मोगरा ही सुवासिक फुलांची एक वनस्पती आहे. ही प्रजाती ओलिएसी कुलातील आहे.या प्रजातीत जाई (चमेली),जूई,मोगरा इत्यादी सुमारे २०० विविध सुवासिक फुलांचा समावेश होतो. ही बहुवर्षीय व सदाहरित वनस्पती असून यांपैकी काही वेलीसारख्या पसरणाऱ्या, काही झुडपांसारख्या वाढणाऱ्या,काही उष्ण व दमट हवामानात, तर काही  समशीतोष्ण कटिबंधात चांगल्या प्रकारे वाढतात. भारतात मुख्यत्वे करून या प्रकारच्या फुलांचा उपयोग वेण्या, गजरा व हार यांसाठी केला जातो.  तसेच परदेशात विशेषतः फ्रान्समध्ये त्यांचा उपयोग सुगंधी द्रव्ये मिळविण्यासाठी होतो.

भारतात मोगरा, जाई, जुई यांची लागवड व्यापारी तत्त्वावर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांत केली जाते.या फुलांना मुंबइ, चेन्नई, बंगळुरू, नागपूर, हैद्राबाद, पुणे इ. मोठ्या शहरांत मोठी मागणी असते. महाराष्ट्रात या फुलांची शेती करणे, सोपे, सुटसुटीत व कमी खर्चाचे आहे. या फुलांना बाजारपेठेत वर्षभर सतत मागणी असते आणि चांगले बाजारभाव मिळतात.

मोगरा (जॅस्मिनम सॅम्बॅक) : सर्वसाधारणपणे मोगरा ही वनस्पती झुडपाप्रमाणे वाढणारी असून उंची ९० – ११० सेंमी असते. फुले मोठी, पांढऱ्या शुभ्र रंगाची, एकेरी पाकळ्यांची अथवा दुहेरी पाकळ्यांची असून अत्यंत मधुर सुवासाची असतात. वर्षभरात उन्हाळी व पावसाळी असे फुलांचे दोन हंगाम असतात. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यांत फुलांचा मुख्य हंगाम असतो. मोगरा हे सर्वसाधारण नाव असले तरी यामध्ये सिंगल, डबल, गुंडुमलई, मोतीया, बटमोगरा, वसई, मदनबाण इ. जाती असून कमी अधिक फरकाने या सर्वाची फुले एकसारखी असतात.या फुलांतील बाष्पनशील तेलाचा उपयोग अत्तर, साबण, उदबत्ती इत्यादींमध्ये करण्यात येतो. मोगरा हे हवाई, इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांचे राष्ट्रीय फूल आहे.

जाई (जॅस्मिनम ग्रॅंडिफ्लोरम) : बंगालमध्ये चमेली अथवा जत्ती या नावाने प्रसिद्ध असून वेलीप्रमाणे वाढते. गर्द हिरव्या रंगांचा ५-७ पानांचा समूह एका देठावर असतो. कळ्यांवर लालसर छटा असून फुले पांढऱ्या रंगाची, चांदणीच्या आकाराची व मोठ्या आकाराच्या पाच पाकळ्यांची असून खालची बाजू जांभळी असते. ही सुंगधी द्रव्ये काढण्यासाठी उत्तम समजली जाते. त्यांपासून महागडी अत्तरे  तयार करतात. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात तिची लागवड केलेली आढळते. जाई हा पांढऱ्या जाईचा (जॅस्मिनम ऑफिसिनेल) मूळ प्रकार आहे.

जुई (जॅस्मिनम ऑरिक्युलेटम्) : ही सदाहरित वेलीसारखी वाढणारी वनस्पती असून, मुख्य खोडाभोवती अनेक फुटवे येत राहतात. एका देठावर तीन-तीन पानांचा समूह असतो. फुले पांढरी व लहान असून झुपक्यात येतात. उन्हाळी व पावसाळी हंगामात फुलांचा बहार असतो. फुले पांढरी असून वेणी, गजरा व सुगंधी द्रव्ये करण्यासाठी उपयुक्त असतात.

