/page/n1/mode/2up
  • https://essentiels.bnf.fr/fr/article/9cba2f21-6b4c-4bb6-aa29-f7b2ced66008-recherche-temps-perdu-resume-par-tomes
  • https://www.academiegoncourt.com/tous-les-laureats-prix-goncourt

समीक्षक : सौरव दांडेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.