रुग्णालयाचा वास्तू आराखडा करणाऱ्या वास्तू शास्त्रज्ञास आधुनिक वैद्यक शास्त्राची अद्ययावत माहिती असावी लागते. रुग्णालय स्थापनेचा हेतू व आवाका सर्वात आधी निश्चित करावा लागतो. सरकारी, निमसरकारी, खासगी इ.अनेक पर्याय तपासावे लागतात. त्या परीसरातील उपलब्ध वैद्यकीय सेवेचे शास्त्रीय पद्धतीने गरज मूल्यमापन करावे लागते. भविष्यातील गरजा लक्षात घेवून, लोकसंख्या शास्त्राचा आधार घेवून ह्या गोष्टी ठरवाव्या लागतात. कुठच्या व किती प्रकारच्या वैद्यकीय सेवासाठी हे रुग्णालय आहे, किती खाटांचे आहे ते ठरवावे लागते. भूखंडाची निवड अनेक बाबींवर अवलंबून असते. मुख्य लोकवस्ती पासूनचे अंतर, संपर्क रस्ता, दृष्यमान्यता, भूखंडाची किंमत, इत्यादी मुद्दयांचा विचार करावा लागतो. रुग्णालय आराखडा तयार करताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे बांधकाम नियम, निरनिराळ्या वैधानिक संस्थांच्या परवानग्या, ना हरकत प्रमाण पत्र व कायदेशीर कागद पत्रांची पूर्तता करावी लागते. त्यांच्या अधिनियमाप्रमाणे आराखडे बनवावे लागतात.

रुग्णालयाचा संकुल आराखडा तयार करताना, संकुलाची प्रवेश द्वारे, वाहनतळ, अंतर्गत वाहतूक योजना, विविध विभागांचे एकमेकातील संपर्क, आराखड्याची लवचिकता, भविष्यातील विस्तार योजनांचा विचार करावा लागतो. भविष्यातील विस्तार आडवा किंवा मजले वाढवून उभा विस्तार करू शकतो. पण चालू असलेल्या रुग्णालयात मजले वाढवणे खूप अवघड असते.

रुग्णालयाचे अनेक विभाग असतात. बाह्य रुग्ण विभाग, अन्तर रुग्ण विभाग, औषध विभाग, पृथक विभाग, चिकित्सा विभाग, रक्तपेढी, शल्य चिकित्सालय, शस्त्रक्रिया विभाग, अति दक्षता विभाग, व्याधीकी विभाग, स्त्रीरोग प्रसूती विभाग, परिवार नियोजन, विकलांग, शल्यांग, नेत्र विभाग, दंत, चर्मरोग, बालरोग, भौतिक चिकित्सा, आहारशास्त्र, अस्थिभंग, कर्करोग, मनोरुग्ण, अपोहन (Dialysis) असे अनेक विभाग असतात. क्षकिरण, अकिरण चिकित्सा विभाग थोडा वेगळा ठेवावा लागतो. क्षयरोग, राजयक्ष्मा, कुष्ठरोग, सांसर्गिक रोग विभाग सुद्धा आराखड्यात योग्य जागी बसवावे लागतात. तसेच वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शवागार, शव विच्छेदन कक्ष, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान, सामाजिक संस्थां, रुग्णालय संचालकांची कार्यालये, लेखापाल, संगणक कक्ष, पतपेढी, तात्काळ पैसे काढण्याची यंत्रे, प्रसाधनगृहे, उपहारगृहे, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय इत्यादी अनेक व्यवस्थांचा विचार असतो.

