झाडांच्या मुळांशेजारील असलेल्या मातीच्या भागाला मूलपरिवेश म्हणतात. या भागातील मातीच्या जैव व रासायनिक घटकांवर मुळांचा प्रभाव असतो. बीज अंकुरून जेव्हा रोपटे वाढू लागते, तेव्हा मूलपरिवेशातील सूक्ष्मजीव आणि वाढणारे रोपटे यांच्यात परस्परसंबंध निर्माण होतात. जसजशी मुळे वाढू लागतात, तशी त्यातून स्रवणारी कार्बनीद्रव्ये सूक्ष्मजीवांच्या वाढीला पोषक ठरतात. मुळे आणि त्यांच्या सभोवतालच्या मातीचा काही मिमी.चा सूक्ष्म थर यांचा एक खास प्रभाग तयार होतो, या सर्वांस ‘मूलपरिवेश परिणाम’ असे म्हणतात.
मातीमधील निवासी सूक्ष्मजीवांपैकी ९८ टक्के सूक्ष्मजीवांची पैदास व वाढ प्रयोगशाळेमध्ये करता येत नाही. मूलपरिवेशामध्ये असणारे सूक्ष्मजीव आपसात पाणी, अन्न (खाद्य) आणि जागा यांसाठी स्पर्धा करतात. टिकाव लागण्यासाठी ते झाडाच्या मुळांशी संलग्न होतात. ही संलग्नता व सूक्ष्मजीवांचा अधिवास, झाडे व त्यांच्या परिसरातील स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते. मातीत वाढताना झाडांची मुळे, पाण्यात द्राव्य असणारी काही संयुगे उदा., ॲमिनो आम्ल, शर्करा, जैविक आम्ल इत्यादि मातीमध्ये सोडतात. सूक्ष्मजीव ही संयुगे अन्न म्हणून आपल्या पोषणासाठी वापरतात. झाडांच्या मुळांद्वारे पाझरणारे स्राव अनेक प्रकारच्या सूक्ष्मजीवांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. त्यामुळे इतर मातीपेक्षा मूलपरिवेशामध्ये असणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या व त्यांचे प्रकार यांचे प्रमाण खूप जास्त असते.
स्रावाचे प्रकार व त्याचे संघटन यांवर सूक्ष्मजीवांची क्रिया आणि त्यांची संख्या अवलंबून असते. झाडाची जाती, त्याचे वय आणि ते असलेल्या मातीची प्रत या गोष्टी मूलपरिवेशातील सूक्ष्मजीवांची जडणघडण ठरवितात. मूलपरिवेशामध्ये झाडांची मुळे, माती, पाणी, पोषक द्रव्ये व सूक्ष्मजीव यांमध्ये सतत क्रिया-प्रतिक्रिया घडत असतात. म्हणूनच मूलपरिवेश खूप संवेदनशील असतो. मूलपरिवेशाचा अभ्यास करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
संदर्भ :
- https://www.researchgate.net/…/225113383 Rhizosphere engineering and management Raiijmakers et al. 2001.
- https://www.ncbi.nim.nih.gov/pubmed/12045153- Kent et al. 2002.
- popups.ulg.ac.be/1780-4507/index.php?id=7578-Broeckling et al., 2008.
- agris.fao.org/agris-search/search.do?record1D=US201301655996.
- https://dl.sciencesocieties.org/publications/books/pdfs/advancesinagric/
- www.sciencedirect.com/science/article/pii/S1360138516000030.
- समीक्षक : डॉ.बाळ फोंडके