कोकण म्हणजे महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी. पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला सह्याद्री पर्वत रांगा ह्यांच्यामध्ये असलेला चिंचोळा भूभाग. ह्या भूप्रदेशाची सरासरी लांबी ७०० किमी. व रुंदी ५० किमी. आहे.

हवामान समशीतोष्ण व दमट प्रकारांचे आहे. वर्षात चार महिने सरासरी ३५०० मिली. पाऊस पडतो. हा प्रदेश उंच व सखल अशा स्वरूपाचा आहे. अशा भौगोलिक क्षेत्रासाठी वर्षानुवर्षांच्या अनुभवातून, एक नमुना आराखडा घरांसाठी तयार झाला. कोकणात बहुसंख्य घरे ह्याच आराखड्याप्रमाणे बांधली जातात.

कोकणातील घरांच्या बांधकामासाठी ह्याच परिसरात मुबलक मिळणारा जांभा (चिरा) दगड वापरतात. जांभा दगड लालसर रंगाचा व सच्छिद्र असतो. या दगडामध्ये लोहाचे व ॲल्युमिनियम ह्या धातूंचे प्रमाण खूप असते. दगड सच्छिद्र असल्याने वजनाला हलका, घडवायला सोपा व तापमानरोधक असतो. त्याचा सुंदर नैसर्गिक पोत व गुलाबी लाल रंग असतो. त्यामुळे प्लास्टर न करताच त्याचा वापर करतात. इतर बांधकाम साहित्य म्हणजे तिथेच मिळणारे लाकूड (साग, फणस, असाणे इ.) व मातीची कौले होय. जोरदार पडणाऱ्यापावसासाठी, उताराचे कौलारू घर, पाण्याचा पटकन निचरा करते.

घराचे जोते हे वेगवेगळ्या स्तरात बांधलेले असते. म्हणून पुढचे अंगण, पुढची पडवी, ओटी व माजघर चढत जावे लागते. माजघरापासून मागची पडवी, मागचे अंगण असे जोते उतरते असते. ह्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पावसाचे व नदीचे पाणी चढू लागले, तर कधीही ते सर्वात वरच्या पायरीवर असलेल्या माजघरापर्यंत येत नाही. पावसाळ्यात ओल्या व सुक्या जागेचे नियोजन चांगल्याप्रकारे होते. निसरडे अंगण, ओली पडवी, दमट ओटी व सुके माजघर असे दिसून येते. त्यामुळे बाहेर धुव्वाधार पाऊस पडला, तरी घराच्या केंद्रस्थानी असलेले माजघर कायम कोरडेच राहते. सरपटणारे प्राणी व कीटकसुद्धा माजघरापर्यंत क्वचितच पोहोचतात.

घराचे छप्पर हे उताराचे व कौलारू असते, त्यामुळे पडवीला सर्वात कमी उंची व माजघराला सर्वात जास्त उंची मिळते. माजघरावर माडी बांधून ह्या अतिरिक्त उंचीचा फायदा घेतला आहे. त्यामुळे माजघर वरूनही सुरक्षित होते. घराचे छप्परही चढत जाणारे व जोतेही चढत जाणारे, त्यामुळे कुठल्याही जागेला कमी उंची मिळत नाही.

घराचा आराखडा समकेंद्री स्वरूपाचा असतो. केंद्रात माजघर व चहूबाजूला पसरलेल्या जागा. पडवी व ओटी ह्यांच्यामध्ये भिंत नसते. ह्या दोन्ही जागा फक्त वेगवेगळ्या पातळ्यांवर असतात. त्यांना जोडणाऱ्या पायऱ्या व लाकडी खांब. अशा प्रकारच्या आराखड्यात वेगवेगळ्या खोल्या नसून, एकमेकांना जोडणाऱ्या ओघवत्या जागा तयार होतात. चहुबाजूनी वेढलेले माजघर क्रमाक्रमाने ओटी, पडवी व अंगण असे मोकळे होत जाते. घरातील व बाहेरील जागेची अनुक्रमाने गुंफण होऊन एक छान घराचा आराखडा तयार होतो.

केंद्रवर्ती आराखड्याचा उपयोग तापमान नियंत्रणासाठी होतो. उन्हाळ्यात माजघर सर्वात थंड वाटते तर हिवाळ्यात इतर घरापेक्षा माजघर उबदार वाटते. अशा आराखड्यांचा उपयोग सूर्यप्रकाश नियंत्रणासाठीही होतो. माजघर सर्वात कमी प्रकाश असलेली जागा असते. जसजसे आपण बाहेर पडतो, तसतसे प्रकाशाचे प्रमाण वाढत जाते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ह्या प्रकारच्या प्रकाश संक्रमणाचा खूप उपयोग होतो. स्वयंपाकघरात जिथे उजेड हवा असतो, तिथे एखादे काचेचे कौल छप्परात ठेवले जाते. भरदुपारी काचेच्या कौलातून येणारा कवडसा व त्यात तरंगणारे धुलीकण मनमोहक दिसतात. सूर्यप्रकाश आपल्याला हवा त्याप्रकारे वापरण्याचा मजेदार आविष्कार.पुढच्या व मागच्या पडवीला खिडक्या नसतात तर तिथे रेजे असतात. रेजे म्हणजे उभी लाकडी जाळी. हे रेजे वायुविजनाचे काम उत्तम करतात.

