इस्लामी वास्तुकलेतील फरसबंदी, भित्तिपटले, जाळ्या ह्यांमध्ये मुख्यत: भौमितिक आकारांचा वापर असतो. इस्लामी वास्तुकलेमध्ये मनुष्याकृती, पशुपक्षी यांच्या प्रतिमा, किंवा प्रतिकात्मक चिन्हे यांचा अजिबात वापर करत नाहीत. घुमटांवरील कोरीव कामातही या रचना दिसतात.
इस्लामी भौमितिक रचना वर्तुळाची प्रमाणबद्ध विभागणी आणि त्यानुसार वर्तुळावरील संदर्भ बिंदू यांवर आधारित असतात. ह्या रचनांमध्ये बहुभुजाकृती, बहुभुज ताराकृती, पुष्पाकृती ह्या आकारांची सुरेख गुंफण दिसते.
बहुभुज ताराकृती (Polygonal star pattern) -वर्तुळाच्या परीघावर समान अंतरावर ‘m’ बिंदू स्थापन केले आणि प्रत्येक बिंदू पुढच्या ‘n’ क्रमांकाच्या बिंदुला जोडला तर ह्या रेषांच्या रचनेतून (m/n) प्रकारची ताराकृती तयार होते. प्रत्येक ‘म’ बाजू असलेली बहुभुजाकृती ही (m/१) प्रकारची बहुभुज ताराकृती असते.
वर्तुळावर सहा बिंदू स्थापन केले तर (६/२)प्रकारची व वर्तुळावर आठ बिंदू स्थापन केले तर (८/२)व (८/३) प्रकारच्या बहुभुज ताराकृती रचना करता येतात.
पुष्पाकृती (Rosette) – पुष्पाकृती म्हणजे वर्तुळाकृती आकाराचे लाकडावरील किंवा दगडातील दिमाखदार कोरीवकाम. इस्लामी वास्तुकलेमध्ये पुष्पाकृती ह्या बहुभुज ताराकृती व त्यांच्यापासून सुरू होणाऱ्या समांतर रेषांच्या पाकळ्या अश्या स्वरूपात दिसतात.
इस्लामी वास्तुकला ही वर्तुळावर आधारित असल्याने वर्तुळाचे व्यास त्या रचनांचेसमरूपतेचे अक्ष असतात. रचनेच्या मध्यभागी असणाऱ्या बहुभुज ताराकृतींनुसार रचनांना षट्बिंदू, अष्टबिंदू, दशबिंदू, …,रचना म्हणतात व या रचनांमध्ये अनुक्रमे सहा अक्षी, आठ अक्षी, दहा अक्षी,… समरूपता आहे असे म्हटले जाते.
भारतात आग्रा व फतेपुर-सीक्री येथील जाळ्यांमध्ये षट्कोन व षट्बिंदू ताराकृती दिसतात.
भित्तिपटले व फरसबंदीमध्ये आठ किंवा दहा बिंदूंच्या पुष्पाकृतींचा वापर दिसतो.स्पेन मधील अल-हम्ब्रा राजवाड्यात १६ बिंदू ताराकृतींच्या अतिशय सुंदर रचना आढळतात.
लाकडावरील किंवा दगडातील कोरीव कामातील कारागिरांचे कौशल्य अप्रतिम आहेच, पण ह्या कामाचे खरे सौंदर्य भौमितिक रचनांच्या प्रमाणबद्धतेमुळे खुलून दिसते.
भारतात दिल्ली येथील हुमायूनची कबर, आणि सिकंदरा(आग्रा) येथील ‘अकबराची कबर’ ह्या वास्तुसमूहामध्ये फरसबंदी, भित्तिपटले यांमध्ये इस्लामी भौमितिक रचनांची अनेक उदाहरणे दिसतात.
येथील रचनांमध्ये दशबिंदू ताराकृती, पुष्पाकृती, पंचकोन यांचा वापर दिसतो.
इस्लामी भौमितिक रचनेतील पंचकोनाचा वापर-
पंचकोनांचा वापर करून एकसंध फरसबंदी करता येत नाही. पाच पंचकोन वापरले तर मध्ये पंचबिंदू ताराकृती आकाराची रिकामी जागा राहाते.दहा पंचकोन वापरले तर मध्ये मोठा दशकोन शिल्लक राहातो.