यांशिवाय पिवळी जाई (जॅस्मिनम ह्युमाईल ) ही मधुर सुवासाची, पिवळ्या रंगाची व नलिकाकार फुले साधारण हिवाळ्यात झुपक्यात येणारी असून सुवर्ण चमेली किंवा हेमपुष्पी या नावाने किंवा परदेशात इटालियन जास्मिन म्हणून संबोधली जाते. तर काकडा (जास्मिनम अरबोरेसन्स) हे झुडुपासारखे वाढणारे असून फुले हिवाळ्यात झुपक्यात येतात. तसेच कुंद (जॅस्मिनम प्युबेसेन्स) यामध्ये कळी अवस्थेत फुले लालसर जांभळट रंगाची असून पूर्ण उमललेल्या फुलाच्या पाकळ्यावरून पांढऱ्या रंगाच्या व पाकळीच्या खालील भाग गुलाबी रंगाचा आढळतो. फुले झुपक्यात असतात. यांसारखे बरेच प्रकार या गटामध्ये आहेत.

हवामान : सर्वसाधारण या सर्व प्रकारच्या वेली व झुडपे अत्यंत काटक आहेत. उष्ण व समशीतोष्ण हवामानात यांची वाढ चांगली होते. उष्ण व कोरडे हवामान, स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश, मध्यम स्वरूपाचा पाऊस या पिकास चांगला मानवतो. दिवसाचे किमान तापमान २५ – ३४ अंश से. आणि रात्रीचे १६ – २५ अंश से. तसेच ५५ – ६५ टक्के सापेक्ष आर्द्रता असावी. कडाक्याची थंडी, धुके व दव यांचा झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. मध्यम हिवाळा आणि सौम्य उन्हाळ्यात फुलांमधील सुगंधी द्रव्याचे प्रमाण वाढून अधिक उत्पादन मिळते.

जमीन : हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी ६० सेंमी. खोलीची आणि सामू ६.५ – ७.० असणारी जमीन निवडतात.

अभिवृद्धी : जास्मिनच्या सर्व प्रकारांची अभिवृद्धी ही छाट कलमांद्वारे केली जाते. चांगल्या पक्व ४ – ५ डोळे असलेल्या १८ -२० सेंमी लांबीच्या काड्या निवडून त्यांच्या बुडख्याकडील टोक केरॅडिकस  पावडरमध्ये बुडवून लावल्यास मुळ्या लवकर फुटण्यास मदत होते किंवा आय.बी.ए. (५०० पी.पी.एम.) तीव्रतेच्या द्रावणात कलमासाठी निवडलेल्या काड्यांचे बुडखे ५ – १० सेकंद बुडवून नंतर खत मातीने भरलेल्या पॉलिथीन पिशव्यात लावतात. दोन ते अडीच महिन्यात काड्यांना मुळे फुटून कलमे लागवडीस तयार होतात.

पूर्वमशागत : ही फुलपिके बहुवर्षीय असल्याने एकदा लागवड केल्यानंतर ८ – १० वर्षे त्याच ठिकाणी राहतात. याकरिता निवड केलेली जमीन २-३ वेळा उभी-आडवी नांगरून नंतर २-३ वेळा कुळवून एकसारखी करतात. आवश्यकतेनुसार तणनाशकाचा वापर करून लव्हाळा-हराळी यासारख्या तणांचे नियंत्रण करतात. फुलपिकाचा प्रकार व जमिनीच्या गुणधर्मानुसार शिफारस केलेल्या अंतरावर ठरावीक आकाराचे खड्डे घेतात. खड्डे भरण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात अर्धा ते एक किग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश तसेच २.० टक्के मिथिल पॅराथिऑन किंवा लिन्डेन पावडर व थिमेट टाकतात. जून महिन्यापूर्वी असे खड्डे लागवडीस तयार ठेवतात.

लागवड : मोगऱ्यासाठी हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत १.२०X१.२० मीटरवर ६०X६० सेंमी आकाराचे खड्डे लागवडीस तयार ठेवतात. कमी अंतरावर लागवड केल्यास रोग किडींचा प्रादुर्भाव वाढून फुलांची प्रत बिघडते. मोगऱ्याच्या गुंडुमलई जातीसाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. जाई व जुई पिकांसाठी भारी जमिनीत २.५X२.५ मीटरवर, मध्यम जमिनीत २.०X१.५ मीटरवर, हलक्या जमिनीत २.०X२.० मीटरवर ६०X६०X६० सेंमी आकाराचे खड्डे लागवडीस तयार ठेवतात. भारी जमिनीत १६००, मध्यम जमिनीत ३३३३, हलक्या जमिनीत २५०० झाडे प्रति हेक्टरी लावतात.

