
श्पिटेलर, कार्ल : (२४ एप्रिल १८४५-२९ डिसेंबर १९२४). स्वित्झर्लंडमधील साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले लेखक आणि आधुनिक जर्मन साहित्यपरंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व. कवी, महाकाव्यकार, कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून यूरोपीय साहित्यविश्वात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
कार्ल फ्रिडरिष गेऑर्ग श्पिटेलर हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील लीझताल या शहरात झाला. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या बालपणात शिस्त, अभ्यास आणि सामाजिक जबाबदारी यांना महत्त्व होते. बालपणापासूनच श्पिटेलर यांना वाचनाची खूप आवड होती आणि खेळापेक्षाही वाचन, चिंतन आणि एकांत याकडे त्यांचा अधिक कल होता. ‘बायबल’मधील कथा, ग्रीक-रोमन पुराणकथा आणि निसर्गाचे निरीक्षण या सर्वांचा त्यांच्या बालमनावर खोलवर प्रभाव पडला. देव, मानव, स्वातंत्र्य, पाप, नैतिकता आणि दु:ख या संकल्पना त्यांच्या विचारात रुजल्या गेल्या, याचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर स्पष्टपणे दिसून येतो. श्पिटेलर यांनी सुरुवातीला कायद्याचा अभ्यास सुरू केला. पण त्यात ते फारसे रमले नाहीत. त्यानंतर त्यांनी धर्मशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला आणि बाझेल, हायडल्बर्ग आणि झुरिक या विद्यापीठांतून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना धर्मगुरू (पादरी) होण्याची संधी मिळाली होती. परंतु औपचारिक धार्मिक जीवनापेक्षा स्वतंत्र सर्जनशील लेखन अधिक महत्त्वाचे वाटल्याने त्यांनी ही संधी नाकारली. या निर्णयामुळेच त्यांच्या साहित्यिक जीवनाचा पाया रचला गेला.
श्पिटेलर यांनी रशियात सेंट पिट्सबर्ग येथे खाजगी शिक्षक म्हणून सुमारे आठ वर्षे काम करत असताना त्यांना अनेक आर्थिक, सामाजिक तसेच भावनिक समस्यांना तोंड द्यावे लागले. परदेशातील एकाकीपण, सांस्कृतिक जीवन आणि अनिश्चित भविष्य यांमुळे त्यांना मानसिक संघर्षाचा सामना करावा लागला. या काळात त्यांच्या अंतर्मनाचा शोध अधिक तीव्र झाला. मानवी व्यक्तिमत्त्व, सर्जनशीलता, दु:ख आणि स्वातंत्र्य या विषयांवर त्यांनी गंभीर चिंतन केले. १८७९ मध्ये स्वित्झर्लंडला परतल्यानंतर श्पिटेलर यांनी शिक्षक, पत्रकार आणि संपादक म्हणून काम केले. तसेच ‘नॉये त्स्युरषर त्सायतुंग’ सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांसाठी लेखनही केले. त्यांनी १८८३ मध्ये मारिया ऑप द हॉफ यांच्याशी विवाह केला. पत्नीला मिळालेल्या वारसाहक्क संपत्तीमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि त्यामुळे ते पूर्णवेळ साहित्यनिर्मितीकडे वळले. दरम्यानच्या काळात त्यांना साहित्यिक म्हणून ओळख मिळू लागली.
