आधुनिक वैद्यकीय सेवा ही केवळ आजार बरा करण्यापुरती मर्यादित न राहता रुग्ण, आरोग्यसेवक व समाज यांच्या सुरक्षिततेवर केंद्रित झालेली आहे. रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य संस्था या ठिकाणी रुग्ण व रुग्णालयीन कर्मचारी यांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका अधिकाधिक असतो. अशा परिस्थितीत संसर्गाचा प्रसार रोखणे, आरोग्यसेवेमधील गुणवत्ता राखणे आणि रुग्णालयीन संसर्गांचे (Healthcare Associated Infections – HAI) प्रमाण कमी करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ठरते. या उद्देशाने विकसित झालेल्या परिचर्येच्या विशेष शाखेस संसर्ग नियंत्रण परिचर्या असे म्हणतात. रुग्णालयीन संसर्गाचे प्रमाण कमी करणे, रुग्णालयातील मृत्युदर घटणे, उपचार खर्च कमी करणे, आरोग्यसेवकांचे संरक्षण करणे, आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारणे इत्यादी कारणांमुळे वैद्यकीय क्षेत्रात संसर्ग नियंत्रण परिचर्या उपयुक्त ठरते.

इतिहास : संसर्ग नियंत्रणाची संकल्पना मानवी संस्कृती एवढीच प्राचीन असली, तरी तिचे शास्त्रीय स्वरूप अठराव्या व एकोणिसाव्या शतकात विकसित झाले. प्रारंभी संसर्ग व रोगप्रसार यामागील कारणे अस्पष्ट होती; तथापि स्वच्छता, विलगीकरण (Isolation) आणि वातावरणा य शुद्धतेचा आजारांवर परिणाम होतो, याची जाणीव हळूहळू समाजाला होऊ लागली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी स्वच्छता, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी व स्वच्छ परिसर यांचा रुग्णांच्या बरे होण्यावर होणारा परिणाम शास्त्रीय निरीक्षणातून अधोरेखित केला. त्यांच्या कार्यामुळे परिचर्येत स्वच्छता व संसर्ग प्रतिबंधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच कालखंडात सूक्ष्मजीव सिद्धांत (Germ Theory) मांडला गेल्याने संसर्गाच्या कारणांची वैज्ञानिक उकल झाली. विसाव्या शतकात रुग्णालयांची संख्या, शस्त्रक्रिया पद्धती, आक्रमक उपचार व प्रतिजैविकांचा वापर वाढू लागला. यामुळे रुग्णालयीन संसर्गांची (Hospital Acquired Infections) समस्या प्रकर्षाने पुढे आली. दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिक रुग्णालय व्यवस्थेच्या विस्तारामुळे संसर्ग नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षित परिचारिकांची गरज भासू लागली. १९५०–६० च्या दशकात अमेरिका व युरोपमध्ये संसर्ग नियंत्रण समित्या (Infection Control Committees) स्थापन करण्यात आल्या. याच काळात संसर्ग प्रतिबंध व नियंत्रणासाठी समर्पित परिचारिकांची भूमिका औपचारिक रीत्या विकसित झाली. पुढे या परिचारिकांना संसर्ग नियंत्रण परिचारिका (Infection Control Nurse; ICN) किंवा संसर्ग प्रतिबंधक (Infection preventionist) म्हणून ओळख मिळाली. एकविसाव्या शतकात जागतिक पातळीवरील संसर्गजन्य आजार, प्रतिसूक्ष्‍मजीवी प्रतिकारक्षमता (AMR), तीव्र श्वसनविषयक संलक्षण (SARS), मध्य-पूर्व श्वसनविषयक संलक्षण (MERS), इबोला (Ebola) आणि कोविड – १९ सारख्या महामारींमुळे संसर्ग नियंत्रण परिचर्येचे महत्त्व अभूतपूर्व रीत्या वाढले. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना, राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा व मानांकन संस्था यांनी संसर्ग नियंत्रण परिचर्येसाठी स्पष्ट धोरणे, मानके व प्रशिक्षण संरचना विकसित केल्या. भारतामध्येही वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये संसर्ग नियंत्रण परिचर्येला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), रुग्णालये आणि आरोग्यसेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ (NABH) आणि राज्यस्तरीय आरोग्य यंत्रणांच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे ही शाखा व्यावसायिक, संशोधनाधिष्ठित व धोरणात्मक स्वरूपात विकसित होत आहे. आज संसर्ग नियंत्रण परिचर्या ही केवळ साहाय्यक भूमिका न राहता रुग्ण सुरक्षितता, गुणवत्ता व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य संरक्षणाचा कणा म्हणून ओळखली जाते.

