तमाशातील कथानाट्याचा भाग. ‘वग’ हा शब्द ‘ओघ’ या शब्दापासून आला असे सांगितले जाते; पण सातवाहन राजा हाल याच्या गाहा सत्तसईमध्ये १७२ क्रमांकाच्या गाथेत ‘वग्ग’ हा शब्द ‘समूह’, ‘कळप’ या अर्थांनी वापरला आहे. तमाशातील वगाच्या वैशिष्ट्यांशी हा अर्थ सुसंगतच आहे. सांगली, कोल्हापूर भागात मेढरांच्या कळपास ‘बग्गा’ म्हणतात आणि मेंढवाड्यास ‘वगार’, ‘वागरी’ ‘वाडगा’ असे संबोधतात. तमाशा हा ग्रामीण जनांचा विशुद्ध रंजनप्रकार आहे. मेंढपाळ संस्कृतीशी ग्रामीणांचा पूर्वापार निकटचा संबंध असल्याने लोकजीवनात रूढ असणारा ‘वग्ग’ हा शब्द तमाशात आला असावा. त्यामुळे ‘वग्ग’ या शब्दापासून ‘वग’ शब्द रूढ झाला असावा. पारंपरिक तमाशातील वगाला संहिता नसे, मात्र वगातील पात्रांना केवळ वगाची कथा माहीत असे. प्रत्येक पात्र आपल्या मगदूराप्रमाणे संवाद म्हणत असे. तमाशातील ‘सरदार’ (प्रमुख) पात्रांच्या संवादांमध्ये अनुसंधान ठेवून कथेचा धागा अबाधित राखत असे. अशा प्रकारे विमुक्त संवाद, अभिनय, नृत्य-संगीत यांद्वारे वगाचा प्रयोग सिद्ध होत असे. वगाची निर्मिती ही त्यामुळेच समुह निर्मिती होती.वगाची ही सामुहीक निर्मिती आणि वग्ग शब्दाचा अर्थ सुसंगत ठरतो, त्यामुळे वग शब्दाची व्युत्पत्ती वग्ग या शब्दापासून झाली, असे म्हणता येईल.

तमाशाच्या उत्तररंगातील कथानाट्य म्हणजे वग.वगाचे स्वरूप सामान्यतः नाटकासारखे असते. तमाशाच्या शेवटी त्याचे सादरीकरण होते. वगाचा प्रारंभ एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. १८६५ मध्ये उमाजी सावळजकर आणि बाबा मांग यांनी रचेलेला मोहनबटाव हा मराठीतला पहिला वग मानला जातो. पण भेदिक फंडामधून ‘ऐकिव’ नावाचा कथात्मक लावणीचा, समृद्ध नाट्यबीज असणारा प्रकार रूढ असल्याचे दिसते. शाहीर नागेश यांची १८५३ मधील एक लावणी (ऐकिव) उपलब्ध आहे. शिवाय पेशवेकालीन शाहीर परशराम याची ‘पतिव्रतेची लावणी’ सगनभाऊची ‘कस्तुरीचा सुगंध’ ह्या लावण्यांचे स्वरूपही वगाच्या जवळ जाणारे आहे. मोहनाबटाव हा वग दीर्घ लावणीच्या स्वरूपाचा असून भेदिक फडातून ती लावणी सादर होई. भेदिक फड आणि तमाशा यांच्यातील साहचर्यही सर्वज्ञात आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता वगाचा काळ आणखी मागे जाऊ शकतो.

पारंपिक तमाशात ‘खानदेशी’ आणि ‘वानदेशी’ किंवा ‘वायदेशी’ असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारच्या तमाशांतून सादर होणाऱ्या वगांत केवळ प्रायोगिक दृष्ट्या फरक असतो. वगाच्या प्रारंभी एक लावणी म्हटली जाते, त्या लावणीतून वगाचे कथानक थोडक्यात सांगितले जाते. या लावणीस ‘शिलकार’म्हणतात. या शिलाकाराची ठराविक अशी गायकी असते. या गायकीवरून-‘महारी लावणीतून’तून-शिलकाराचा जन्म झाला, असे म्हणता येते. तमाशाचा सरदार ‘शिलकार’टाकतो आणि ‘झीलकारी’ (सुरते) टाकलेल्या शिलकाराचा शेवटचा भाग झेलून घोळवून म्हणतात:

रत्नगड शहर मोठं गुलजार
तिथं भीमसेन राजा राज्य करणार
त्याला मरून चार वर्ष झाली बरोबर
पोटी मुलगा आणि मुलगी सुंदर
शोभं राज्याला ऽऽऽहे ऽऽऽऽहे ऽऽऽ
पुढं घडला काय प्रकार ऐका घडीभार
ध्यान द्या शब्दाला ऽऽऽहे हेऽऽऽ ’

तुकाराम खेडेकर यांच्या गवळ्याची रंमा ह्या वगाचे ‘शिलकार’ वरील स्वरूपाचे आहे. वगाच्या मधेमधे असे शिलकार असतात. त्यामुळे कथेला गती मिळते आणि आधुनिक नाटकातील अंक वा प्रवेश-बदल यांसारखे कामही शिलकारमुळे होते.