खते : खते देताना फुलपिकांचा प्रकार, झाडाचे वय, जमिनीचा सामू आणि खते देण्याची वेळ या बाबींचा विचार करून खते देतात. तमिळनाडू कृषि विद्यापीठातील संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे की, प्रत्येक झाडास दरवर्षी १० किग्रॅ. शेणखत, २५ ग्रॅ. फेरस सल्फेट, ४ ग्रॅ. झिंक सल्फेट आणि ६० ग्रॅ. नत्र, १२० ग्रॅ. स्फुरद व १२० ग्रॅ. पालाश दोन हप्त्यात विभागून डिसेंबर व जून महिन्यात दिल्यास गुंडुमलई या जातीच्या फुलांचे अधिक उत्पादन मिळते. तसेच जुई पिकास १२०:२४०:२४० ग्रॅ. नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येक झाडास दरवर्षी दोन हप्त्यात देतात. त्याचप्रमाणे ६०:१२०:१२० ग्रॅ. नत्र, स्फुरद व पालाश जाई या फुलपिकांस वर्षातून दोन हप्त्यात जानेवारी व जुलै महिन्यांत विभागून दिल्यास फुलांचे अधिक उत्पादन मिळते.

छाटणी झाल्यावर ८ – १० दिवसांनी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम, स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत आणि ट्रायकोडर्मा प्रत्येकी १०-१० किग्रॅ., १००-१०० किग्रॅ. ओलसर शेणखतामध्ये वेगवेगळे मिश्रण करून त्या मिश्रणाचा ढीग वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून आठवडाभर ठेवतात. एक आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र करून एक हेक्टर क्षेत्रातील जास्मिनवर्गीय झाडांना बुंध्याभोवती घालतात. ही जैविक खते आणि जैविक बुरशीनाशके दरवर्षी छाटणीनंतर १०-१५ दिवसांनी देतात. त्यामुळे जमिनीत मुळाभोवती हवेतील नत्र स्थिरीकरण स्फुरदाचे द्रव्य रासायनिक स्वरूपात रूपांतर करून ते पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते. ट्रायकोडर्मामुळे जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगास प्रतिबंध होण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन : पाण्याच्या बाबतीत जेव्हा गरज भासेल तेव्हा साधारणपणे जमिनीच्या आवश्यकतेनुसार  हिवाळ्यात १० – १२ दिवसांनी तर उन्हाळ्यात ५ – १० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या देतात. छाटणीच्या अगोदर २० – २५ दिवस बागेस पाणी देणे बंद करतात. त्यामुळे झाडांना विश्रांती मिळून पुढील हंगामात फुले येण्याच्या दृष्टीने त्यांची अंतर्गत वाढ होते. छाटणीनंतर पुन्हा पाण्याच्या नियमित पाळ्या देणे सुरू करतात. इतर जातीच्या मानाने मोगऱ्यास कमी पाणी लागते.

भरपूर फुलांचे उत्पादन, उत्तम प्रत आणि कळीचा मोठा आकार मिळविण्यासाठी मोगरा प्रकारातील फुलझाडांना ठिबक सिंचन पद्धत वापरून मोजकेच पाणी देतात. प्रथम फुलझाडांची दररोजची पाण्याची गरज निश्चित करून तेवढेच पाणी मोजून देतात. पाणी देताना पाण्यात विद्राव्य खतांचे प्रमाण मिसळून खताच्या मात्रासुद्धा देतात. त्यामुळे पाण्याची बचत होऊन जमिनीतील हवा व पाणी यांचे संतुलन राहते. या संतुलनामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांची वाढ होण्यास मदत होते. मुळांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते.

