वनस्पती मुळांच्या साहाय्याने पाणी शोषून घेतात आणि सर्व अवयवांना पुरवितात. फुले, फळे निर्माण होत असताना जरुरीप्रमाणे पाण्याचा पुरवठा करतात. त्यासाठी खोड, फांद्या, पाने यात असलेल्या प्रकाष्ठ वाहिनीमार्फत (Xylem vessels) पाण्याची ने-आण केली जाते. वनस्पतींच्या सर्व ऊतींमध्ये व अवयवांमध्ये पाण्याचा काही भाग शोषला जातो. पानांपर्यंत पोहचलेल्या पाण्याचा काही भाग हरितद्रव्याच्या उपस्थितीत, प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीसाठी वापरला जातो. बाकीचे पाणी पानांच्या पृष्ठामधील रंध्रांतून (Stomata) उच्छवसनाद्वारे  हवेत फेकले जाते. हवेत फेकल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण सु. ९५ % पेक्षाही जास्त असू शकते. त्याचमुळे वनस्पतींची पाण्याची तहान मोठी असते. बी रुजल्यापासून धान्याचे उत्पादन होण्यासाठी जरुरी असलेल्या पाण्याचे मापन काही महत्त्वाच्या धान्य प्रकारात केले गेले असून ते तक्ता क्र. १ मध्ये दिले आहे.

तक्ता क्र. १ : विविध पिकांसाठी आवश्यक असणारे पाण्याचे प्रमाण :

अ.क्र पिकाचे नाव         परिपक्वता कालावधी                 (दिवसांमध्ये)

   आवश्यक पाण्याचे    प्रमाण(मिमि.मध्ये)

ज्वारी १०० – १२०    ३०० – ६५०
बाजरी ८५ – ९५    ३०० – ४५०
तांदूळ १०० – ११५    ५०० – ९००
मूग ६० – ७० २५० – ५००
उडीद ७० – ७५ २५० – ५००
भुईमूग ८५ – १३५ ५०० – ७००
गहू १०० – १३५ ४५० – ६५०
ज्वारी १२० – १३५ ३०० – ५००
कापूस १५० – १६० ७०० – १३००
१० हळद २४० – २७० १२०० – १४००
११ तूर १५० – १६० ४०० – ६००
१२ ऊस ३६० – ४५० २००० – २५००
१३ केळी ४५० – ५४० १६०० – २०००

पिकांना लागणाऱ्या पाण्याची – पिकांच्या जलखर्चाची – कल्पना येण्यासाठी तक्ता क्र. २ मध्ये  निरनिराळ्या कृषि उत्पादनासाठी वापरल्या गेलेल्या पाण्याचा आकार (जलखर्च) लिटरमध्ये दिला आहे. याशिवाय, वनस्पतींच्या अवयवातदेखील पाणी साठलेले असते.

तक्ता क्र. २ : निरनिराळ्या कृषि-उत्पादनांचा जलखर्च :

अ.क्र. उत्पादन (किग्रॅ.) जलखर्च (लि.)
तांदूळ २४९७
ज्वारी ५००-६००
कापूस २५० ग्राम २४९५
बटाटा २८७
सफरचंद ८२२
टोमाटो २१४
गहू ३५०-५००
ऊस १४००-२५००
कांदा ७००-८००
१० कोबी २३७
११ केळी ७९०

गव्हाच्या – गवताच्या काडीत ८ ते १० टक्के, तर दाण्यात २ – ३ टक्के पाणी असते. टोमॅटो – कलिंगडाच्या गरात ९५ टक्के, तर आंब्याच्या गरात ६५ टक्के पाणी असते. या प्रमाणात पाणी असले तरच हे अवयव आणि पदार्थ उपयुक्त राहतात, अन्यथा सुकल्याने त्यांची उपयुक्तता संपुष्टात येते. या सर्व गोष्टींचा एकत्र हिशेब केल्यास वनस्पतींची पाण्याची तहान फार मोठी असल्याचे दिसून येते.

संदर्भ :

  • Crops and Water Management, WALMI , Aurangabad, 1989.
  •  Institute of Mechanical Engineers, Guardian News &  Media, Ltd,2016.

                                                                                                                                                                                                                            समीक्षक : चाफेकर, शरद