वगाचा विषय कोणताही असला, तरी राजा-राणी, सरदार-शिलेदार, कोतवाल-शिपाई अशी पात्रे वगात असतात. राजा नेभळट, प्रधान धूर्त आणि शिपाई चतुर अशी वगातील पात्रांची सामान्यतः ठेवण असते. अशा वगांना ‘रजवाडी वग’ म्हणतात. तमाशातून सुरुवातीला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि लोककथात्मक स्वरूपाचे वग असत. कालांतराने त्यात बदल होऊन सामाजिक आणि राजकीय अशा आशयाचे वग तमाशात आले, हल्ली फडातून पगारी लेखक नेमून त्यांच्याकडून वग लिहून घेतले जातात. पठ्ठे बापूराव (१८६६–१९४५) यांनी मिठ्ठाराणी वग लिहिला, तो खूप गाजला. शिवा–संभा कवलापूरकरांच्या तमाशातील शीघ्रकवी भाऊ फक्कड यांनी विश्वामित्र-मेनका, पतिव्रता सुशीला, राजा हरिश्चंद्र इ. वग रचले. हा पठ्ठे बापूरावांच्या समकालीन होता. याच काळात अर्जुना वाघोलीकरांनी निलावंती, चंपावती, हुजऱ्याचा वग, वालिस्टरचा वग हे वग रचले. दगडू साळी, तांबे-शिरोलीकर यांनी गोरा कुंभार, राजा श्रीयाळ, मनोहर गिरीधर इ. वग रचले. प्रसिद्ध तमासगीर हिरा सातू या दोघांच्या नावावर राजा विक्रम, सुखी कोण?हे वग रचल्याचे दिसते. खानदेशातील राजधरबुवा महानुभाव (पाटोदकर) यांनी शनिविक्रम, गोरकमचींद्र आणि शालीशाबाबा चोरगावकर यांनी संत एकनाथ, भक्त दामाजी, हसरत-बसरत हे वग रचले.

पारंपरिक तमाशात गंभीर व रंजक अशा दोन प्रकारचे वग असतात. गंभीर वग बोध करण्यासाठी अगर एखादे तत्त्व प्रतिपादन करण्याच्या हेतूने निर्माण झालेले असतात. या प्रकारच्या वगातून प्रेक्षकांना भावनिक आनंद आणि कलानंद प्राप्त होतो. वगाची कथा गंभीर असल्याने पात्रांचे परंस्परसंबंध स्वाभाविक आणि वास्तव वाटावेत असे असतात. काही गौण पात्रांच्या साहाय्याने विनोद निर्माण करून तमाशातील विमुक्ततेचे वैशिष्ट्य सांभाळलेले असते. बोध करणे हाच या वगांचा प्रमुख हेतू असतो.

रंजक वगाचा हेतू केवळ रंजक करण्याचा असतो. वगाच्या कथेत घडणाऱ्या घटनांत अतिशयोक्ती, असंभाव्यता, कार्यकारणभावाचा अभाव अशी वैशिष्ट्ये दिसतात. वगाची उभारणी सामान्यतः लोकसंस्कृतीमधील चातुर्यकथेवर केलेली असल्याने कथानक एखाद्या चतुर व्यक्तीभोवती फिरत असते. विनोदाच्या निर्मितीसाठी एखाद्या उपकथेची जोड दिलेली असते, त्यामुळे वगाच्या कथेला विमुक्त स्वरूप प्राप्त होते. पात्रांमधील परस्परसबंध विक्षिप्त असतात. या विक्षिप्त संबंधातून विनोद निर्माण होत असतो. नेहमीच्या तार्किक विचारांची किंवा रूढ अनुभवांची मोडतोड करून अगर नैतिकतेची बंधने उधळून लावून पात्रांचे वर्तन घडत असल्याने, त्यांच्या वर्तनामध्ये विक्षिप्तपणा आढळतो आणि त्यातून विनोद निर्माण होतो. हा विनोद कोटी स्वरूपाचा असतो. त्यामुळे या प्रकारच्या वगाला विमुक्त स्वरूप प्राप्त होते. या प्रकारच्या वगातून केलेला बोध गौण असतो.

