प्रादेशिकदृष्ट्या जनसामान्यांमध्ये, विकसित झालेले आणि परंपरेने चालत आलेले नृत्य म्हणजे लोकनृत्य. पारंपरिक नृत्य, अपरिष्कृत नृत्य, आत्मभानविरहित नृत्य समूहाने संरचना केलेले नृत्य इत्यादी नावांनी ते संबोधले जाते. पारंपरिक लोकजीवनाचे प्रतिबिंबच ह्या लोकनृत्यांतून उमटलेले दिसते. भारतातील अनेक फिरस्त्या जमाती प्रामुख्याने व्यवसाय म्हणून जे नृत्य करतात, ते लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. ग्रामीण लोक, आदिवासी निरनिराळ्या उत्सवप्रसंगी नृत्य करून जो आनंद अनुभवतात त्याशी लोकनृत्य म्हटले जाते. साधेपणा हे लोकनृत्याचे मुख्य वैशिष्ट्य होय. लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य यांच्यातील फरक विचारात घेता शास्त्रीय नृत्याला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. शास्त्रीय नृत्यातील रचनाकौशल्य, कलात्मकता, सुसूत्रता इत्यादी वैशिष्ट्ये लोकनृत्यांतूनही प्रत्ययास येतात. आदिमनृत्य आणि लोकनृत्य यांमध्येही फरक आहे. आदिमनृत्य हे समूहाचे असते आणि पुरुष आणि स्त्रिया यांमध्ये ते स्वतंत्ररित्या विभागलेले असते. लोकनृत्य मात्र पुरुष आणि स्त्रिया अशा दुकलीतून आविष्कृत होत असते असे विवेचन अनॉल्ड हस्केल यांनी रिचर्ड एम डॉर्सनकृत फोकलोअर अँड फोकलाईफ : अन इन्ट्रुडक्शन (१९७२) या ग्रंथातील ‘लोकनृत्य’ या प्रकरणात केले आहे.
लोकनृत्य हे एकप्रकारे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत असते. लोकनृत्य हे केवळ पुरुष आणि स्त्रिया दोघांचे मिळून असते असे नाही, तर ते नुसते पुरुषांचे अथवा नुसतेच स्त्रियांचेही असते. त्यांतून मिळणारा आनंद, उल्हास हाही सामुदायिक असतो. आदिनृत्य आणि लोकनृत्य यांच्यातली सीमारेषा पुसट असते. आदिनृत्य हे विशिष्ट विश्वाशी संबंधित असते असे काही विद्वानांचे मत आहे. विधीशी संबंधित लोकनृत्याचे विविध आविष्कार आपण पाहतोच. जे विधींशी संबंधित नृत्य असते, त्याचा केवळ लोकनृत्य म्हणून एकल विचार करता येत नाही; कारण विधिप्रधानता हा त्या लोकनृृत्यांचा स्थायीभाव असतो. प्रादेशिक दृष्टया विकसित झालेले आणि परंपरेने चालत आलेले नृत्य म्हणजे लोकनृत्य. लोकनृत्य पारंपरिक असते, पण सर्वच पारंपरिक विधी लोकनृत्य म्हणून संबोधले जात नाहीत. लोकनृत्य समूहनिर्मित असते. व्यावसायिक नसते पण कधी कधी ते व्यावसायिकही होते. याचे कारण ज्यांची वृत्ती विधी-विधानांसह नृत्य करण्याची आहे असे गोंधळी वाघे-मुरळया, जोगतीणी, जोगते हे विधीप्रधान नृत्य करताना आपले अंगभूत कौशल्य त्या विशिष्ट लोकनृत्यात ओतत असतात. त्यामुळे ते नृत्य व्यावसायिक वाटते. कारण त्या कलावंतांची उपजीविका त्या विशिष्ट नृत्यकौशल्यावर अवलंबून असते. उलटपक्षी धनगरी गजी नृत्य, कृषी संस्कृतीतील नृत्य-गीते यांचा उद्देश श्रमपरिहार अथवा श्रम हलके करणे असल्यामुळे त्या नृत्यांमध्ये एक प्रकारचा ओबडधोबडपणा असतो. त्यात व्यावसायिक कौशल्य असेलच असे नाही. लोकनृत्याचे दोन टप्पे आहेत : पहिल्या टप्प्यांत लोकनृत्य ही त्या सर्व समूहाची निर्मिती असते. कालांतराने ती विशिष्ट समूह आणि विशिष्ट व्यक्तींची निर्मिती होते.
