भारतात साधारणपणे उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू आहेत. निरनिराळ्या ठिकाणी ४८0 से. उष्णतेपासून ते गोठवणाऱ्या थंडीपर्यंत तापमान अनुभवास येते. परिणामी, जगात कोठेही नसेल असे वनप्रकार आणि जैववैविध्य येथे दिसून येते. अशा परिस्थितीत निरनिराळ्या प्रदेशांतील हवेत, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये अनेक प्रकारचे परागकण तरंगत असतात. या परागकणांमुळे श्वसनाचे रोग होतात, हे सर्वप्रथम चार्ल्स ब्लाकले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने १८७३ मध्ये दाखवून दिले.

तक्ता क्र. १: परागकण दिनदर्शिका.

विसाव्या शतकाच्या मध्यावर भारतात शिवपुरी आणि त्यांचे सहकारी यांनी परागकणामुळे होणाऱ्या मानवाच्या शरीरावरील परिणामांचा अभ्यास केला. त्या पाठोपाठ देशात अनेक शहरात वायुजीव सर्वेक्षण आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम यांवर संशोधन सुरू झाले. निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या अभ्यासाची संकलित माहिती उपलब्ध झाल्यास योग्य औषधोपचार करणे सोपे जाईल, अशा विचाराने दिल्लीच्या सेंटर फॉर बायोकेमिकल्समधील C.S.I.R. या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर एक प्रकल्प राबविला. देशामधील सर्व राज्यांतील उपलब्ध माहितीवर आधारित परागकण दिनदर्शिका तयार केल्या. प्रत्येक राज्यातील नागर-वस्तीतील महत्त्वाच्या व मोठ्या संख्येने वाढविल्या जाणाऱ्या वृक्ष व झुडुपांच्या परागकणांची माहिती ऋतूनुसार गोळा केली. परागकण गोळा करून त्यांचे रासायनिक पृथक्करण करून, त्यांच्या उपद्रवक्षमतेवर संशोधन केले, आणि राज्यवार दिनदर्शिका तयार केल्या. या दिनदर्शिकांमुळे परागकणांमुळे होणाऱ्या ॲलर्जीच्या आजारांवर उपचार करणे सोपे झाले. उदाहरण म्हणून महाराष्ट्र राज्याची परागकण दिनदर्शिका तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे.

तक्ता क्र. २ : गवत प्रकारांची परागकण दिनदर्शिका.

धान्ये व इतर गवत प्रकारांचे परागकणसुद्धा श्वसनेंद्रीये व कातडी यांना अपायकारक ठरतात. तक्ता क्र. २ मध्ये दिलेले धान्य व गवतप्रकार वर्षभरात निरनिराळ्या ऋतूमध्ये निरनिराळ्या ठिकाणी फुलत असतात.

साधारणपणे देशात परागकण प्रसाराचे दोन ऋतू (फेब्रुवारी-एप्रिल आणि सप्टेंबर-नोव्हेंबर) आहेत. सहसा वृक्षांचे फुलणे आणि पराग-प्रसारण १० ते ३० दिवस, तर झुडुपांचे फुलणे जास्त दिवस चालते. कडुलिंब, सुरू, नारळ व तुती यांच्या किनारी प्रदेशात वाढणाऱ्या झाडांना बऱ्याच काळपर्यंत फुले येत राहतात. माठ, मायाळू व निलगिरी यांच्या काही जाती वर्षभर फुलत असतात आणि त्यांचे पराग पसरत असतात. श्वसनेंद्रीये आणि कातडी परागकणाच्या ॲलर्जीमुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णांवर अशा दिनदर्शिकांमधील माहितीच्या आधारे उपाय करणे सुलभ झाले आहे.

 

 

संदर्भ :

  • Singh, B.P., Singh, A.B. & Gangal, S.V., Pollen Calendars of Different States, India,CSIR Centre for Biochemicals, Delhi,1992.

समीक्षक – बाळ फोंडके