मेकॉले, झॅकरी : (२ मे १७६८ – १३ मे १८३८).

प्रसिद्ध स्कॉटिश संख्याशास्त्रज्ञ आणि गुला​मगिरीविरोधी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील इन्व्हररी येथे झाला. त्यांचे वडील जॉन मेकॉले हे चर्च ऑफ स्कॉटलंडचे मंत्री होते. आईचे नाव मार्गारेट कॅंपबेल. स्कॉटिश लेखक ओलॉय मेकॉले आणि स्कॉटिश जनरल कॉलिन मेकॉले हे त्यांचे भाऊ. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर झॅकरी मेकॉले यांनी ग्रीक व  लॅटीन भाषांचा अभ्यास केला, तसेच इंग्रजीची अभिजात पुस्तके वाचली.

झॅकरी मेकॉलेवयाच्या सोळाव्या वर्षी मेकॉले जमेकामध्ये स्थलांतरित झाले (१७८४). तेथे त्यांनी एका उसाच्या मळ्यात सहायक व्यवस्थापक म्हणून काम केले. तेथे आठ वर्षांच्या कार्यकाळात ते व्यवस्थापक झाले. येथे त्यांना आपल्या सभोवताली असलेल्या गुलामांवर केला जाणारा अत्याचार दिसून आला व गुलामगिरीविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. अखेर चोविसाव्या वर्षी  त्यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन नोकरी सोडली आणि ते ब्रिटनमध्ये परतले. तेथे त्यांनी गुलामांच्या कल्याणासाठी प्रयत्न सुरू केले.

जमेका येथील अंशत: अनुभवामुळे मेकॉलेंना १७९० साली सिएरा लिओन येथे निमंत्रित करण्यात आले. पश्चिम आफ्रिकन गुलामांची ही वसाहत सिएरा लिओन कंपनीने स्थापन केली होती. बंधमुक्त गुलामांना येथे हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले गेले. मूळचे अमेरिकन असणारे हे गुलाम कॅनडातील नोव्हास्कोशामार्गे सिएरा लिओनपर्यंत आले होते. मेकॉलेंची सिएरा लिओनच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली (१७९४). मेकॉले यांचा ब्रिस्टल येथील सेलीना मिल्स यांच्याशी विवाह झाला (२६ ऑगस्ट १७९९). विवाहानंतर ते क्लॅपहॅम येथे स्थायिक झाले. प्रसिद्ध इतिहासकार आणि निबंधकार टॉमस बॅबिंग्टन मेकॉले हा त्यांचा मुलगा.

मेकॉले यांनी गुलामांच्या व्यापाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ‘सोसायटी फॉर द ॲबॉलिशन ऑफ द स्लेव्ह ट्रेडʼ या संस्थेचे सदस्य व सचिव म्हणून काम पहिले. पुढे ही संस्था आफ्रिकन संस्था म्हणून नावारूपास आली. ख्रिश्चन ऑब्झर्व्हर या मासिकाचे त्यांनी संपादन केले (१८०२-१६). सोसायटी फॉर द ​मिटिगेशन अँड ग्रॅड्युअल ॲबॉलिशन ऑफ स्लेव्हरी (१८२३) या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पुढे ही संस्था अँटी स्लेव्हरी सोसायटी म्हणून नावारूपास आली. त्यांनी गुलामगिरीविरोधी पत्रकार म्हणूनही काम पाहिले. मेकॉले यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुढे १८३३ साली ब्रिटिश राजवटीमधून गुलामगिरीचा व गुलामगिरी पद्धतीचा शेवट झाला. मेकॉले हे एक उत्तम संघटक होते. लंडन विद्यापीठाचे संस्थापक म्हणून त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

लंडन येथे त्यांचे निधन झाले. सेंट जॉर्ज गार्डन्स, ब्लूम्झबरी येथे त्यांचे दफन करण्यात आले.

संदर्भ :

  • Carey, Brycchan, ‘British Abolitionism and the Rhetoric of Sensibility : Writing, Sentiment and Slaveryʼ, 1760–1807, United Kingdom, 2005.
  • Stephen, Leslie, Macaulay, Zachary : Dictionary of National Biography, London, 1893.

समीक्षक – अरुणचंद्र पाठक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content