पारंपारिक तमाशातील वगाचे विषय १९५० नंतर बदललेले दिसतात. भाऊबंदकी, दोन बायकांचा नवरा, दारूबाजी, इष्क, बाई-बाटली, पाटील-दरोडेखोर इ. विषयांवरील वग आढळतात. रक्तात भिजली कुऱ्हाड, आईचं काळीज, मुंबईची, केळेवाली, गवळ्याची रंभा इ. वगांचा उल्लेख करता येईल. याच काळात हरी वडगावकरांचा गाढवाचं लग्न हा वग लोकप्रिय झाला. तुकाराम खेडकरांनी सहावाडी बारा भानगडी हा वग रचला. दत्तोबा तांबे, बाबूराव पुणेकर, दामाजी कोरेगावकर, कोंडू रामजी पाटील हे नामवंत वगलेखक या काळात झाले. अलीकडच्या काळात रामन राघवन, जोशी–अभ्यंकर हत्याकांड, मानवत खून, गर्दचे दुष्परिणाम, काळा पैसा इ. विषयांवर तसेच ‘इंदिरा जन्माला ये पुन्हा’, ‘कृष्णाकाठचा वाघ’(वसंतदादा पाटील) अशा स्वरूपाचे वग सादर केले जातात. १९५० नंतर सामान्यतः वगांना लिखित स्वरूप प्राप्त झाले आणि वग सेन्सॉर होऊ लागले.

पारंपारिक तमाशातील गंभीर वगाचे बोध करण्याचे सामर्थ्य लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती यांनी वगरचना केलेली दिसते. सत्यशोधकी चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी १९०६-०७ नंतर तमाशाचा वापर भीमराव महामुनी, भाऊराव पाटोळे, लोखंडे, तात्याबा पाटील, कासेगावकर, शंकरराव पाटील-येलूरकर, आबासाहेब साबळे-शिवथरकर इ. मंडळींनी केला. त्यांनी हिंदू धर्मातील सोवळे-ओवळे, देवभक्तांमधील दलाल, अनिष्ट रुढी व परंपरा अशा विषयांवर छोटी छोटी कथानके रचली आणि ती सत्यशोधकी तमाशांतून सादर केली. राष्ट्रसेवादलाच्या तमाशांतून सावकारशाही, खेड्यातील दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा इ. विषयांवर वग रचून लोकांचे प्रबोधन केले गेले. पु. ल. देशपांडे यांचे पुढारी पाहिजे, व्यंकटेश माडगूळकरांचे कुणाचा कुणाला मेळ नाही, वसंत बापटांचे सर्वकल्याण, निळू फुले यांचे येराबाळ्याचे काम नोहेअ शा वगनाट्यांचा उल्लेख करता येईल.

१९२७ च्या महाडच्या सत्याग्रहानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार आपल्या बांधवांना समजावून सांगण्यासाठी ‘संगीत जलसा’वा ‘संगीत कलापथक’ निर्माण झाले. महाडचा रणसंग्राम, काळाराम-मंदीर प्रवेश, ब्राम्हण-अस्पृश्य संवाद, दारू, सट्टा इ. विषयांवर वग रचून, जलशांद्वारा लोकांचे प्रबोधन शाहीर केरू अर्जुन घेगडे, अकोल्याचे केरू बाबा गायकवाड, नासिकचे भीमराव कर्डक या नामवंत तमाशागिरांनी आपल्या तमाशांतून केले. या जलशांना नंतर ‘आंबेडकरी जलसा’, ‘आंबेडकरी तमाशा’ अशी नावे रूढ झालेली दिसतात.

