थेरवादी बौद्ध साहित्यानुसार तिपिटकामधील सुत्तपिटक या भागातील खुद्दकनिकायातील प्रथम ग्रंथ. खुद्दक याचा अर्थ छोटे असा होतो. नऊ छोट्या सुत्तांचा संग्रह असलेला हा ग्रंथ आहे. नुकतीच प्रव्रज्जा घेऊन संघात सामिल झालेल्या प्रव्रज्जितांनी अभ्यास करण्यासाठी या विशिष्ट ग्रंथाची रचना केली गेली आहे. नविन प्रव्रज्जितांनी संघात सामिल झाल्यानंतर भिक्षू जीवनास प्रारंभ करताना काही मुलभूत गोष्टी जाणणे आवश्यक आहे या भावनेतून या ग्रंथातील सुत्तांचे संकलन केले आहे. या ग्रंथामध्ये संकलित केलेली सुत्ते पुढीलप्रमाणेः- १) सरणत्तय २) दससिक्खापद ३) द्वत्तिंसकार ४) सामणेरपञ्ह ५) मङ्गलसुत्त ६) रतनसुत्त ७) तिरोकुड्डसुत्त ८) निधिकण्डसुत्त ९) करणीयमेत्तसुत्त. त्रिशरणांना वंदन, दहा शीलांचे ग्रहण, आपल्या नश्वर कायेतील विविध अशुद्धीने भरलेल्या बत्तीस अवयवांची माहिती, प्राप्त झालेला जन्म व शरीर याचे मूळ व त्यातून मुक्त होण्यासाठी आवश्यक गोष्टींची माहिती, मंगल, योग्य व चांगल्या गोष्टींची माहिती, बुद्ध, धम्म व संघ या त्रिशरणांचे महत्त्व व महात्म्य, संघाला दिलेले दान कशाप्रकारे फलदायी असते याचे वर्णन, कुशल कर्माने पुण्याचे संचित करणे हेच आयुष्याचे सार आहे याबद्दल माहिती व स्वतःच्या रक्षणासाठी तसेच इतरांच्या कल्याणासाठी मैत्री भावना आत्मसात करणे या सर्व आवश्यक व मुलभूत गोष्टी या सुत्तांमधून सांगितल्या आहेत.