व्याख्या : संसर्ग नियंत्रण परिचर्या ही परिचर्याशास्त्राची एक विशेषीकृत शाखा असून रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध, नियंत्रण, निरीक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब करून कार्य करणाऱ्या परिचर्या सेवेस “संसर्ग नियंत्रण परिचर्या” असे म्हणतात. ही शाखा परिचर्याशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रोगपरिस्थितीविज्ञान (Epidemiology), सार्वजनिक आरोग्य, गुणवत्ता व्यवस्थापन व रुग्ण सुरक्षितता या क्षेत्रांचा समन्वय साधते.

संसर्ग नियंत्रण परिचारिका : संसर्ग नियंत्रण परिचारिका ही प्रशिक्षित परिचारिका असून ती आरोग्य संस्थेमध्ये संसर्ग प्रतिबंध व नियंत्रणासाठी धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे, निरीक्षण करून नोंदी ठेवणे व आरोग्यसेवकांना मार्गदर्शन करणे या जबाबदाऱ्या पार पाडतात.

शैक्षणिक पात्रता पात्रता अटी : संसर्ग नियंत्रण परिचारिका म्हणून कार्य करण्यासाठी पुढील पात्रता आवश्यक असते : मान्यताप्राप्त संस्थेतून परिचर्या पदवी (B.Sc. Nursing). वैद्यकीय–शल्यचिकित्सा परिचर्येतील किमान १–२ वर्षांचा चिकित्सालयीन अनुभव. संसर्ग नियंत्रण / रुग्ण सुरक्षितता / गुणवत्ता व्यवस्थापन यातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका किंवा विशेष प्रशिक्षण संसर्ग प्रतिबंध मार्गदर्शक तत्त्वे, जैववैद्यकीय अपशिष्ट नियम व रुग्णालयीन धोरणांचे ज्ञान.

परिचारिकेचे गुणधर्म : उत्कृष्ट संसर्ग नियंत्रण परिचारिकेमध्ये पुढील गुण असणे आवश्यक आहे : १) शास्त्रीय दृष्टिकोन व निरीक्षण क्षमता, २) निर्णयक्षमता व समस्या सोडविण्याचे कौशल्य, ३) प्रभावी संवादकौशल्य, ४) नेतृत्वगुण व समन्वय क्षमता, ५) नैतिकता, गोपनीयता व जबाबदारीची जाणीव, ६) प्रशिक्षण व अध्यापन कौशल्य, ७) अद्ययावत ज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती.

आरोग्य संबंधित संक्रमण प्रतिबंध धोरणे

परिचारिकेची कार्यव्याप्ती : संसर्ग नियंत्रण परिचारिका शासकीय व खाजगी रुग्णालये, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, वैद्यकीय शिक्षण संस्था, दीर्घकालीन उपचार केंद्रे, सार्वजनिक आरोग्य संस्था, गुणवत्ता व मानांकन विभाग (NABH इ.), संसर्ग नियंत्रण परिचारिकेचे कार्यवर्णन (Job Description) इ. क्षेत्रांमध्ये कार्य करतात.