रुग्णालयाचा वास्तू आराखडा तयार करताना ह्या सर्व विभागांचा एकमेकातील संपर्क सहजसोपा, नियंत्रित, प्रतिबंधित, गोपनीयता, एकांत अश्या विविध प्रकारचा असतो. संकुल व रुग्णालय वास्तू आराखड्याची रचना अशी असावी की विविध विभाग शोधणे सोपे व्हावे. रुग्णालयातील द्वारमंडप, द्वारमंडप छत, प्रवेशद्वारे, ह्यांची रचना विशेष असते. द्वार मंडप स्तंभ रहित असावे म्हणजे रुग्णवाहिका सहज मागे पुढे करू शकेल. रुग्णवाहिकेचा दरवाजा नेहमी वाहनाच्या पाठी उघडतो. म्हणून द्वार मंडप छताची लांबी उचित असावी. मुख्य पायऱ्यांसाठी कठडे असावेत. पायरी बरोबर उतरण रस्ता असावा. उतरण १:१२ प्रमाणात असावी. उतरणीला योग्य कठडा व खरखरीत लाद्या बसवाव्यात. रुग्णालयात प्रवेश करताच चौकशी कक्ष, सूचना कक्ष असतो. अभ्यागतांचे प्रतीक्षालय, बाह्य रुग्ण विभाग प्रवेशद्वाराशी असतो. येथेच एखादे मंदिर किंवा देणगीदाराची तसबीर असते. पाठच्या प्रवेशद्वारा जवळ प्रथमोपचार केंद्र, दुर्घटना कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व बाहेर पडण्याचा मार्ग असतो. रुग्णालायाचा आराखडा असा असावा की तळ मजल्यावर जास्तीत जास्त वर्दळ व कमीत कमी लोक सर्वांत वरच्या मजल्यांना पोहोचतील. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाला निवांत मिळायला हवा. अन्नाची व निर्जंतुक सामानाची वाहतूक मर्यादित व सुरक्षित जागेतूनच करावी. जैव वैद्यकीय व इतर कचरा वाहतूक व विल्हेवाट नियमानुसारच करावी. शवागार व शव विच्छेदन कक्ष नजरेआड ठेवावा.

रुग्णालयातील बांधकाम साहित्य निवडताना खूप काळजी घ्यावी. संपूर्ण इस्पितळात स्वच्छता सर्वांत  महत्त्वाची आहे. जमिनीसाठी सहज स्वच्छ करण्याजोग्या कमीत कमी जोड असणाऱ्या लाद्या बसवाव्या. रुग्णालयाच्या मार्गिकेमध्ये भिंतीना सुद्धा कमीत कमी चार फुटापर्यंत लाद्या बसवलेल्या असाव्यात. त्यामुळे मार्गिका स्वच्छ ठेवण्यास खूप मदत होते. खिडकी, दरवाजे, टांगलेले खोटे छत, सर्व सामान, वस्तू अश्या असाव्यात की त्यात कचरा, धूळ जमा होणार नाही. ह्या सर्वांत कोपरे, जोड, सांधे नसावेत. कारण तेथे सूक्ष्मजीवाणूंची वाढ होते व स्वच्छ करणे जमत नाही.

वैद्यकीय सेवा बरोबर खूप साऱ्या अभियांत्रिकी व तांत्रिक सेवांचे सुद्धा तपशीलात जावून नियोजन करावे लागते. रुग्णालयात विद्युत, वातानुकूलन यंत्रणा, अग्नी सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, संगणक मायाजाल, दूरदर्शन, दूरभाष अश्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. रुग्णालयातील हवेची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. योग्य वायुवीजन असावे. तापमान, आद्रता व्यवस्थापन प्रणाली बसवून घ्यावी. हवेतील धुळीसाठी व सूक्ष्मजीव निस्यंदक करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. अविरत उर्जा व्यवस्थापनेसाठी  विद्युत जनित्र, उर्जा अधिकोष असणे गरजेचे आहे. विविध वैद्यकीय वायूंचा उपयोग रुग्णांसाठी होतो. ह्या वायू नलिका शस्त्रक्रिया विभागात, अतिदक्षता विभागात तसेच सामान्य रुग्ण काळजी विभागातील प्रत्येक खाटे पर्यंत नेणे आवश्यक असते. वायूंच्या टाकी भांडार त्यानुसार ठरवावे लागते. रुग्णालयातील उद्वाहनाचे नियोजन करताना उद्वाहानांची संख्या, आकार, परिमाण, गती, प्रारूप ह्यांचा सखोल विचार करावा लागतो. उद्वाहन परिमाण असे असावे की, फिरत्या रुग्णखाटा सहज नेता येईल. आराखड्यांची सुलभता अधिक वाढवण्यासाठी  योग्य सूचना फलक, चिन्ह, संकेतक पाट्या ह्यांचा वापर केला जातो.

