मिसेस प्लेस हे दक्षिण आफ्रिकेतील स्टर्कफोंतेन येथे मिळालेल्या एका जीवाश्म प्राण्याचे टोपणनाव आहे. दक्षिण आफ्रिकन जीवाश्मविज्ञ रॉबर्ट ब्रूम (१८६६–१९५१) आणि जॅान टी. रॉबिन्सन (१९२३–२००१) यांना १९४७ मध्ये ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (Australopithecus africanus) या प्रजातीची एक कवटी (एसटीएस-५) मिळाली. रॉबर्ट ब्रूम यांना ती मध्यम वयाच्या मादीची असावी, असे वाटले होते. त्यांनी सुरुवातीला तिच्यासाठी प्लेसिॲन्थ्रोपस ट्रान्सवालेन्सिस (Plesianthropus transvaalensis) अशी प्रजात सुचवली होती. या नावातूनच ‘मिसेस प्लेसʼ हे टोपणनाव तयार झाले. मात्र ही मादी नसून तो एक नर होता, असेही मत मांडण्यात आले होते. तथापि याबाबत निर्णायक पुरावे मिळालेले नाहीत.

स्टर्कफोंतेन येथेच मिळालेले शरीराच्या हाडांचे काही जीवाश्म (एसटीएस-१४) हे मिसेस प्लेसचे असावेत, असे सुचवण्यात आले होते; परंतु हे मत योग्य नसल्याचे आढळून आले आहे. मिसेस प्लेसचे भूवैज्ञानिक वय २५ लाख वर्षे आहे. तिचा जबडा कपींप्रमाणे जास्त पुढे (Prognathic) आलेला आहे आणि तिच्यात कपी व मानव यांच्या लक्षणांचे मिश्रण आहे. मिसेस प्लेसच्या कवटीचे आकारमान ४८५ घन सेंमी. होते.

 

संदर्भ :

  • Broom, R. ; Robinson, J. T. ‘Further Remains of the Sterkfontein Apeman, Plesianthropusʼ, Nature, Vol. 160 : 430-431, 1947.
  • Grine, Frederick,; Weber, G. W.;  Plavcan, Michael & Benazzi, Stefano, ‘Sex at Sterkfontein : ‘Mrs. Ples’ is still an adult femaleʼ, Journal of Human Evolution, 62 (5) : 593-604, 2012.

समीक्षक – शौनक कुलकर्णी