परिचारिकेच कार्ये : १) रुग्णालयीन संसर्गांचे सातत्यपूर्ण निरीक्षण व नोंद ठेवणे, २) संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण धोरणे (IPC Policies) तयार करणे, ३) हात स्वच्छता, वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर (PPE) व निर्जंतुकीकरण प्रक्रियेचे पालन होत आहे याची खात्री करणे, ४) जैववैद्यकीय अपशिष्टे व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी करणे, ५) संसर्ग उद्रेकाच्या वेळी तातडीने उपाययोजना राबविणे, ६) आरोग्यसेवकांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे. प्रतिजैविक प्रतिकारक्षमता (AMR) प्रतिबंधासाठी योगदान देणे इत्यादी.

परिचारिकेची कर्तव्ये : १) संसर्ग प्रतिबंध धोरणांची अंमलबजावणी करणे. २) रुग्ण, कर्मचारी व अभ्यागत यांना संसर्ग प्रतिबंधाचे मार्गदर्शन करणे. ३) संसर्गजन्य घटनांचे विश्लेषण व अहवाल तयार करणे. ४) गुणवत्ता सुधारणा उपक्रमात सहभाग घेणे. ५) धोरणनिर्मिती व संशोधनासाठी माहिती संकलित करणे इत्यादी.

संसर्ग नियंत्रण परिचर्येची मानके : आरोग्यसेवा संघातील संसर्ग नियंत्रण परिचर्या ही प्रामुख्याने रोगजंतूंचा प्रसार रोखने यावर केंद्रित असते.  ही आरोग्यसेवा सर्वसामान्य रुग्णांना लागू होणारी प्रमाणित खबरदारी उपाययोजना आणि विशिष्ट संसर्गजन्य घटकांनुसार तयार केलेली प्रसाराधारित खबरदारी उपाययोजना (उदा., संपर्क, बिंदूजन्य, हवेद्वारे) यांवर अवलंबून असते.

  • प्रमाणित खबरदारी उपाययोजना : यामध्ये रुग्ण व आरोग्य कर्मचारी या दोहोंचा विचार करून तयार केलेल्या मूलभूत उपायांचा समावेश होतो. उदा., हातांचे आरोग्यशास्त्र (hand hygiene), वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर, सुरक्षित अंत:क्षेपण व तीक्ष्ण/धारदार वैद्यकीय अपशिष्टांचे व्यवस्थापन व विल्हेवाट, उपकरणांचे निर्जंतुकीकरण इत्यादी.
  • प्रसाराधारित खबरदारी उपाययोजना : जेव्हा ज्ञात, अज्ञात किंवा शंकास्पद घटकांचा प्रसार रोखण्यासाठी केवळ प्रमाणित  संसर्ग नियंत्रित खबरदारी योजना अपुऱ्या पडतात, तेव्हा यांचा वापर केला जातो. उदा., थेट संपर्कातून होणारे रोग रोखण्यासाठी हातमोजे किंवा गाउन यांचा वापर करावा. श्‍वसनमार्गातून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे पसरणाऱ्या आजार रोखण्यासाठी (उदा., डांग्या खोकला, शीतज्वर इ.) रुग्णापासून तीन ते सहा फुटांच्या अंतरात शल्य मुखवटा (surgical mask) व डोळ्यांच्या संरक्षकांचा वापर करावा. हवेद्वारे होणारा रोगप्रसार रोखण्यासाठी (उदा., क्षयरोग, गोवर) रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवून त्याला उच्च दर्जाचे श्वसनित्र (respirator) वापरावेत.
  • सूक्ष्मजंतूंचा प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने रोज बिछाना स्वच्छ करणे, औषध देण्याची प्रक्रिया, मूत्रमार्गात शलाका (catheter) घालणे, जखमेवर मलमपट्टी करणे इत्यादी कृतीदेखील अत्यावश्यक असतात.
संसर्ग साखळी तोडणे

संसर्ग साखळी तोडणे : संसर्ग नियंत्रण ही आरोग्यसेवेतील एक अत्यावश्यक, पुराव्यावर आधारित (evidence-based) प्रक्रिया असून तिचा मुख्य उद्देश संसर्ग साखळीतील (Chain of Infection) एक किंवा अधिक घटक खंडित करणे हा आहे. संसर्ग साखळीमध्ये पुढील सहा दुव्यांचा समावेश होतो.