वेलीची-झुडपांची छाटणी : दरवर्षी फुलांच्या अधिक उत्पादनासाठी या फुलापिकांना नवीन फुटीचे प्रमाण जास्तीत जास्त असणे गरजेचे असते. यासाठी झाडावरील जुन्या रोगट कमकुवत व दाटीवाटीने वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असते. प्रकारानुसार वेलीची व झुडपांची हलकी ते मध्यम प्रमाणात छाटणी करतात. छाटणी करताना जमिनीच्या पृष्ठभागापासून अंदाजे ४५ – ६० सेंमी. उंचीवर सर्व फांद्या छाटतात. मोगरा व जाईची छाटणी नोव्हेंबर महिन्यात करतात, तसेच जुईची छाटणी नोव्हेंबरमध्ये अथवा कडाक्याची थंडी संपल्यावर फेब्रुवारीत करतात. छाटणी झाल्यावर झाडाच्या आजू-बाजूतील तण तणनाशकाचा वापर करून नियंत्रण करतात. त्याचप्रमाणे खांदणी करून झाडांना मातीची भर देतात. भरपूर फुलांचे उत्पादन सुगंधी द्रव्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जाईवर सायकोसील या संजीवकाची १००० प्रति दशलक्षांश या प्रमाणात फेब्रुवारी व मार्चच्या पहिल्या आठवड्यात अशा दोन फवारण्या कराव्या लागतात.

फुलांची काढणी : लागवडीनंतर दोन वर्षांनी सर्वसाधारण मार्च ते ऑगस्ट या दरम्यान चांगल्या प्रकारे फुले येऊ लागतात. फुलांची काढणी हाताने करावी लागते. वेणी, गजरा करण्यासाठी फुले पूर्ण वाढलेल्या कळीच्या अवस्थेत काढतात. काढलेल्या कळ्यांची अगर फुलांची प्रतवारी करून बांबूच्या करंड्यांमध्ये तळाशी कडूलिंबाचा पाला, केळीचे पान किंवा कर्दळीची पाने टाकून वरील बाजूस कर्दळीची, केळीची अथवा कडूलिंबाची पाने पसरून करंड्या सुतळीने टाचून घेतात व नंतर दुरच्या बाजारपेठेत विक्रीस पाठवतात. लागवडीच्या क्षेत्रानुसार दररोज अथवा दिवसाआड फुले काढतात.

उत्पादन : आर्थिक दृष्ट्या किफायतशीर उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून मिळावयास सुरुवात होते व पुढे ७ – ८ वर्ष उत्पादन मिळते. मोगऱ्याच्या फुलांचे उत्पादन ३-४ वर्षांनी सरासरी १० – १२ टन प्रति हेक्टरी मिळते. जाई फुलांचे उत्पादन प्रति हेक्टरी सुरुवातीच्या २-३ वर्षांत ३ – ४ टन मिळते व पुढे चौथ्या वर्षापासून ८ – १० टन मिळते. तसेच जुईचे हेक्टरी ५ ते ६ टन फुलांचे उत्पादन मिळते.

किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण : कीड : जास्मिनवर्गीय फुलपिकांवर सहसा किडीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. काही वेळेस पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी आणि मावा यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यांच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फॉन ०.०५ टक्के किंवा डायमेथोएट, ०.२ टक्के किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ८ – १० दिवसाच्या अंतराने फवारतात. कोळी या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास केलथेन ०.४ टक्के किंवा पाण्यात विरघळणारे गंधक याची फवारणी ७ – ८ दिवसांच्या अंतराने करतात.

रोग : जाई या फुलपिकावर पानांवर काळे ठिपके पडून वेलीची संपूर्ण पाने करपून गळून पडतात आणि फुलांच्या उत्पादनात घट होते. या रोगाचे परिणामकारक नियंत्रण करण्यासाठी कार्बेन्डॅझिम १ टक्का किंवा बेनलेट १ टक्का, डायथेन एम-४५ या बुरशीनाशकाची २ टक्के या प्रमाणात ८ – १० दिवसांच्या अंतराने फवारणी करतात.

मोगरा व जुई या फुलपिकांवर काही वेळेस भुरी या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. त्याच्या नियंत्रणासाठी फेन्कॅनॉझोल ०.०५ टक्के किंवा डिनोकॅप ०.०५ टक्के डायफेन्कॅनॉझोल ०.०५ टक्के यांपैकी एका बुरशीनाशकाची रोगाचा प्रादुर्भाव दिसताच दर १० – १२ दिवसाच्या अंतराने फवारणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गंधक भुकटी ३०० मेश हेक्टरी २० – २५ किग्रॅ. धुराळ करतात.

संदर्भ :

  • Chadda,K.l.Handbook Of Horticulture,ICAR,New Delhi.
  • बळीराजा,नोव्हेंबर,२००३.

समीक्षक – भीमराव उल्मेक.

प्रतिक्रिया व्यक्त करा