शिरोलीकर, दगडूबाबा (जन्म : १८८० – मृत्यू : २८ डिसेंबर १९५३) : -महाराष्ट्रातील नामवंत तमासगीर. मूळ नाव दगडू कोंडिबा तांबे-साळी-शिरोलीकर. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील शिरोली नावाच्या गावामध्ये विणकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब साळी कुटुंबात दगडूबाबा शिरोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील भेदिक कवने रचणारे शाहीर होते. लहानपणापासून वडिलांची कवने ऐकल्यामुळे दगडूबाबांच्या मनात शाहिरीकलेविषयी आवड निर्माण झाली आणि तेही भेदिक कवने रचून गाऊ लागले. ‘आपला मुलगा शिकावा’ अशी दगडूबाबांच्या वडिलांची इच्छा होती. पण शिक्षण घेण्यापेक्षा कलावंत बनण्यात अधिक रस असल्याने दगडूबाबांनी जेमतेम दुसऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडून दिली आणि ते घरातून पळून गेले.

दगडूबाबा अठरा वर्षांचे झाल्यावर त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दगडूबाबांनी वडिलांचे शिष्य असलेल्या दौलत नाईक-उदापूरकर ह्यांचे शिष्यत्त्व स्वीकारुन भेदिक शाहिरीचा अभ्यास सुरु केला व फावल्या वेळात ते उदरनिर्वाहासाठी विणकाम करू लागले. दगडूबाबा पारंपरिक शाहिरी शिकत असताना त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये तमाशाकलेला मोठी लोकप्रियता प्राप्त होऊ लागली. त्यामुळे दगडूबाबांनी तमाशा कलावंत बनण्याचे ठरवले आणि ते वेगवेगळ्या तमाशाफडांमधून शाहीर आणि सोंगाड्या म्हणून काम करू लागले. हळूहळू दगडूबाबांच्या लावण्यांतील अध्यात्म व शृंगारिकता ह्यांचा संगम, दगडूबाबांच्या गायनातील तडफ आणि त्यांचा सहजाभिनय रसिक-प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर तरुण तमाशा कलावंत म्हणून दगडूबाबांचा उदय झाला. तमाशा कलावंत म्हणून प्रसिद्धी मिळाल्यावर दगडूबाबा शिरोली सोडून संगमनेरला गेले. तेथे त्यांनी हमीद खान, चंदुशहा फकीर, सावळा निरगुडकर, रंगनाथ जातेगावकर इत्यादी सहकारी कलावंतांच्या मदतीने ‘दगडूबाबा शिरोलीकर तमाशा मंडळ’ ह्या नावाने स्वतःचा तमाशा फड काढला आणि ते संगमनेर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी जाऊन तमाशाचे कार्यक्रम सादर करू लागले. दगडूबाबांनी रचलेली कवने व त्यांच्या सोंगाडकामातील नर्मविनोद ह्यांमुळे शिरोलीकरांचा फड लवकरच महाराष्ट्रातील एक प्रमुख तमाशा फड म्हणून नावारूपास आला.

दगडूबाबांचा फड दूरपर्यंत जाऊन आपली कला सादर करत असे. एकदा दगडूबाबांनी इंदोरमधील एका कार्यक्रमात गरोदर बाईचे सोंग हुबेहूब वठविले होते. तेव्हा इंदोर संस्थानच्या राणीसाहेबांनी दरबारी पोषाखाचा नजराणा देऊन आणि वार्षिक तनखा सुरु करून दगडूबाबांचा गौरव केला होता. बडोदा संस्थानच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनीही दगडूबाबांमधील कला पाहून त्यांच्या डोक्यावर मानाचा मंदिल चढविला होता. देवास संस्थानातूनही दगडूबाबांना वर्षासन मंजूर झाले होते. दगडूबाबांच्या फडांची इतर फडांशी स्पर्धा होत असे. एकदा एका भेदिक सामन्यामध्ये दगडूबाबांनी तत्कालीन प्रमुख शाहीर-तमासगीर असलेल्या पठ्ठे बापूरावांचा पराभव केला होता. त्यानंतर दगडूबाबांना तमाशाच्या क्षेत्रातील विद्वान म्हणून मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. दगडूबाबा नक्कल करण्यात व सोंगे वठविण्यात पटाईत असल्याने सर्वसामान्य लोक त्यांना ‘सोंगाड्यांचा राजा’ म्हणून नावाजत असत. डॉक्टर, वकील इत्यादी सुशिक्षित पांढरपेशे लोकही ‘विनोदसम्राट’ दगडूबाबांची कला पाहण्यासाठी गर्दी करत असत.दगडूबाबांच्या चाळीस रचना आज उपलब्ध आहेत. त्यांच्या रचना पारंपरिक प्रकारच्या असून त्यांच्या निर्मितीमागे मनोरंजन व उपदेश-बोध हीच उद्दिष्टे आढळतात. २८ डिसेंबर १९५३ रोजी वयाच्या ७३व्या वर्षी दगडूबाबा शिरोलीकर ह्यांचे शिरोली ह्या जन्मगावी वृद्धापकाळाने निधन झाले. दगडूबाबांच्या मृत्यूनंतर शिरोलीमध्ये त्यांची समाधी बांधण्यात आली. आजही विविध ठिकाणचे लोक मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात. ज्यांना त्यांच्या हयातीत व मृत्यूनंतरही सर्व स्तरांतील लोकांकडून प्रेम, आदर आणि सन्मान प्राप्त झाला अशा मोजक्या तमासगीरांमध्ये दगडूबाबांची गणना होते.

संदर्भ :

  • कवठेकर ,मोमीन बी. के., कलावंतांच्या आठवणी, मायबोली प्रकाशन, मुंबई, इ. स. १९९९.

प्रतिक्रिया व्यक्त करा