केंद्रवर्ती आराखड्यामुळे घर सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम ठरते. घराच्या मध्यापर्यंत बाहेरची वा अनोळखी व्यक्ती पटकन येऊ शकत नाही. केंद्रवर्ती आराखड्यामुळे आवाजाचे नियंत्रण उत्तम होते. गजबजलेले अंगण, पडवीतील झोपाळ्यावरील गप्पा, ओटीवरील ऊठबस ते खाजगी शांत माजघर अशी व्यवस्था होते. माजघराजवळ असलेल्या देवघराचे पावित्र्यही जपले जाते. अलिपत बाळंतिणीच्या खोलीला लोकांच्या वर्दळीचा व आवाजाचा त्रास होत नाही. स्वच्छता नियोजन व बाहेरील संसर्ग टाळण्यासाठी असा आराखडा उपयुक्त ठरतो.

घराच्या पुढच्या अंगणात, शेतीसंबंधी कामे, व्यावसायिक गाठीभेटी, पाहुणे-रावणे असे कार्यक्रम चाललेले असतात. घराचे मागचे अंगण तुळशी वृंदावन, वाळवण घालणे, मसाले कुटणे, कोकम करणे इत्यादी घरगुती कामांसाठी वापरतात. ह्या आराखड्यामुळे घराला सार्वजनिक व खाजगी आयुष्य ह्यांचा योग्य तोल साधला जातो.

घराचे न्हाणीघर विहिरीच्या जवळ असते. विहिरीवर पाणी उपसण्यासाठी हात रहाट, पाय रहाट किंवा बैलरहाटाची सोय असते. उपसलेले पाणी माडाच्या पन्हळीतून बाहेर पडते. हे पाणी दगडी टाकीत म्हणजे ‘दोणी’ मध्ये साठवले जाते. सुका पालापाचोळा, काटक्या, नारळाची चोड व शेणाच्या गोवऱ्या इत्यादी पर्यावरणपूरक वस्तू वापरून न्हाणीघरात चूल पेटवतात. चुलीवर तांब्याच्या हंड्यात पाणी तापवतात. स्नानाचे सांडपाणी व्यवस्थापन उत्तम रीतीने केलेले असते. हे सांडपाणी व्यवस्थित चर खणून, उतार देऊन आजूबाजूच्या नारळी- पोफळीच्या आळ्यात जायची व्यवस्था असते. स्वयंपाकघरातील ओला कचरा एका ठराविक ठिकाणी साठवला जातो. ह्या कचऱ्यावर केळी व अळू वाढवतात. जेवणानंतर हात धुण्यासाठी ह्या जागेचा उपयोग करतात. आपोआपच केळी व अळूला पाणी मिळते. घराचे शौचालय (संडास) परसदारी म्हणजे मागच्या बाजूला लांब असते.

घरातील सामान खूपच कमी असते. पडवीत लाकडी झोपाळा, जागोजागी भिंतीत कोनाडे, काही ठिकाणी भिंतीतील कपाटे (फड्ताळे), भिंतीत बसवलेल्या लाकडी खुंट्या, देवघरात वरती टांगलेले जाळीदार छत, माडीवर जाणारा चिंचोळा जिना, लाकडी फळ्या वापरून केलेली माडी अशा मोजक्याच गोष्टी आढळतात. हे सगळे सामान अतिशय सुटसुटीत व कमी खर्चात होते. शिवाय देखरेख व डागडुजीही अत्यल्प खर्चात होते.

घर सजवण्यासाठी दरवाज्यात रांगोळी, भाताच्या लोम्ब्यांचे दरवाजाला तोरण, नक्षीकाम केलेले दरवाजे, कधी खिडकीत किंवा झरोक्यात रंगीत काचा बसवलेल्या असतात. भिंतीवर आलेखन व कागदी पताकांची सजावट असते. अंगण व घर शेणाने सारवलेले असते. ते सारवताना छान नक्षीदार केले जाते. तुळशी वृंदावन अंगणाच्या मध्यभागी लक्ष वेधून घेते.

अशा आराखड्यात काही जुजबी बदल आवडीनुसार व आवश्यकतेनुसार केलेले असतात. कोकणातील पारंपरिक घरांचे सरासरी आयुष्य दीडशे ते दोनशे वर्षे असते. ही घरे पर्यावरण अनुकूल असतात. तसेच अशा घरांचे आरेखन हे आधुनिक वास्तूविज्ञानाशी सुद्धा सुसंगत आहे.

समीक्षक – श्रीपाद भालेराव

This Post Has 2 Comments

  1. Khatu

    खूपच सुंदर प्रकारे कोकणातल्या घरांबद्दल सांगण्यासाठी धन्यवाद!

  2. हेमंत Navare

    कोकणातील घराची विस्तृत व सर्वांगीण माहीती.

प्रतिक्रिया व्यक्त करा