कंपॉझिटी कुलातील फुलांच्या एका जातिसमूहाला डेझी म्हणतात. दिवस उजाडतो तेव्हा फुले उमलतात. डेझी हा शब्द डेज आय या शब्दांचा अपभ्रंश होऊन तयार झाला आहे. विविध आकार आणि रंगानुसार मायकचलमस डेझी, पेंटेड डेझी, आफ्रिकन डेझी, स्पॅन सिल्व्हर डेझी, सॉलिडॅगो किंवा गोल्डनरॉड असे डेझीचे विविध प्रकार आहेत. हे फुलझाडे काटक व चिवट असून कीड व रोगांना कमी बळी पडणारा आणि कोणत्याही हवामानात येणारा पुष्पसमूह आहे.
गोल्डनरॉड (सॉलिडॅगो) ही मराठीत सोनतुरा या नावाने ओळखली जाते. या फुलझाडाची उंची ९० ते १०० सेंमी. सेंमी. असते. फुलांचा दांडा लांब आणि सरळ ६० ते ८० सेंमी. असतो. फुलांचा रंग पिवळा असून ती संयुक्त प्रकारची असतात. पिवळी डेझी पाणथळ जमिनीतदेखील चांगल्या प्रकारे येऊ शकते. हिची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे फायदेशीर असते.
हवामान : पिवळी डेझीच्या पिकासाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि दमट हवामान चांगले मानवते. थंडीच्या दिवसात फुलांना कमी बहर येतो. सर्वसाधारणपणे भारतातील हवामानात जवळजवळ वर्षभर फुले येत असल्याने पिवळी डेझीची लागवड कधीही करता येते.
जमीन : पिवळी डेझीची लागवड कोणत्याही प्रकारच्या म्हणजे हलक्या, मध्यम तसेच पाणथळ जमिनीतही चांगल्या प्रकारे करता येते. परंतु व्यापारी दृष्टया लागवड करायची झाल्यास मध्यम प्रतीची, सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडतात.
पूर्व मशागत : पिवळी झेझीच्या मोठ्या प्रमाणावरील लागवडीसाठी जमिनीची खोल उभी-आडवी नांगरट करतात. कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडतात. धसकटाची वेचणी करतात. जमीन तयार करताना हेक्टरी १५ – २० टन कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळतात. त्यानंतर लागवडीसाठी ३ मीटर लांब आणि २ मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करतात किंवा सरी वरंब्यावरदेखील लागवड केली जाते.
अभिवृद्धी : जुन्या डेझीच्या बाजूस फुटलेले फुटवे वापरून पिवळी झेझीची अभिवृद्धी करतात.
लागवड : पिवळ्या डेझीची लागवड ५० सेंमी X ५० सेंमी किंवा ३० सेंमी X ३० सेंमी अंतरावर करतात किंवा सरी बरंब्यावर लागवड करताना दोन सरीतील अंतर ४५ – ५० सेंमी ठेवून दोन रोपातील अंतर ३० सेंमी ठेवून सरीच्या दोन्ही बाजूंना लागवड करतात.
खतांचा वापर : झाडाच्या जोमदार वाढीसाठी फुलांचे जास्त ताटवे मिळविण्यासाठी दरवर्षी हेक्टरी ८० – १०० किग्रॅ. नत्र व ८०-१०० किग्रॅ. स्फुरद. पालाशची मात्रा लागवडीच्या वेळी देतात आणि उरलेले नत्र दोन समान हिश्यात विभागून लागवडीनंतर चार महिन्याचे अंतराने देतात.
लागवडीनंतर आठ-दहा दिवसांनी ५ किग्रॅ. ॲझेटोबॅक्टर किंवा ॲझोस्पोरियम ५० किग्रॅ. ओलसर शेणखतात मिसळतात. या मिश्रणाचा ढीग करून तो ढीग प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवतात. अशाच प्रकारे स्फुरद विरघळणारे जीवाणू खत आणि ट्रायकोडर्मा प्रत्येकी ५-५ किग्रॅ., ५०-५० किग्रॅ. ओलसर शेणखतामध्ये वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवतात. आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्टर क्षेत्रात पिवळी डेझीच्या पिकाला देतात.
पाणीपुरवठा व आंतर मशागत : लागवडीनंतर आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून टाकतात. पावसाळ्यात गरजेनुसार पाणी देतात. हिवाळ्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने, तर उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी देतात. दर चार महिन्यांनी जमिनीची खांदणी करून घेतात आणि नंतर खतांची मात्रा देतात.
ठिबक सिंचन : पाण्याची जास्तीत जास्त बचत आणि परिणामकारक वापर करण्यासाठी ठिबक सिंचन वापरणे योग्य असते. पाणी आणि खते एकाच वेळी देण्यासाठी ठिबकचा वापर करता येतो. पिकांच्या सुरुवातीच्या काळात सूक्ष्म फवारे आणि त्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास अधिक उत्पादन घेता येते. पिकास ठिबक सिंचनाद्वारे दररोज किती पाणी द्यावे हे पुढील सूत्रावरून ठरविता येते.
ठिबक सिचंन चालविण्याचा कालावधी तास = दररोजची पाण्याची गरज (लि.) x २ तोटीचा प्रवाह प्रति तास (लि.)
रोग : भुरी : या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करतात.
पानावरील ठिपके : या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम प्रति लिटर किंवा हेक्साकोनाझोल १ मिलि. प्रति लिटर किंवा मॅकोझेब २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करतात.
मूळकूज : कार्बन्डेंझीमचे द्रावण १ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात मातीमध्ये फवारतात.
फुलांची काढणी व उत्पादन : लागवडीनंतर ५० – ६० दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. पिकाचे आयुष्य २ वर्षे असून वर्षभर फुले येत राहतात. डेझीची फुले दांड्यासह काढावीत. दांड्यावरील २५% खालच्या भागातील फुले उमलायला लागली की, असे तुरे दांड्यांसहित तोडतात. दांडा जमिनीपासून खोडावर ३-४ डोळे ठेवून कापून घ्यावा.विक्रीसाठी ६, १० किंवा १२ दांडे एकत्र करून त्यांच्या जुड्या बांधतात. पिवळी डेझीच्या लागवडीतून १ हेक्टर क्षेत्रातून दर वर्षी २.५ – ३ लाख दांडे मिळतात. या जातीच्या फुलांना वर्षभर चांगला भाव मिळून चांगले उत्पन्न घेता येते.
प्रतवारी आणि पॅकिंग : कापणी केलेल्या पिवळी डेझीचे दांडे लांबीनुसार ६, १० किंवा १२ दांड्यांच्या जुडीच्या स्वरूपात अलग बांधतात. दांड्यांच्या लांबीनुसार प्रतवारी करतात. दांड्यांच्या टोकाला रबरबँड लावून खोक्यातून किंवा बांबूच्या उभ्या टोपलीतून विक्रीसाठी बाजारात पाठवतात.
उत्पादन : पिवळी डेझीच्या फुलांना देशात तसेच यूरोपीय बाजारपेठेत चांगली मागणी असते. कमी भांडवली गुंतवणूक, बाजारपेठेची हमी, विविध हंगामात विविध ठिकाणी करता येणारी लागवड आणि रोग व किडीचा विशेष प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यामुळे पिवळी डेझीची लागवड करणे शेतक-यांना किफायतशीर ठरते.
संदर्भ :
- बळीराजा,नोव्हेंबर,२००३.
समीक्षक – भीमराव उल्मेक