ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद. हे महत्त्वाच्या व विश्वसनीय मानल्या गेलेल्या दशोपनिषदांपैकी सर्वाधिक प्राचीन उपनिषद मानले जाते. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजेच ईशोपनिषद. त्यामुळे वैदिक संहितेमध्ये अंतर्भूत होणारे हे एकमेव उपनिषद ठरते. हे वाजसनेयी उपनिषद, संहितोपनिषद, मंत्रोपनिषद इ. नावांनीही ओळखले जाते. याज्ञवल्क्य या उपनिषदाचा ऋषी असून ‘ईशा वास्यमिदं सर्वम्’ या प्रथम मंत्रामुळे प्रस्तुत उपनिषदाला हे नाव मिळाले. केवळ अठरा मंत्र असलेल्या या लहान उपनिषदाचे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने फार मोठे महत्त्व आहे. कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे. आत्म्याचे स्वरूप, माहिती असलेले स्वरूप, ज्ञानकर्मसमुच्चय, व्यक्त आणि अव्यक्ताच्या उपासनेचे फल हे यातील विषय म्हणता येतील.

ज्ञान-कर्म समुच्चय आणि आध्यात्मिक व अधिभौतिक जीवनाचे परस्परपूरकत्व ही दोन अतिशय महत्त्वपूर्ण तत्त्वे ईशोपनिषदात सांगितली आहेत. अनासक्त राहून केलेले कर्म हे बंधनकारक न ठरता उलट ईश्वरविषयक ज्ञान प्राप्त करून घेण्याचे साधन ठरते. या निष्काम कर्मयोगाच्या मूलतत्त्वाचा प्रथमपुरस्कार ईशोपनिषदामध्ये दिसतो.

                         ईशा वास्यमिदं सर्वम्। यत्किं च जगत्यां जगत्॥

                         तेन त्यक्तेन भुञ्जीथा। मा गृधः कस्य स्विद्धनम्॥ ईशोपनिषद् १

अर्थ : हे सर्व जग ईश्वरमय असून त्याचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. यामध्ये उल्लेखिलेला त्याग हा जीवनाचा नसून तो अहंकाराचा व स्वार्थाचा आहे. या उपनिषदाचा आत्मतत्त्वाचे वरवर विरोधाभासी, गूढ, परंतु नेमक्या शब्दांमधील वर्णन हेदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.

आत्मन् (आत्मा) स्थिर (आणि तरीही) मनापेक्षाही वेगवान आहे. इंद्रियांनाही तो अप्राप्य आहे; कारण तो सर्वांच्या पलीकडे आहे. तोच वायू आणि जल यांना गती देतो. आत्मतत्त्व चल, अचल, नजीक व दूर, जगाच्या आत आणि बाहेरही (सर्वव्यापी) आहे. तसेच आत्मा सर्वव्यापी, शुद्ध, शरीररहित, अखंड, स्नायूरहित, निर्मल, पापरहित , द्रष्टा, सर्वज्ञ, सर्वश्रेष्ठ आणि स्वयंभू आहे. त्यानेच जगाला यथार्थ ज्ञान दिले.

भगवद्गीतेमध्ये असलेल्या स्थितप्रज्ञसंकल्पनेचे मूळ ईशोपनिषदामध्ये दिसते.

जो ज्ञाता सर्व जग स्वतःमध्ये पाहतो, तसेच सर्व जगात आपल्याला पाहतो, तो कशाचाच तिरस्कार करत नाही. जेव्हा ज्ञानी सर्व जग आपणच आहोत असा अनुभव घेतो, तेव्हा त्याला मोह आणि शोक कसा असणार? केवळ कर्म (अविद्या) किंवा केवळ ज्ञान (विद्या) यांच्याद्वारे सर्वोच्च श्रेयस प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी दोन्हीचा समुच्चय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रस्तुत उपनिषदामध्ये केलेले दिसते.

त्याचप्रमाणे केवळ व्यक्त तत्त्वाची किंवा केवळ अव्यक्त तत्त्वाची उपासना करणे पुरेसे नाही. जो साधक दोन्ही एकाच वेळी जाणतो, तो व्यक्ताच्या उपासनेने मृत्यू टाळतो व अव्यक्ताच्या उपासनेने अमृतत्व मिळवितो.

व्यवहार आणि तत्त्वज्ञानाचा अतिशय सुंदर मिलाप ईशोपनिषदात दिसतो. त्यामुळॆ सर्वार्थाने हे उपनिषद अतिशय महत्त्वाचे आहे.

संदर्भ :

  • Ranade, R. D. A Constructive Survey of Upanishadic Philosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
  • दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, २०१५.
  • सिद्धेश्वरशास्त्री, चित्राव, पनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.
  • http://vedicheritage.gov.in/upanishads/ishopanishad/

समीक्षक – भाग्यलता पाटस्कर

प्रतिक्रिया व्यक्त करा