जवस हे एक गळिताचे धान्य असून रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. मराठीत याला अळशी; हिंदीत अलसी;संस्कृतमध्ये अतसी, अतसिका,हैमवती, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात.भारतामध्ये मध्य प्रदेश राज्यात जास्त क्षेत्र व उत्पन्न असून त्यापाठोपाठ अनुक्रमे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक व पश्चिम बंगालचे क्षेत्र आहे. देशाच्या एकूण जवस उत्पादनापैकी सु. ७० टक्के वाटा हा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशचा आहे. जवसामध्ये तेलाचे प्रमाण ३३ – ४७ टक्के असते.
जवस हे पीक जिरायत व बागायतीस योग्य आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी वेळेवर लागवड, सुधारित वाणाचा वापर आणि किडी व रोगापासून संरक्षण या बाबींकडे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक असते. जवस तेलामध्ये ५८ टक्के ओमेगा – ३ मेदाम्ल आणि अँटिऑक्सिडंट हे घटक असतात. हे दोन्ही घटक हृदयरोगाला कारणीभूत असलेले विकार व रक्तदाब, तसेच कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराईड यांचे प्रमाण कमी करतात. जवसाचा दैनंदिन आहारात उपयोग केल्यास संधिवात सुसह्य होतो, मधुमेह आटोक्यात येतो, कर्करोग व इतर रोगांविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते.
हवामान : जवस या पिकासाठी थंड व कोरडे हवामान योग्य असते.
जमीन : मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत जवसाचे पीक चांगले येते.
पूर्वमशागत : जवस पीक पेरण्यापूर्वी जमिनीची नांगरट करावी. हेक्टरी १० गाड्या शेणखत टाकून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते.
पेरणी : जवसाची पेरणी योग्यवेळी म्हणजे कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात, तर बागायती पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. ४५ x १० सेंमी. किंवा ३० x ३५ सेंमी. अंतरावर अनुक्रमे ४५ सेंमी. किंवा ३० सेंमी. अंतराच्या पाभारीने पेरणी करावी. ८-१० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया : १ ग्रॅ. बाविस्टिन + २ ग्रॅ. थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर व अल्टरनेरिया ब्लाईट या रोगांचा प्रार्दुभाव कमी होतो.
सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये :
अ.नं. | वाणाचे नाव | कालावधी (दिवस) | तेलाचे प्रमाण (%) | हेक्टरी उत्पन्न (कि.ग्रॅ.) |
१ | एनएल-९७ | ११५-१२० | ४४ | ६००-१२०० |
२ | एनएल-१४२ | ११८-१२३ | ४२ | १५१० (पाण्याची सोय असल्यास) |
३ | एनएल-१६५ | ११६-१२१ | ४१ | १६००-२३०० (पाण्याची सोय असल्यास) |
४ | एनएल-२६० | ११०-११५ | ४३ | ११००-१८०० |
आंतर पीक : या पिकात जवस व हरभरा (४ : २), जवस व करडई (४ : २), जवस व मोहरी (५ : १) या प्रमाणात घेता येते. प्रयोगाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, जवस व हरभरा (४ : २) या प्रमाणात घेतल्यास ही आंतर पीक पद्धती आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते.
रासायनिक खते : कोरडवाहू लागवडीस नत्र २५ किग्रॅ. व स्फुरद २५ किग्रॅ. हेक्टरी (म्हणजेच १२५ किग्रॅ. २०:२० मिश्रखत) पेरणीच्या वेळेस द्यावे, तसेच बागायती लागवडीसाठी नत्र ६० किग्रॅ. + स्फुरद ३० किग्रॅ. हेक्टरी द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र (३० किग्रॅ.) + संपूर्ण स्फुरद (३० किग्रॅ. म्हणजेच १५० किग्रॅ. २०:२० मिश्रखत ) पेरणीच्या वेळेस द्यावे आणि राहिलेली अर्धी नत्राची मात्रा (३० किग्रॅ. नत्र म्हणजेच ६५ किग्रॅ. यूरिया) ४०-४५ दिवसांनी पहिल्या ओलीतासोबत द्यावी. तसेच या पिकास ५ किग्रॅ. पी.एस.बी. व ५ किग्रॅ. झिंक सल्फेट पेरणीच्या वेळेस द्यावे.
पाणी व्यवस्थापन : या पिकास दोन पाण्याची आवश्यकता आहे. पहिले पाणी ४०-४५ दिवसांनी पीक फुलोऱ्यावर असताना व दुसरे ओलीत ६५-७० दिवसांनी बोंड्या धरण्याच्या वेळेस द्यावे.
किडी : या पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १५ मिलि. १० लि. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ ई.सी. ६०० लि. किंवा फॉस्फोमिडॉन ८५ ई. एल. २५० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रोग : या पिकावर करपा, भुरी व मर हे रोग आढळून येतात. करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम ३ ग्रॅ. प्रति किलो बियाणे याची प्रक्रिया करावी. तसेच ०.२५ टक्के मॅन्कोझेबची फवारणी करावी (२५ मिलि. + १० लि.पाणी). भुरी रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. त्याच्या नियंत्रणाकरीता पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी २५ ग्रॅ. किंवा कॅराथोन १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी १ ग्रॅ. बाविस्टीन व २ ग्रॅ. थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
पीक काढणी : पिकाची पाने व बोंड्या पिवळ्या पडल्यावर पीक काढणीस योग्य समजावे. या पिकाची कापणी विळ्याच्या साहाय्याने करावी. कापणी झाल्यानंतर ४-५ दिवस वाळवून मळणी करावी व बी योग्यप्रकारे साठवून ठेवावे.
उत्पादन : जवसाची लागवड व व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास सरासरी ५-७ क्विंटल/हेक्टर उत्पन्न मिळू शकते.
संदर्भ :
- Roy,Mangala Handbook Of Agriculture,2006.
- Prasad,Rajendra Textbook Of Field Crop Production,2004.
समीक्षक – भीमराव उल्मेक