  • संसर्गजन्य घटक : विषाणू, जीवाणू, बुरशी यांसारख्या प्रत्यक्ष रोगजनकांचा या घटकांत समावेश होतो. या टप्प्यावर साखळी खंडीत करण्याकरिता प्रतिसूक्ष्मजीवी (antimicrobial) औषधांचा वापर आणि वैद्यकीय आणि वैयक्तिक साधनांचे योग्य निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते.
  • साठवणूक कक्ष (reservoir) : सजीव, पाणी, दूषित पृष्ठभाग व अन्य अशी ठिकाणे जिथे रोगजनक राहतात व आपली संख्या वाढवतात यांना रोगजंतूंचे साठवणूक कक्ष असे म्हणतात. अशा वेळी आजारग्रस्त व्यक्तींचे विलगीकरण करणे, इतर सजीवांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, अपशिष्‍टांचे योग्य व्यवस्थापन करणे असे मार्ग अवलंबले जातात.
  • संसर्गजन्य घटक बाहेर पडण्याचा मार्ग : खोकणे, शिंकणे, थुंकी, उघड्या जखमा इत्यादी मार्गांतून रोगजंतू साठवणूक कक्षातून बाहेर पडतात. या मार्गांद्वारे रोगजंतूंचा प्रसार होऊ नये याकरिता मुखवट्याचा (mask) वापर करावा, आजारी असताना इतरांच्या संपर्कात येऊ नये, वापरलेले रुमाल किंवा कागद यांची योग्य विल्हेवाट लावावी.
  • संसर्ग प्रसाराचा प्रकार : थेट संपर्क, श्वसन, दूषित पृष्ठभाग अशा विविध प्रकारे रोगजंतूंचा एका व्यक्तीकडून दूसरीकडे प्रसार होतो. हातांच्या स्वच्‍छतेचे काटेकोर पालन करणे, सुरक्षित अंतर ठेवणे तसेच संरक्षण उपकरणांचा वापर करणे अशा उपायांद्वारे ही साखळी येथे थांबविणे शक्य आहे.
  • संसर्गजन्य घटक शरीरात प्रवेशाचा मार्ग : तोंड, नाक, डोळे, जखम यांद्वारे रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. चेहऱ्याला स्पर्श करणे टाळणे, जखमा व्यवस्थित स्वच्छ करून मलमपट्टी करणे, श्लेष्मल त्वचेचे विशेष निगा राखणे, इ.
  • संवेदनशील व्यक्ती (susceptible host) : रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीस आजाराची लागण होण्‍याची शक्यता अधिक असते. अशी व्यक्ती असुरक्षित असते. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सकस आहार यांसोबतच आरोग्य विभागाद्वारे सुचवलेले लसीकरण पूर्ण करून घेणे, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास साहाय्य होते.

पोषणात्मक साहाय्य, आरोग्य शिक्षण, लवकर निदान व त्वरित उपचार, संसर्ग नियंत्रण संच (तीन ते पाच पुरावा आधारित पद्धतींचा एक संरचित संच; Infection Control Bundles)  या सर्वांचा उद्देश आरोग्यसेवा संबंधित संसर्ग (Healthcare Associated Infections – HAI) कमी करणे हा आहे.

संसर्ग नियंत्रण परिचर्या ही आधुनिक आरोग्यसेवेची एक अपरिहार्य व अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. रुग्ण सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य संरक्षण व गुणवत्ता-केंद्रित आरोग्यसेवा यांचा कणा म्हणून संसर्ग नियंत्रण परिचारिकेची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. वाढत्या संसर्गजन्य आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही शाखा भविष्यात अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

संदर्भ :

समीक्षक : सरोज वा. उपासनी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.