समाजाच्या परंपरेतून लोकनृत्ये आविष्कृत होतात. मग ती परंपरा पहिल्या टप्प्यातून आलेली असो अथवा दुसऱ्या टप्प्यातून. नृत्य हे आविष्काराचे अतिशय प्रभावी माध्यम असते, त्याला वेळ आणि काळाची आवश्यकता असते. सामाजिक आणि लोकप्रिय नृत्य वरील व्याख्येनुसार लोकनृत्य या व्याख्येत मोडते. निरक्षर लोकांचे नृत्य हे लोकनृत्य या व्याख्येत मोडत नसल्याच्या सिध्दांताने गोंधळ निर्माण होतो. जगभरातील अनेक निरक्षर लोकांचे समूह त्या त्या समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक धारणेनुसार स्त्री-पुरुष मिळून नृत्य करीत असतात. ते सर्व नृत्यप्रकार लोकनृत्य या संकल्पनेखालीच मोडतात. व्यक्तिसमूहांनी आपल्या आनंदासाठी केलेले नृत्यही लोकनृत्य या शीर्षखालीच समाविष्ट करावे लागेल. लोकनृत्याच्या अस्सलपणाचा विचार करता परंपरा आणि पिढयान् पिढयांकडून होणारे त्या विशिष्ट लोकनृत्याचे निर्वहन या बाबी विचारात घ्याव्या लागतात.
जगभरातील अनेक राष्ट्रांना लोकनृत्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ज्या प्रादेशिकतेतून हि लोकनृत्ये विकसित, प्रचलित झाली तेथील संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, भौगोलिक परिस्थिती, भूस्वरूप, हवामान इत्यादींचा विलक्षण प्रभाव त्या त्या नृत्यशैलीवर दिसतो. अनेक संस्कृतींमध्ये लोकनृत्याचे विविध प्रकार आढळतात. त्यांमध्ये सामाजिक नृत्ये, धर्मविधीयुक्त नृत्ये, प्राणीनृत्ये, शिकरनृत्ये, युद्धनृत्ये, प्रणयाराधनपर युग्मनृत्ये, व्यावसायिक नृत्ये इत्यादी अनेकविध प्रकार आहेत.
इंग्लंमध्ये सेसिल जे शार्प, मौड कार्पेलेस व व्हायोलेट अल्फोर्ड यांनी लोकनृत्याचा अभ्यासास गती दिली. सेसिल शार्प याने मॉरिस नृत्ये, तलवार नृत्ये, ग्रामीण नृत्ये अशा अनेक पारंपरिक लोकनृत्याचा शोध घेऊन त्यांचे संकलन-संपादन व जतन केले. १८९९ मध्ये मॉरिस नृत्य पाहिल्यावर त्याला हे कार्य करण्यास प्रेरणा प्राप्त झाली. १९११ मध्ये त्याने इंग्लिश फोकडान्स सोसायटीची स्थापना केली. पुढे ती ‘फोक सॉंग सोसायटीमध्ये’ विलीन झाली व इंग्लिश फोक डान्स अँड सॉंग सोसायटी या नावाने ती प्रचलित झाली. व्हायोलेट अल्फोर्ड यांनी लोकनृत्यावर लिहिलेला सोअर्ड डान्स अँड ड्रमा (१९६२) हा विख्यात ग्रंथ होय.
