ॲस्टर हे वर्षभर उपलब्ध होणारे आणि बाजारात वर्षभर मागणी असलेले फुलझाड आहे. ॲस्टरच्या फुलांचे विविध आकार, रंगछटा, टिकाऊपणा आणि आकर्षकता या गुणांमुळे ॲस्टरला सर्व थरातून मागणी असते. ॲस्टर फुलांचा उपयोग कट फ्लॉवर आणि सुट्या फुलांचा असा दुहेरी असल्यामुळे शहरातून ॲस्टरला मोठी मागणी आहे. सजावटीबरोबर सुशोभिकरणासाठी ॲस्टर फुलांचा उपयोग होतो. तसेच फुलदाणी, पुष्पगुच्छ, हार, फुलमाळा यासाठी ॲस्टर फुलांचा वापर महाराष्ट्राबरोबर मराठवाडा आणि विदर्भातही होत आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास हे पीक वर्षभर केव्हाही घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ॲस्टर फुलपिकाची लोकप्रियता वाढली आहे.

हवामान : ॲस्टर पीक कोणत्‍याही हवामानात येत असले, तरी अतिथंड व उष्ण हवामान त्यास मानवत नाही. सतत पडणारा पाऊस पिकाला हानिकारक असतो. थंड हवामानात फुलांना आकर्षक रंगछटा येतात; हा काळ बीजोत्पादनासाठी उत्कृष्ट असतो.

जमीन : ॲस्टर पिकाला पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते. भारी जमिनीत वाढ जोमदार होत असली, तरी फुले कमी लागतात, तर हलक्या वरकस जमिनीत पिकाची वाढ खुंटते व निकृष्ट दर्जाची फुले येतात. तसेच चुनखडीच्या व दलदलीच्या जमिनी या पिकास अयोग्य असतात.

लागवड : ॲस्टर लागवडीसाठी निवडलेली जमीन खोलवर नांगरून, वखरून, भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना जमिनीत हेक्टरी २५ टन शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ६० सेंमी. अंतरावर सरी सोडावी. सरीच्या दोन्ही बाजूस बगलेत ३० सेंमी. अंतरावर लागवड करावी. सपाट वाफ्यावर लागवड करावयाची झाल्यास ३० x ३० सेंमी. अंतरावर रोपांची लागवड करावी. लागवडीचे अंतर हे हंगाम, जात व जमीनीचा प्रकार यावर अवलंबून असते. साधारणत: खरीप हंगामासाठी जून – जुलै, रब्बीसाठी ऑक्टोबर – नोव्हेंबर, तर उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी – मार्च महिन्यात ॲस्टरची लागवड करतात. ॲस्टरच्या बीजोत्पादनासाठी रब्बी हंगाम उत्तम समजला जातो. ॲस्टरची लागवड करताना गादी वाफ्यावर रोपे तयार करतात. बियाणे पेरणीसाठी वाफ्याच्या लांबीला आडव्या ओळी ओढाव्यात. वाफ्यावर १० ते १२ सेंमी. अंतरावर बियाणे पेरावे. बियाणे एक सेंमीपेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणत: बियाणे पेरल्यापासून ३० ते ४० दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

जाती : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ॲस्टरच्या विविध रंगांवरून फुले गणेश व्हाईट, फुले गणेश पिंक, फुले गणेश परपल व फुले गणेश व्हायोलेट या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. तसेच अर्का कामिनी, अर्का ‍ पौर्णिमा, अर्का शशांक व अर्का व्हायोलेट कुशन या जाती भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बंगलोर यांनी विकसित केलेल्या आहेत. याशिवाय ड्वार्फ क्वीन, अमेरिकन ब्युटी, स्टार डस्ट, सुपर प्रिन्सेस या परदेशी जातीही लागवडीत आहेत. बाजारातील मागणी लक्षात घेऊन योग्य जातीची निवड करावी.

खते व पाणी व्यवस्थापन : लागवड करताना माती परिक्षणानुसार हेक्टरी ९० किग्रॅ. नत्र, १०० कि.ग्रॅ. स्फुरद व १०० किग्रॅ. पालाश मातीमध्ये मिसळावे. लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी नत्राचा दुसरा हप्ता ५० किग्रॅ. प्रति हेक्टर या प्रमाणात घ्यावा. जमिनीचा प्रकार व हंगामानुसार पाणी व्यवस्थापन करावे. ॲस्टर पिकाच्या मुळ्या जमिनीत खूप खोल जात नाहीत. त्या जमिनीच्या वरच्या थरात राहतात. त्यामुळे मुळाजवळील माती ओली राहील अशा बेताने पाणी द्यावे. साधारणत: पिकाच्या गरजेनुसार ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. ॲस्टर फुलांचा बहार सुरू झाल्यानंतर मात्र पाण्याचा ताण पडू देऊ नये अन्यथा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

काढणी व उत्पादन : लागवडीपासून साधारणत: अडीच ते तीन महिन्यात फुले काढणीस तयार होतात. ॲस्टरच्या पूर्ण उमललेल्‍या फुलांची काढणी करतात. लांब दांड्यासाठी झाडावरील ५-७ फुले उमलल्यानंतर १० ते २० सेंमी. लांब दांड्यासहीत काढणी करतात. साधारणत: ४-६ दांड्यांची एक जुडी बांधून जुड्या बाजारात पाठवितात. हेक्टरी एक लाख जुड्यांचे उत्पादन मिळते किंवा १०-१२ टन सुट्या फुलांचे उत्पादन मिळते.

पीक संरक्षण : ॲस्टरवर मावा, तुडतुडे, फुले व कळ्या पोखरणाऱ्या अळ्या यांचा प्रादुर्भाव जाणवतो. अशा किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाच्या बाबतीत मर व पानावरील ठिपके हे रोग प्रामुख्याने आढळतात. मर रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीसाठी निचऱ्याची जमीन निवडावी, तसेच बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा  कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

संदर्भ :

  • Bose,T.K.;Yadav,l.P.China Aster,Commercial Flowers,Noya Prokash,Calcutta,1989.
  • Jankiram T.;Patil,M.T.;Bhattacharji,S.K.China aster,AICRP On Floriculture,Technical bulettin No.13,2001.

समीक्षक – भीमराव उल्मेक

प्रतिक्रिया व्यक्त करा