डेलिया हे आकर्षक फुलझाड आहे.फुलांच्या आकारात विविधता आणि अनेक प्रकार असल्यामुळे वेगवेगळे रंग सार्वजनिक बागेचे ,घराच्या परसबागेचे अथवा गच्चीतील बागेचे सौंदर्य वाढविते. त्यांची लागवड पद्धतीही साधी व सुटसुटीत आहे.या फुलांची लागवड शेतात,बागेत व कुंडीत  करता येते. याच्या कंदांत भरपूर प्रमाणात शर्करा, तर बियांमध्ये प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात.

अमेरिका खंडातील मेक्सिको देशात  डेलियाचे मूळ स्थान असून त्यानंतर त्याचा सर्वत्र प्रसार झाला आहे. डेलिया ही वनस्पती – प्रजाती आहे. तिच्या डे.एम्पेरियालिस , डे.पिन्नाटा, डे.कॉकसिलिया  या जाती आहेत. त्यांच्यामध्ये एकमेकांत संकर होऊन ,त्यातून सातत्याने निवड होऊन अनेक संकरित जाती तयार झाले आहेत. डे.पिन्नाटा  या जातीचे २००० च्या वर प्रकार निर्माण करण्यात आले आहेत. स्वीडनमधील वनस्पतिशास्त्रज्ञाचे नाव या फुलास देऊन त्यांचा गौरव  करण्यात आला आहे.

वनस्पती वर्णन : डेलिया या प्रजातीतील पाने संयुक्त असून मूळे फुगीर असतात. या वनस्पतीचे खोड वर्षायू ( एक वर्ष जगणारे ) असते. ते उंच (२-२.५ मी.), सरळ उभे अथवा पट नसलेले भूसर्पी (जमिनीवर पसरणारे) असते. पेऱ्याजवळ ते अपूर्ण पटयुक्त (पडदा असलेले) अथवा पट नसलेले असे दोन प्रकारचे असते. खोडाचा भाग भरीव अगर पोकळ असते. स्तबकाला लांब दांडा व छदमंडळाचे अनेक वेढे असतात. त्याचे शुष्क फळ आयत किंवा अंडाकृती असते. त्यामध्ये बीज एक असते.  फुलांचा रंग लाल,पांढरा ,पिवळा अगर जांभळा असतो. फुलांचा बहार ऑगस्ट ते नोव्हेंबर अखेरपर्यंत असतो.

इंग्लंडमधील राष्ट्रीय डेलिया सोसायटीने या फुलांचे वर्गीकरण १९८३ मध्ये केले ते पुढीलप्रमाणे : (१)   एकेरी फूल (२) ॲनेमोन (३) कोलेरेट (४) पेओनी (५) डेकोरेटिव्ह (६) बात्र (७) पॉम्पॉन (८) कॅक्टस (९) सेमी कॅक्टस (१०) वॉटर लिली .

हवामान : हे पीक दिवस व रात्रीच्या तापमानास संवेदनशील आहे. लागवड व गुणवत्तेसाठी रात्रीचे तापमान १००-१२० तर दिवसाचे १६०.२७० से. असावे लागते. आर्द्रतेचे प्रमाण मध्यम असावे लागते.

जमीन : लागवडीसाठी मध्यम प्रकारची, पाण्याचा निचरा होणारी व भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी असावी. सामू (पीएच मूल्य) ६.५-७.५ हा या दरम्यान असावा.

अभिवृद्धी : डेलियाची अभिवृद्धी ही बी लावून किंवा कंद व छाट कलम लावून केली जाते. ऊती संवर्धन पद्धतीने भरपूर प्रमाणात विषाणूमुक्त रोपे तयार करता येतात.  बेडवर लागवडीसाठी बी पेरून अभिवृद्धी साधली जाते.  बी लागवडीनंतर १०-१२ दिवसात उगवते.  कुंड्यांत छाट कलमे किंवा कंद लावून लागवड केली जाते.

लागवड : सर्वसाधारण सरी वरंबा ही पद्धती लागवडीसाठी वापरतात.  सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत लागवड करतात. लागवडीचे दोन ओळीतील अंतर ४५-६०  सेंमी. तर दोन रोपांत ३० ते ४५ सेंमी. इतके ठेवतात. भारतात बगिच्यांतून डेलिया पिन्नाटा या जातीची लागवड करतात.

खते व पाणी : हंगामान  व  हवामानानुसार गरजेप्रमाणे पाणीपुरवठा करावा.अतिरिक्त पाणी देऊ नये. तसेच पाण्याचा ताणही पडू देऊ नये.शेतात भरपूर प्रमाणात शेणखत टाकावे.  १०-१५ मे. टन  हे. शेणखत ५० : ५० : ५० किग्रॅ. नत्र : स्फुरद : पालाश हे द्यावे. २५ : ५० : ५०  हे लागवडीच्या काळानंतर तसेच २५ किग्रॅ. नत्र हा लागवडीनंतर १ महिन्यांनी द्यावा.

आच्छादन : सेंद्रिय प्रकारचे आच्छादन करावे.यासाठी जुना भुसा वापरावा.उपलब्ध नसल्यास प्लॅस्टिक आच्छादन करावे.

शेंडा खुडणे : झाडांची अवास्तव उभी वाढ रोखण्यासाठी व झाडांच्या शाखेच्या संख्येत वाढ होण्यासाठी झाडांचे शेंडे खुडावेत.पानांच्या ३ जोडीनंतर किंवा चौथ्या पेऱ्यानंतर शेंडा खुडावा.

संजीवकाचा वापर : झाडांची अवास्तव व उभी वाढ रोखण्यासाठी संजीवकांचा (वाढरोधक) वापर करतात. ४००० पीपीएमचे सीसीसी या संजीवकाची फवारणी केली जाते.

रोग व कीड : डेलिया या फुलझाडावर मावा व तुडतुडे या दोन्ही रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो.तसेच भुरी व करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोग व किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सर्वसाधारण स्वच्छता, रोजचे निरीक्षण तसेच वेळेवर फवारणी या बाबी महत्त्वाच्या ठरतात.कीड नियंत्रणासाठी जैविक किडनीशकाची (उदा., निंबोळी अर्क, मेटॉरायझीम किंवा आंतरप्रवाही किडनाशके याची) फवारणी करावी. रोगनिवारण्यासाठी स्पर्शजन्य किंवा आंतरप्रवाही बुरशी नाशकांची फवारणी करावी.

संदर्भ :

  • Indian Horticulture magazine,2000.

समीक्षक – भीमराव उल्मेक

प्रतिक्रिया व्यक्त करा