पृथ्वीच्या वातावरणात, पृष्ठभागावर आणि भूगर्भात सातत्याने होत असणाऱ्या पाण्याच्या हालचालीला जलचक्र किंवा जलस्थित्यंतर चक्र असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण साधारणतः स्थिर आहे. परंतु हवेमध्ये (तापमान, वारा, पाऊस इ.) होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीवरील आणि पृथ्वीमधील वेगवेगळ्या घटकांमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण सातत्याने बदलत राहते.  (घटक – समुद्र, बर्फ, खारे पाणी, गोड पाणी, वातावरणातील आर्द्रता इ.)

पाणी नदीतून समुद्राकडे बाष्पीभवन, द्रवीभवन, पर्जन्य, जमिनीत मुरणे, पृष्ठभागावरून वाहणे, भूगर्भातून वाहणे इ. क्रियांमुळे रूपांतरित होत असते. हे होत असताना पाणी द्रवरूप, वायुरूप आणि घनरूप अशा अवस्थांमधून जाते.

जलचक्रामुळे ऊर्जेची देवाण-घेवाण होते. त्यामुळे तापमानात बदल होतात. पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा वातावरणातून ऊर्जा घेतली जाते. त्यामुळे वातावरण थंड होते. परंतु जेव्हा द्रवीभवन होते तेव्हा ऊर्जा वातावरणात सोडली जाते. त्यामुळे वातावरण उष्ण (उबदार) होते.  ही ऊर्जा (उष्मा) देवाण-घेवाण हवामानावर परिणाम करते.

जलचक्रातील बाष्पीभवन ही प्रक्रिया पाणी शुद्ध करून त्याचा भूजलावर पुनर्भरणा करते. नद्यांमधून आणि हिमानद्यांमधून वाहणारे पाणी अनेक खनिजांना वाहून नेते. या प्रवाहामुळे होणारी झीज आणि गाळ साठणे या प्रक्रिया पृथ्वीच्या भूगर्भीय आकारात बदल होण्यास कारणीभूत होतात. जलचक्र पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे.

प्रामुख्याने सागराच्या पाण्याचे बाष्पीभवन करणारा सूर्य हा जलचक्राचा प्रमुख भाग किंवा मुख्य घटक किंवा चालक आहे. बर्फ आणि हिम हे थेट बाष्पात रूपांतरित होऊ शकतात. बाष्पस्वेदन (बाष्पोच्छ्वास) म्हणजे वनस्पतींच्या पानांमधून आणि जमिनीमधून होणारी पाण्याची वाफ किंवा पाण्याचे बाष्प होय. बाष्पाचा रेणवीय वस्तूमान कमी असल्यामुळे ते वातावरणात उंच जाऊ शकते. जसजसे बाष्प अधिक उंचीवर जाते तसतसे हवेचा दाब स्वाभाविकच कमी होत जातो आणि परिणामतः तापमान कमी होऊ लागते. तापमान कमी झाल्यामुळे बाष्पाचे द्रवीभवन व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत पाण्याचे सूक्ष्म थेंब वजनाने कमी असतात तोपर्यंत हवेचा ऊर्ध्वभार त्यांना तोलून धरतो. जसजसे ते सूक्ष्म थेंब एकत्रित येऊन त्यांचे मोठे थेंब होऊ लागतात तसतसे त्यांचे आकाशाच्या मोठ्या भागात दिसू लागणाऱ्या मेघांत (ढगांत) रूपांतर होते. अगदी जमिनीलगतच्या भागात हे बाष्प धुके म्हणूनही दिसते. हवेचे प्रवाह (वारा) या पाण्याच्या वाफेचे (बाष्पाचे) पृथ्वीभोवती वहन करतात. मेघांमधील पाण्याचे सूक्ष्म बिंदू आकाराने आणि वजनाने वाढतात, एकमेकांवर आपटतात आणि अनुकूल परिस्थितीनुसार पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी म्हणून पडतात. पर्जन्याचे विविध प्रकार आहेत. पाणी, पाणी आणि गारा यांची मिश्रवृष्टी, केवळ गारा हिम असे प्रकार परिस्थितीनुसार असतात. हिमवृष्टी स्थानानुसार पृथ्वीवर हिमनद्या आणि बर्फाचे कायम आच्छादन या स्वरूपातही राहू शकतात. कायम आच्छादनाच्या स्वरूपात पाण्याची साठवण हजारो वर्षे राहू शकते. पावसाच्या पाण्याचा मोठा भाग भूतलावर, म्हणजेच समुद्र आणि जमिनीवर पडतो.  हे पाणी भूपृष्ठावरून ओहोळ, ओढे, नाले, नद्या यांच्या प्रवाहांद्वारे सागराकडे जाते.  भूपृष्ठावरील जलप्रवाह आणि भूजलातून येणारे पाणी हे भूसंरचनेनुसार तयार झालेल्या सरोवरांमध्येही साठवले जाते. भूपृष्ठावरून वाहणारे सगळेच प्रवाही पाणी नद्यांमध्ये जात नाही. काही पाण्याचा जमिनीत झिरपा होतो. पृष्ठभागावरील पाण्याच्या अस्तित्वाचा (वाहण्याचा) काळ हा जमिनीची सच्छिद्रता, मृदेचा प्रकार, भूजलाचा उतार इ. बाबींवर अवलंबून असून पाणी प्रथम जमिनीलगतच्या मातीत आणि त्यानंतर खोलवर भूगर्भात झिरपते. जमिनीलगतच्या भूजलाचा पुनर्भरणा होतो. काही प्रमाणात हे पाणी जिवंत पाण्याचा झरा म्हणून भूपृष्ठावर येऊ शकते.  खोलवर मुरलेले पाणी खूप काळपर्यंत जमिनीत साठविलेले राहू शकते. नदीखोऱ्यांमध्ये सातत्याने पृष्ठीय जल आणि भूजल यांचे इकडून-तिकडे चलन होत असते. कालांतराने पाणी सागराला मिळते आणि जलचक्रातील त्यांचे स्थान बदलते.

समीक्षक – अशोक पटवर्धन

प्रतिक्रिया व्यक्त करा