यासाठी पंचकोनाचे विभाजन करून ह्या विभागांचा फरसबंदीसाठी उपयोग करावा या दृष्टीने अनेक प्रयत्न झाले.
पेनरोझच्या फरश्या (Penrose tiles) –
पंचबिंदू ताराकृतीमधील ‘सोनेरी प्रमाण’ ( golden proportion) या गुणधर्माचा उपयोग करून रॉजरपेनरोझ याने फरसबंदीच्या अनावर्ती रचनेमागील तत्त्वाचे वर्णन केले.
पेनरोझ फरसबंदी- रॉजरपेनरोझ यांच्या मते पंचबिंदू ताराकृतीमधील त्रिकोण दोन वेगवेगळ्या प्रकारे जोडून फरश्यांचे दोन संच तयार होतात.
- पतंग आणि बाण
- जाड आणि बारीक समभुजाकृती
या जोड्यांना पेनरोझच्या फरश्या (Penrose tiles) असे म्हटले जाते. पंचकोन व दशकोनावर आधारित फरसबंदीमध्ये ‘पेनरोझच्या फरश्यांच्या’ रचना दिसतात.
गिरीह फरश्या–स्फटिकसदृश फरश्या (Girih tiles-Quasi- crystalline tiles)
हार्व्हर्ड विद्यापीठातील जेम्स लू पीटरआणि प्रिन्स्टन विद्यापीठातील पॉल जोसेफ स्टाईन हार्ट या भौतिकशास्त्र विषयाच्या शास्त्रज्ञांनी गिरीह फरश्यांचे ‘स्फटिकसदृश फरश्या’ असे वर्णन केले.
गिरीह फरश्या हा पाच प्रकारच्या फरश्यांचा संच आहे. हे आकार पुढीलप्रमाणे आहेत.
- नियमित दशकोन
- अनियमित बहिर्वक्र षटकोन (कोनांची मापे ७२, १४४,१४४, ७२, १४४, १४४)
- अंतर्वक्र षटकोन (कोनांची मापे- ७२, ७२, २१६, ७२, ७२, २१६)
- समभुज चौकोन (कोनांची मापे – ७२, १०८, ७२, १०८ )
- नियमित पंचकोन (सर्व अंतरकोनांची मापे १०८)
गिरीह या पर्शियन शब्दाचा अर्थ ‘गाठ’ असा होतो. इस्लामी वास्तुकलेमध्ये गिरीह म्हणजे फरश्यांच्या सजावटीसाठी वापरलेली म्हणजे एक प्रकारची नक्षीदार रेषांची गुंफण (strapwork).गिरीहफरश्यांचा उपयोग बाराव्या शतकापासून होत असावा, पण इराणमधील इस्फाहान येथील १४५३ सालातील दर्ब-इ-इमाम दर्गा येथे या प्रकारच्या रचनांचे उदाहरण दिसते. गिरीह फरश्यांच्या संच वापरून त्या काळच्या कारागिरांनी दशकोन व पंचकोनावर आधारित अतिशय गुंतागुंतीच्या रचना केलेल्या दिसतात.
इस्तंबूल येथील ‘तोपकापी’ राजवाड्याच्या संग्रहालयात (Topkapı palace museum) गिरीह रचनांची अनेक रेखाटने सापडतात. भारतात आग्रा येथील इत्-मत्-उदौलाची कबर या इमारतीतीलभिंतीवर,तसेच सिकंदरा येथील अकबराची कबर ह्या इमारत समूहाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर गिरीह प्रकारची संगमरवरी रचना दिसते. (marble inlay work)
इत्-मत्-उदौलाची कबर-भिंतीवरील गिरीह रचना सिकंदरा-प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील गिरीह रचना
संदर्भ :
- https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2095263513000216
- http://physics.princeton.edu/~steinh/LuSteinhardt2007.pdf
- https://www.goldennumber.net/penrose-tiling/
- http://science.sciencemag.org/content/suppl/2007/02/20/315.5815.1106.DC1/Lu.SOM.pdf
समीक्षक – श्रीपाद भालेराव