पाणी व त्याचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. पाणी साठ्याची जमिनीखालील टाकी, गच्चीतील पाण्याची टाकी ह्यांची क्षमता स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियम व अग्निशामक दलाचे नियम या नुसार असावी. अपोहन विभाग, प्रयोग शाळेसाठी नेहमीच्या वापरापेक्षा अधिक पाणी लागते. पाणी शुद्धीकरणाची नवीन तंत्रज्ञान यंत्रे बसवावीत. मैला संस्करण संयंत्र बसवणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्याचा पुनर्वापराचा विचार आराखड्यांमध्ये जरूर असावा. अग्नी शोधक गजर, यंत्रे, अग्नी रोधक पाणी फवारे, वायू टाक्या नियमानुसार बसवाव्यात.  प्रत्येक वैद्यकीय सल्लागाराच्या तपासणी खोलीमध्ये  हात धुण्यासाठी नळ व स्वच्छता पात्र द्यावे लागते. चाकाची खुर्ची, फिरत्या रुग्ण खाटा, सहजपणे फिरण्यासाठी रुग्णालयातील दरवाजे, मार्गिका, जिने, उद्वाहने, जोडमार्ग, जोडपूल, स्वछतागृहे  ह्यांची लांबी, रुंदी, उंची परिमाणे भारतीय मानक संहिते प्रमाणे असावीत. संपूर्ण रुग्णालय हे अपंग, दिव्यांग व अक्षम अनुकूल असावे. उतरणी रस्ते, प्रसाधनगृहे व चिन्हे वास्तुशास्त्रीय संकेत निर्देशिकेत दिलेल्या माहितीनुसारच असावेत.

रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अद्ययावत असावी.  रुग्णालयात किमती यंत्रे, किमती औषधे, सामान, पैसे  ह्यांची सुरक्षा  करावी लागते. तसेच आपदा प्रबंधन, गर्दीचे नियंत्रण, अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा असे अनेक विषय असतात. विविध वाहनांची सुरळीत व सुरक्षित वाहतूक, वाहनतळ व्यवस्थापन गरजेचे असते. रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक खूप कठीण मानसिक अवस्थेतून जात असतात. म्हणूनच वास्तू विशारदाने रुग्णालायाचा आकार, उंची, पोत, रंग, प्रकाश योजना ह्याची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते. नैसर्गिक प्रकाश योजना उत्तम पण शक्य नसेल तर कृत्रिम प्रकाश योजना करावी. प्रसंगी सौम्य संगीताचा वापरही खूप सुखद व परिणामकारक होतो. रुग्णालय संकुलात भूदृष्य नियोजन काळजी पूर्वक करावे. अलीकडे बऱ्याच रुग्णालय संकुलात उपचार बगिच्यांची निर्मिती करतात. वृक्षांची लागवड, रंगीत फुले, पाणी इत्यादी अनेक गोष्टी वातावरण शुद्ध व शांत ठेवण्यात मदत करतात.

रुग्णालय संकुल व रुग्णालय इमारतींचा आराखडा तयार करताना वरील असंख्य गोष्टींची सांगड घालून वास्तू शास्त्रज्ञ एक अभिनव व कलात्मक वास्तू तयार करतात.

समीक्षक – श्रीपाद भालेराव

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content