जर्मनीचे होरबर्गर, हेगेरीचे मार्टिन आणि पेसोव्हर हे लोकनृत्याचे अभ्यासक होऊन गेले. लोकनृत्यामध्ये नोटेशननिर्मिताचा प्रकार रूडॉल्फ लॅबन यांनी आणला. इंग्लंड आणि अमेरिकेत हा नोटेशननिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला. अमेरिकेतल्या डान्स मॅगेझिनमध्ये अनेक लोकनृत्याची माहिती प्रसिध्द झालेली आहे. गट्रूड पी. कुराय या अमेरिकन विदुषीने लोकनृत्यावर मूलगामी संशोधन केले असून लोकनृत्याचे ६०० प्रकार द डिक्शनरी ऑफ फोकलोअर मायथॉलॉजी अँड लिजंड मध्ये नमूद केले आहेत. अमेरिकेत श्रमपरिहार आणि आनंद व्यक्त करण्यासाठी केलेल्या लोकनृत्यांची संख्या अधिक आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते थेट विद्यापीठ पातळीवरील शारीरीक शिक्षणापर्यंतच्या प्रक्रियेत अमेरिकेत लोकनृत्य हा अभ्यासक्रमाचा भाग असतो.
अमेरिकेतील ‘स्क्वेअर डान्स’ या विख्यात लोकनृत्यप्रकारानुसार हवाई, फिलिपीन्स, जपान, कोरिया, चीन इत्यादी ठिकाणी लोकनृत्ये आयोजित केली जातात. आपल्या पूर्वजांच्या सन्मानार्थ जपानी बुध्दिस्ट बॉन ओडोरी नावाचे नृत्य आयोजित करतात.
भारतात लोकनृत्याची समृध्द परंपरा असून प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे लोकनृत्यप्रकार आहेत. त्यांतून त्या त्या प्रादेशिक संस्कृतींची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित होत असतात. राजस्थानातील चक्रीनृत्य, घूमरनृत्य, कलबेलियानृत्य; उत्तर प्रदेशमधील चारकुला नृत्य, मयुरनृत्य, रासलीला; आसाममधील बिहू नृत्य, त्रिपुरातील होजागिरी नृत्य; महाराष्ट्रातील कोळीनृत्य, लावणीनृत्य, धनगरी गजेढोलनृत्य, तारपानृत्य इत्यादी लोकनृत्यप्रकार हे स्थलकाल-सापेक्ष, रससापेक्ष, संप्रदायसापेक्ष आहेत. या लोकनृत्यप्रकारांची सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. लोकनृत्याच्या अभ्यासाच्या भविष्याबद्दल विवेचन ‘Folklore and Folklife An Intorduction’ या रिचर्ड एम. डॉर्सन यांनी संपादित केलेल्या ग्रंथात केले आहे. लोकनृत्य ही व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहांची प्रथमत: केवळ स्वत:साठीच झालेली निर्मिती असते. ती दर्शकांसाठी किंवा विशिष्ट लोकनृत्यांच्या लोकप्रियतेसाठी झालेली निर्मिती नसते. दुसऱ्या टप्प्यात ती लोकनृत्ये प्रेक्षकांसाठी दर्शनीय होतात. बॅले नृत्य हे दर्शनीय आहे; पण ते लोकनृत्य होऊ शकत नाही. लोकनृत्याचे अनुकरण बॅले नृत्याने केलेले असले, तरी ते परिष्कृत आहे पारंपरिक लोकनृत्य नव्हे. लोकनृत्य या संकल्पनेला समांतर पर्याय असू शकत नाही. बॅले नृत्य हे नावीन्यपूर्ण असते. त्याची संरचना ही भान राखून जाणीवपूर्वक केलेली असते. बॅले नृत्याचे शिक्षण घेऊन प्रख्यात व्यावसायिक कलावंत ते सादर करतात म्हणजे बॅले नृत्य सादरीकरण हा त्या कलावंतांचा व्यवसाय असतो. राष्ट्रीय नृत्याची कल्पना ही लोकनृत्यापेक्षा वेगळी असते. एकूणच लोकनृत्य हे लोकसंस्कृतीचे कृतीरूप संचित असते. हे संचित परंपराधिष्ठित असले तरी ते समकालीनही असते.