मिखेल, हार्टमुट : (१८ जुलै १९४८). जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक अशा विशिष्ट प्रथिनांची संरचना निश्चित केल्याबद्दल त्यांना योहान डीझेनहोफर आणि रॉबर्ट ह्यूबर यांच्यासह १९८८ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
मिखेल यांचा जन्म जर्मनीतील लूडव्हिग्झबर्ग येथे झाला. ट्यूबिंगन विद्यापीठात त्यांनी क्ष-किरण स्फटिकविज्ञानाचे तंत्र वापरून सूक्ष्मजीवांच्या शरीराचा आराखडा अभ्यासण्याकरिता आवश्यक प्रथिनांच्या स्फटिकीकरणावर सविस्तर अभ्यास केला. त्यांनी वुर्ट्सबर्ग विद्यापीठात पीएच.डी. पदवी संपादन केली (१९७७). त्यानंतर ते पश्चिम जर्मनीच्या मार्टिनस्राइड, माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री येथे रूजू झालेत (१९७९). पुढे १९८७ मध्ये फ्रँकफुर्ट येथील रेणवीय कला जीवशास्त्र विभागाच्या माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री येथे संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच ते गॉथे विद्यापीठात जीव-रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते.
मिखेल यांनी विशिष्ट सूक्ष्मजीवातील प्रकाशसंश्लेषण करणाऱ्या प्रथिन संकुलांचे (प्रोटीन कॉम्प्लेक्स) त्रिमितीरूप माहीत करून घेण्याकरिता क्ष-किरण स्फटिकविज्ञान तंत्राचा वापर केला. प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशसंश्लेषक अभिक्रिया केंद्राचा (photosynthetic reaction centre) त्यांनी अभ्यास केला. या केंद्रातील चार-प्रथिन-संकुलाची (complex) त्रिमितीय रचना जाणून घेण्याकरिता त्यांनी पटलाशी (membrane) संलग्न प्रथिन-संकुलाचे शुद्ध स्फटिक स्वरूपात स्फटिकीकरण करण्याची पद्धत विकसित केली. पुढे क्ष-किरण विवर्तन (X-ray diffraction) तंत्राचा वापर करून या प्रथिनाची संरचना सूक्ष्म पातळीवर निश्चितपणे माहीत झाली. या तंत्राचा वापर करून प्रथिन-संकुलामधील जवळपास १०,००० रेणूंची नेमकी रचना त्यांनी शोधून काढली. या संशोधनामुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया समजायला मदत झाली; तसेच संश्लेषणाच्या पद्धतीत वनस्पती व सूक्ष्मजीव यांमधील फरक असल्याचे समजले. या सर्व संशोधनामुळे पटलावरील प्रथिनांच्या स्फटिकीकरणाची पद्धत निश्चित करता आली
मिखेल यांना पुढील अनेक मान-सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे : गॉटफ्रिड विल्हेम लेबनीझ पारितोषिक (१९८६), डेलब्रुक पारितोषिक (१९८६) आणि फॉरमेमरस पारितोषिक.
मिखेल यांनी २०२६ मध्ये चीनमधील चांगचुन येथील जिलिन विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापकपद स्वीकारले आहे.
कळीचे शब्द : #प्रथिन-संकुल #प्रोटीन कॉम्प्लेक्स #त्रिमितीरूप,
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/chemistry/1988/michel/biographical/
- https://www.biophys.mpg.de/person/26855/2360
- https://www.britannica.com/biography/Hartmut-Michel
- https://www.research-in-germany.org/en/research-landscape/nobel-laureates/hartmut-michel.html
समीक्षक : रंजन गर्गे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