श्पिटेलर हे त्यांच्या महाकाव्यात्मक काव्यलेखनासाठी आणि पुराणकथांवर आधारित लेखनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये ग्रीक-रोमन पुराणकथांचा प्रभाव दिसून येतो. या पुराणकथांना आधुनिक दृष्टिकोनातून नव्याने मांडले. त्यांचे साहित्य मुख्यतः प्रतीकात्मक, महाकाव्यात्मक आणि तत्त्वज्ञानप्रधान आहे. प्राचीन ग्रीक मिथकांचा वापर करून आधुनिक मानवाच्या अंतर्गत संघर्षांचे चित्रण त्यांच्या साहित्यात येते. श्पिटेलर यांनी पुराणकथांना केवळ पुनरुज्जीवित केले नाही, तर त्यांना आधुनिक समाजाशी जोडून मानवी अस्तित्वाचे प्रश्न उभे केले. त्यांनी ‘प्रोमेथॉयस उंड एपिमेथॉयस’ (१८८१, Prometheus and Epimetheus) हे पहिले महाकाव्य लिहिले. यामध्ये ग्रीक पुराणातील प्रोमेथॉयस आणि एपिमेथॉयस या दोन भावांच्या माध्यमातून स्वातंत्र्य, निष्ठा, सामाजिक बंधन आणि आत्मसंघर्ष याबद्दलचे विचार मांडले. यातील प्रोमेथॉयस हा स्वातंत्र्याचा आणि अंतर्मनाचा प्रतिनिधी आहे, तर एपिमेथॉयस हा परंपरा व सामाजिक नियमांचे पालन करणारा नायक आहे. पुढे या महाकाव्यातील रिक्त जागा भरून काढण्यासाठी ‘प्रोमेथॉयस देडर डुल्डर’ (१९२४) या ग्रंथाचे लेखन केले. ज्यात दु:ख आणि सहनशीलतेचा अधिक खोल अर्थ अधोरेखित केला आहे. ‘ओलेंपिशर फ्र्युलिंग’ (१९००–१९०५; सुधारित १९१०, इं. शी. द ऑलिंपिक स्प्रिंग) हे त्यांच्या लेखनातील सर्वात महान आणि विस्तृत असे महाकाव्य मानले जाते. या काव्याची रचना आईँबिक हेक्समीटर मध्ये केलेली आहे. चार भागांत लिहिलेल्या ‘दी आउटफार्ट’, ‘हेरा दी ब्राउट’, ‘दी होअे त्साईट’ आणि ‘एन्डे उंट वेन्डे’ या दीर्घ काव्यात ग्रीक देवतांच्या कथांच्या साहाय्याने मानवी समाज, सत्ता, नैतिक अध:पतन, प्रेम, संघर्ष, आशा-निराशा आणि परिवर्तन यांची प्रतीकात्मक मांडणी केली आहे.
‘इमागो’ (१९०६) ही त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. मानवी मन, व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि अंतर्गत संघर्ष यांचे सूक्ष्म चित्रण या कादंबरीत आढळते. मानवी मनातील ‘अंतरिक प्रतिमा’ (Inner Image) या संकल्पनेवर आधारित ही कादंबरी मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्टाफ युंग (१८७५-१९६१) यांच्यावरही प्रभाव टाकते. महाकाव्य आणि कादंबरी लिखानाबरोबरच त्यांनी लघुकथा, कविता, निबंध आणि साहित्यिक समीक्षा लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखनात धर्म, निसर्ग, व्यक्तिस्वातंत्र्य आणि अंतर्मनाचा शोध हे प्रमुख विषय आढळतात. यामध्ये ‘एक्स्ट्रा मुन्डाना’ (अदरवर्ल्डली, १८८३), ‘श्मेटरलिंगे’ (बटरफ्लाइज,१८८९), ‘देअर पार्लमेंट्येअर’ (१८८९), ‘गुस्ताव’ (१८९२), ‘ग्लोकेनलिडर’ (१९०६), ‘द बॅलड’ (१८९६) अशा काव्यसंग्रहांचा समावेश होतो. तसेच कथा व लघु-कादंबरी या साहित्य प्रकारामध्येही त्यांनी ‘कोन्राड देअर लॉइटनान्ट’ (१८९८) या लघुकथात त्या काळातील निसर्गवादाचे (नॅचरलिझम) चित्रण केलेले आहे व ‘टू लिटल मिसोजिनिस्ट’ (१९०७) ही त्यांची आत्मकथनात्मक कथा आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काही प्रमाणात निबंध व वैचारिक लेखनही केले.
कार्ल श्पिटेलर यांच्या विविधांगी काव्यलेखनाची आणि तत्त्वज्ञानात्मक विचाराची खोली लक्षात घेऊनच १९१९ या वर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला. परंतु प्रत्यक्ष हा सन्मान १९२० मध्ये दिला गेला. विशेषतः ‘ओलेंपिशर फ्र्युलिंग’ या महाकाव्यासाठी त्यांना हा सन्मान मिळाला. यामुळे ते स्वित्झर्लंडचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक ठरले. एकूणच कार्ल श्पिटेलर हे केवळ कवी नव्हते, तर मानवी आत्म्याचा शोध घेणारे तत्त्वज्ञ व लेखक होते. त्यांच्या साहित्याने मिथक आणि आधुनिकता, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र, वैयक्तिक संघर्ष आणि सार्वत्रिक मूल्ये यांचा अद्वितीय संगम साधला. आधुनिक जर्मन साहित्याच्या इतिहासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
लूसर्न येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Jung, C. G., Symbols of Transformation, Routledge & Kegan Paul, 1956.
- Kaiser, Gerhard, Carl Spitteler: Leben und Werk, Artemis Verlag, 1960.
- NobelPrize.org biography & facts on Carl Spitteler. NobelPrize.org
- Robertson, Ritchie, Modern German Literature, Oxford UP, 2004.
समीक्षक : अशोक कदम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