साम्यवादी विचारांचा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी कलापथकांतून वर्गविग्रह, कामगार-भांडवलदार संघर्ष, शेतकऱ्यांची दुःखे इ. विषयांवर वग सादर केलेले दिसून येतात. शाहीर अमर शेख यांनी र्जेराव फरारी, जाऊ तिथं खाऊ हे वग लिहिले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कलापथकाला ‘लोकनाट्य’ अशी संज्ञा दिली. अकलेची गोष्ट, शेटजीचे इलेक्शन, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्याचा दौरा इ. लोकनाट्ये लिहिली. पारंपरिक तमाशातील बतावणीचा कौशल्याने वापर करून अण्णाभाऊ साठे यांनी वगांची रचना केली. शाहीर विश्वासराव फाटे यांनीही सात दिवसाचा राजा वगैरे सात लोकनाट्ये लिहिली आहेत. शाहीर नानिवडेकरांचे फॅशनचा वग, किसरूळचा शेतकरी, वसाडगावचा जमीनदार हे वग लोकप्रिय होते. राम उगावकर, आत्माराम पाटील, शाहीर पुंडलिक फरांदे, शाहीर बापूसाहेब विभुते, शाहीर पांडुरंग वनमाळी, शाहीर खामकर, शेख जैनू चाँद इ. नामवंतांचा या संदर्भात या उल्लेख करता येईल. शाहीर साबळे यांनी नाटकातला बंदिस्तपणा आणि तमाशातील विस्कळितपणा टाळून रामराज्यात एक रात्र, ग्यानबाची मेख, आंधळ दळतंय इ. मुक्तनाट्ये लिहिली. लोकगीते आणि लोककला यांचा कौशल्याने वापर करून उपरोधात्मक शैलीच्या द्वारे शाहीर साबळे यांनी मुक्तनाट्यांतून प्रबोधन केले.

पारंपारिक तमाशातील रंजक वगांमधील वाङ्मयीन आणि तांत्रिक वैशिष्ट्यांचा स्वीकार करून, मराठीतील काही नामवंत लेखकांनी वगनाट्ये लिहिली. तमाशाची लोकप्रियता व तमाशातील रंजनाचे सामर्थ्य ह्याची जाणीव या लेखकांना ते खेड्यातून आल्यामुळे होतीच. वगनाट्याची रचना करताना तमाशातील वगाच्या नाट्यगुणांचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला. वसंत सबनीस यांचे खणखणपुरचा राजा, विच्छा माझी पुरी करा (छपरी पलंग) व्यकटेश माडगूळकरांचे बिनबियाचे झाड, कुणाचा कुणाला मेळ नाही शंकर पाटील यांचे लवंगी मिरची कोल्हापुरची, कथा अकलेच्या कांद्याची, गल्ली ते दिल्ली द.मा. मिरासदार यांचे मी लाडाची मैना तुमची आनंद यादव यांचे रात घुंगराची रा. रं. बोराडे यांचे कस्यात काय फाटक्यात पाय, हसले ग बाई फसले इ. वगनाट्ये लोकप्रिय ठरली. या वगनाट्यांचे कथानक अधिक बांधेसूद असल्याचे दिसते. कथानकामध्ये असंभाव्य वाटाव्यात अशा घटना आढळतात, त्यात कार्यकारणभाव असतोच असे नाही. पात्रांच्या परस्परसंबंधांमध्ये विक्षिप्तपणा आढळतो. लोकांना आवडणाऱ्या शृंगारिक विनोदाला सूचकतेचे बौद्धिक अधिष्ठान या वगनाट्यांतून लाभल्याने त्यांची रोचकता वाढलेली दिसते.

चि. त्र्यं. खानोलकरांच्या शाहीर साबळे यांनी सादर केलेल्या माकडाला चढली भांग या मुक्तनाट्यामधून हेच तमाशातील तंत्र वापरल्याचे दिसते. तसेच चिं.त्र्यं. खानोलकरांनी ब्रेक्टच्या द कॉकेशिअन चॉक सर्कलचा अनुवाद अजब न्याय वर्तुळाचा या नावाने केला. तो वगनाट्याच्या धर्तीचा आहे. लोकनाट्यातील आभास निर्मितीच्या (मेकबिलीव्हच्या) तंत्राचा वापर त्यात दिसतो. व्यंकटेश माडगूळकरांनी रजवाडी वगाच्या धर्तीवर पती गेले ग काठेवाडी हे वगनाट्य रचलेले दिसते. विजय तेंडुलरांची सरी ग सरी,घाशीराम कोतवाल ही नाटके, फुटपायरीचा सम्राट हे मुक्तनाट्य तसेच ‘इंडियन नॅशनल थिएटर’ची दशावतारी राजा, वासुदेव सांगती, खंडोबाचे लगीन ही नाटके, प्रकाश त्रिभुवन यांचे थांबा रामराज्य येतयं हे नाटक आणि दत्ता भगतांच्या एकांकिका यांची मुळे लोककलेत आणि तमाशातील वगांतच शोधावी लागतील.

पहा: तमाशा ,लोकनाट्य.

संदर्भ :

  • जोशी, वि. कृ. लोकनाट्याची परंपरा, पुणे, १९६१.
  • व्हटकर, नामदेव, मराठीचे लोकनाट्य-तमाशा-कला आणि साहित्य, कोल्हापूर, १९७५.

प्रतिक्रिया व्यक्त करा