सरणत्तय सुत्तामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ हे त्रिरत्न शरणस्थान आहेत असे म्हटले आहे. दससिक्खापद सुत्तामध्ये  दहा शीलांचे (हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य बोलणे, नशापान, अवेळी भोजन, नाच-गाणे, अलंकारित होणे, उच्च व मौल्यवान शय्या आणि सोन्या-चांदीचे ग्रहण यांपासून विरक्त राहणे) वर्णन केले आहे. द्वत्तिंसकार या सुत्तामध्ये शरीरातील बत्तीस अवयवांची यादी दिली आहे. जसे केस, नखे, स्नायू, अस्थि, हृदय, यकृत, फुप्फुस, छोटे व मोठे आतडे, मस्तिष्क इत्यादी. यावरून मानव शरीराचे सखोल ज्ञान असल्याची माहिती मिळते. सामणेरपञ्ह सुत्तामध्ये प्रव्रज्जितांसाठी मूलभूत विषयांची माहिती संख्येनुसार वर्णित केली आहे. जसे आहार एकमेव आहे ज्यावर सर्व प्राणी स्थित आहेत. प्रत्येक प्राण्याला नाम व रूप या दोन गोष्टी असतात. तसेच तीन प्रकारच्या वेदना (जाणीवा) म्हणजे सुख, दुःख व न सुख न दुःख होतात. चार आर्यसत्य आहेत. पाच स्कन्ध आहेत. सहा आयतन (इंद्रियांचे स्थान/ माध्यम) आहेत. सात बोध्यांग आहेत. निर्वाण प्राप्तीसाठी आठ मार्ग म्हणजेचअष्टांगिक मार्ग आहे. नऊ प्रकारचे प्राण्यांचे निवासस्थान आहेत आणि दहा गुणांनी युक्त मनुष्य अर्हत होतो. अशाप्रकारे मूलभूत माहिती संख्येच्या क्रमानुसार दिली आहे.मङ्गलसुत्तामध्ये ३८ प्रकारच्या कल्याणकारी गोष्टींचे जसे की मुर्खांची संगत न करता विद्वानांची संगत करावी, आई-वडिलांची सेवा करावी, पत्नी व मुलांचे योग्यप्रकारे पालन पोषण करावे, पापकर्म व नशापानापासून दूर रहावे असे व इतर मंगल कर्म सांगून शेवटी निर्वाणप्राप्ती हेच सर्वोत्तम मंगल आहे हे सांगितले आहे. रतनसुत्तामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ हीच या संसारातील सर्वोत्तम रत्ने आहेत व यांच्या आचरणानेच लोकांचे कल्याण होईल असे म्हटले आहे.तिरोकुड्डसुत्तामध्ये मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केलेले भोजनदान व पुण्यकर्म त्या मृतांच्या कल्याणासाठी उपयोगी पडते. योग्य अशा भिक्षुसंघाला दिलेले दान त्यांच्या पुण्यसंचयासाठी उपयुक्त असते. निधिकण्ड सुत्तामध्ये दान, शील, संयम व इंद्रियांवर विजय हीच खरी संपत्ती आहे असे सांगितले आहे. पुण्याचा क्षय झाल्याने इतर प्रकारच्या धन व संपत्तीचा विनाश होतो मात्र पुण्याचा संचयाने प्राण्यांना उत्तमोत्तम स्थिती प्राप्त होते व हेच त्याच्यासोबत कायम राहते असे म्हटले आहे. करणीय मेत्तसुत्तामध्ये सर्वांप्रती मैत्रीची भावना ठेवण्यास सांगितले आहे. कोणाशीही वैर करू नये आणि मैत्री ही ब्रह्मविहाराची सतत भावना असावी असे म्हटले आहे.

या ग्रंथामध्ये आलेली सुत्ते त्रिपिटकामध्ये इतर ठिकाणी देखील आढळतात. जसे की मङ्गलसुत्त, रतनसुत्त व मेत्तसुत्त हे सुत्तनिपातामध्ये तर तिरोकुड्डसुत्त हे पेतवत्थुमध्ये आढळते. त्रिशरण (सरणत्तय), दहा शीलाचरणांचे (दससिक्खापद) वर्णन विनयपिटकाच्या आधारे संकलित केले आहे. सामणेरपञ्ह सुत्ताचे संकलन अंगुत्तरनिकायातील विविध सुत्तांचा आधार घेऊन केले आहे. द्वत्तिंसाकार सुत्त हे दीघनिकायातील महासतिपट्ठान व मज्झिमनिकायातील सतिपट्ठान सुत्ताच्या आधारावर संकलित केले आहे.अशाप्रकारे नवप्रव्रज्जित उपासक, उपासिका तसेच भिक्षूंना बौद्ध धम्माच्या आचरणासाठी आवश्यक प्राथमिक गोष्टींची माहिती त्रिपिटकातील विविध ग्रंथातून संकलित करून प्राथमिक स्वरूपातया ग्रंथाद्वारे दिली गेली आहे. थेरवाद (स्थविरवाद) मानणाऱ्या देशांमध्ये विविध प्रसंगी या सुत्तांचे पठन नियमितपणे केले जाते.

संदर्भ :

  • उपाध्याय, भरतसिंह, पाली साहित्याचा इतिहास, हिंदी साहित्य सम्मेलन, प्रयाग, २०१३.
  • द्वारकादासशास्त्री, स्वामी, सुत्तपिटके खुद्दकनिकाये खुद्दकपाठपाळि उदानपाळि इतिवुत्तकपाळि चरियापिचकपाळि, बौद्धभारती, वाराणसी, २००३.

समीक्षक – मैत्रेयी देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content